आंदोलन बदनाम करण्याचे षडयंत्र : संयुक्त किसान मोर्चा

दिल्लीत संयुक्त किसान मोर्चाने २६ जानेवारीस प्रजासत्ताकदिनी आयोजित ‘किसान गणतंत्र परेड’ला हिंसाचाराचे गालबोट लागले. संतप्त आंदोलकांनी थेट लाल किल्ल्यावर धडक देऊन तेथील काही घुमटांवर झेंडे लावले.
 आंदोलन बदनाम करण्याचे षडयंत्र : संयुक्त किसान मोर्चा
आंदोलन बदनाम करण्याचे षडयंत्र : संयुक्त किसान मोर्चा

नवी दिल्ली : दिल्लीत संयुक्त किसान मोर्चाने २६ जानेवारीस प्रजासत्ताकदिनी आयोजित ‘किसान गणतंत्र परेड’ला हिंसाचाराचे गालबोट लागले. संतप्त आंदोलकांनी थेट लाल किल्ल्यावर धडक देऊन तेथील काही घुमटांवर झेंडे लावले. या हिसांचाराचा शेतकरी आंदोलक संघटनांसह देशभरातून निषेध व्यक्त करण्यात आला. सुमारे तीनशे पोलिस, शेकडो शेतकरी या संघर्षात जखमी झाले असून, काही भागांत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. पोलिसांनी शेतकरी नेत्यांसह २०० जणांवर २२ ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत. हे आंदोलन बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप संयुक्त किसान मोर्चाने केला आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून २०२० पासून दिल्लीच्या सीमावर्ती भागात देशभरातील शेतकरी आंदोलन करत आहेत. सुमारे ४१ संघटनांचे एकत्रित ‘संयुक्त किसान मोर्चा’ या आंदोलनाचे नेतृत्व करत आहे. या दरम्यान आंदोलनाला विविध कारणांनी सरकारमध्ये सहभागी मंत्र्यांसह अनेकांनी दूषणे दिली. या सर्वांचा एकत्रित प्रतिकार म्हणून किसान मोर्चाने २६ जानेवारीस ‘किसान गणतंत्र परेड’चे आयोजन केले होते. मात्र या आंदोलनात निर्धारित मार्गावरून तणाव निर्माण होऊन पोलिस आणि शेतकऱ्यांत काही भागात संघर्ष झाला.

ट्रॅक्टर रॅलीचे मार्ग निश्‍चितीवर अगदी शेवटच्या दिवसांपर्यंत दिल्ली पोलिस आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चा सुरू होत्या. यानंतर दिल्ली पोलिसांनी सुमारे २७ मुद्यांचे पत्र या संघटनांना दिले. यातही अनेक विभागाच्या परवानग्या मागितल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी २६ जानेवारीला सिंघू सीमेवर काही आक्रमक आंदोलकांनी मार्ग बदलण्याबाबत चर्चा करण्याचे आवाहन सुरू केले. यावरून येथे गदारोळ झाला. तर भारतीय किसान युनियनेचे प्रवक्ता राकेश टिकैत यांच्या म्हणण्यानुसार गाझीपूर सीमेवर निर्धारित वेळ उलटून दीड तास झाला तरी ट्रॅक्टर रॅलीसाठी परवानगी दिली गेली नाही. याशिवाय निर्धारित मार्गात अडथळे निर्माण केले. त्यामुळे तेथे प्रारंभी संघर्ष झाला. शेतकरी संघटनांच्या म्हणण्यानुसार काही ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड्‍स काढले नाहीत, तर काही ठिकाणी आंदोलनात घुसलेल्या असामाजिक तत्त्वांनी रॅलीतील मार्ग माहीत नसलेल्या शेतकऱ्यांना चुकीच्या मार्गाकडे भरकटवले. यातून काही ठिकाणी पोलिस आणि शेतकऱ्यांत संघर्ष झाला. आंदोलनानंतर...

  • हरियानामध्ये हाय अलर्ट जारी
  • उत्तराखंमधील चार जिल्ह्यांतही ‘हाय अलर्ट’
  • ट्रॅक्टर रॅली दरम्यानच्या हिंसाचाराच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
  • शेतकरी नेत्यांसह २०० जणांवर २२ ठिकाणी गुन्हे दाखल
  • दोन शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार
  • दीप सिद्धू संशयाच्या भोवऱ्यात... दीप सिद्धू याने समाजमाध्यमांवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यानुसार लाल किल्ल्यावरील राष्ट्रध्वज त्यांनी काढला नाही. कृषी कायद्यांना प्रतिकात्मक विरोध म्हणून ‘निशान साहेब’ आणि शेतकरी संघटनेचा झेंडा तेथे लावण्यात आला. या वेळी किसान मजदूर एकताची घोषणाही दिली गेली. हा प्रकार कोणत्या योजनेचा भाग नाही, यास जातीय रंगही देऊ नये. दीप सिद्धूबाबत बोलताना शेतकरी नेते योगेंद्र यादव म्हणाले, की शेतकरी आंदोलनाच्या सुरुवातीपासून दीप सिद्धूस बाजूला करण्यात आले होते. जेव्हा त्यांनी शंभू सीमेवरील आंदोलनात सहभाग घेतला, त्या वेळी त्यांचे वर्तन लक्षात घेऊन शेतकरी आंदोलकांनी त्यांना बाजूला करण्याचे ठरवले होते. भारतीय किसान युनियनचे हरियानाचे प्रमुख गरुनाम सिंग चढुणी यांनीही दीप सिद्धूबाबत संशय व्यक्त केला.

    दरम्यान, रात्री उशिरा, दीप सिद्धू आणि लख्खा सि्द्धाना यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी लाल किल्ला नजीक हिंसाचार दरम्यान घडलेल्या घटनांच्या आधारे गुन्हे दाखल केले. 

    कोण आहे दीप सिद्धू? दीप सिद्धू हा भाजपचे खासदार आणि अभिनेता सनी देओल यांचा मदतनीस होता. तोही अभिनेता आणि पंजाबी गायक आहे. मात्र डिसेंबरमध्ये तो शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्यानंतर देओल यांच्यापासून तो दूर गेला होता. शीख फॉर जस्टीस अजेंडा चालवत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. एनआयएने याआधीही चौकशीसाठी त्याला बोलविले होते. शंभू सीमेवर त्याचा स्वतंत्र गट शेतकरी आंदोलन करत असल्याची माहिती आहे. आमच्या विरोधात मोठे कारस्थान : संयुक्त किसान मोर्चा

    ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचाराची निंदा करत, या घटने मागे शांततापूर्ण आंदोलन आणि भक्कम संघर्ष उभा करणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात मोठे कारस्थान केल्याचा आरोप संयुक्त किसान मोर्चाने केला आहे. तसेच यातून शेतकरीविरोधी शक्ती समोर आल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

    संयुक्त किसान मोर्चात सहभागी शेतकरी संघटनांनी बलबीर सिंग राजेवाल यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक बुधवारी (ता. २७) घेतली. नवी दिल्लीत झालेल्या हिंसक घटनांवर या वेळी चर्चा करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकारला चांगलाच धक्का बसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. तसेच शेतकऱ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाबाबत किसान मजदूर संघर्ष समिती आणि इतरांबरोबर घेऊन एक मोठे कारस्थान रचण्यात आले होते, असा आरोप मोर्चाने केले. शेतकरी आंदोलन सुरू झाले, त्यानंतरच्या १५ दिवसांपासून संबंधित संघटनेचे स्वतंत्र आंदोलन सुरू आहे. या शेतकऱ्यांच्या संघर्षात संयुक्त किसान मोर्चाचा ते भाग नाहीत, असे या पत्रकात म्हटले आहे.

    जेव्हा शेतकरी संघटनांनी २६ जानेवारीच्या ‘किसान परेड’ची घोषणा केली. तेव्हा दीप सिद्धूसारख्या असामाजिक तत्त्वांसह कथित संघटनेने आंदोलनाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. यामुळे या संघटनेने रिंग रोडवर रॅली काढून लाल किल्ल्यावर झेंडा लावण्याची घोषणा केली होती. कटाचा भाग म्हणूनच या संघटनेने आपला मोर्चा निर्धारित वेळेच्या दोन तास आधीच रिंग रोडकडे वळविला, असे संयुक्त किसान मोर्चाने म्हटले आहे. मोर्चाच्या सर्व सदस्य संघटनांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला.

    कृषी कायद्यांविरोधात शांततेच्या माध्यमातून आपापल्या ठिकाणी आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन संघर्षरत संघटनांनी केले. या वेळी आंदोलन सुरूच ठेवण्याचे जाहीर करत, शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नुकसान पोहोचविणाऱ्या सरकार, प्रशासन, कथित शेतकरी संघटना आणि असामाजिक तत्त्वांचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला, असे पत्रकात म्हटले आहे. तसेच या वेळी आंदोलनाच्या पुढील कार्यक्रम निश्‍चितीसाठी ३२ संघटनांनी चर्चा केली.  टिकैत, योगेंद्र यादव यांच्यासह शेतकरी नेत्यांवर गुन्हे  शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीत भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यासह शेतकरी नेत्यांवर ‘ना हरकत दाखल्या’च्या उल्लंघनप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. श्री. टिकैत यांच्यासह दर्शनपाल सिंग, राजेंद्र सिंग, बलबिर सिंग राजेवाल, बुटासिंग बुरजगिल आणि जोगिंदरसिंग उराहा यांची नावे आहेत.

    मंगळवारी (ता. २६) झालेल्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीप्रसंगी हिंसाचारप्रकरणी शहराच्या विविध भागांतून २०० जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. एकूण २२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सुमारे ३०० पोलिस या हिंसाचारात जखमी झाले आहेत. पोलिस अधिकारी पी. सी. यादव हे लाल किल्ला परिसरात नियुक्त होते. ते म्हणाले, ‘‘लोकांचा एक गट लाल किल्ल्यात घुसला. आम्ही त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी आमच्यावर हल्ला केला. त्यांच्या हातात काठ्या होत्या. मी जखमी पोलिसाला घेऊन रुग्णालयाकडे गेला. मी स्वत: जखमी झालो. आम्ही संयम ठेवला. बळाचा वापर केला नाही, ज्यामुळे अधिक लोक जखमी झाले नाहीत.’’ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com