गडचिरोलीचे हत्ती गुजरातला नेण्याचा घाट

गडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा वनविभागातील अहेरी तालुक्यातील कमलापूर हत्ती कॅम्पमधील आठ हत्ती गुजरात राज्यातील जामनगर येथे उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडून उभारण्यात येत असलेल्या खासगी प्राणी संग्रहालयात ठेवले जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
Conspiracy to take Gadchiroli's elephants to Gujarat
Conspiracy to take Gadchiroli's elephants to Gujarat

गडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा वनविभागातील अहेरी तालुक्यातील कमलापूर हत्ती कॅम्पमधील आठ हत्ती गुजरात राज्यातील जामनगर येथे उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडून उभारण्यात येत असलेल्या खासगी प्राणी संग्रहालयात ठेवले जाणार असल्याची माहिती मिळाल्याने शिवसेना, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांसह विविध राजकीय पक्ष व स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. तसेच गडचिरोलीचे गजराज गुजरातला जायला नको, अशी मागणी मुख्यमंत्री, नगरविकासमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना करण्यात आली आहे.  यासंदर्भात शिवसेनेचे गडचिरोली जिल्हा समन्वयक किरण पांडव यांनी राज्याचे नगरविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठविले असून या पत्रात म्हटले आहे, की गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा वनविभागातील अहेरी तालुक्यात असलेल्या कमलापूर हत्ती कॅम्पमधील आठ हत्ती गुजरात राज्यात हलविले जाऊ नये, यासाठी जनभावना लक्षात घेता शासनस्तरावर प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. स्थानिक जनतेच्या आकर्षणाचे केंद्र म्हणून पर्यटकांना आपलेसे करणाऱ्या महाराष्ट्रातील एकमेव कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये आधी सात हत्ती होते. आता नव्याने एका हत्तीच्या बाळाचा समावेश झाल्याने एकूण आठ हत्ती झाले आहेत. अचानक वनविभागाच्या वन्यप्राणी विभागाने हे हत्ती गुजरात राज्यात नेऊन तेथील जामनगर येथे मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडून उभारण्यात येत असलेल्या खासगी प्राणी संग्रहालयात ठेवले जाणार असल्याचे कळते. याबाबत राज्य स्तरावर मुख्यमंत्री व वनमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी शिवसेना जिल्हा समन्वयक किरण पांडव यांनी केली आहे. दरम्यान काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून कमलापुरचे हत्ती गुजरातला न पाठविण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन पाठवून कमलापूरचे हत्ती गुजरातला हलविण्याला विरोध दर्शविला आहे. 

लक्ष्मीचे आगमन...  कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये प्रियांका या हत्तीणीने एका पिलाला जन्म दिला असून सिरोंचा वनविभागाचे उप वनसंरक्षक सुमीत कुमार यांच्या हस्ते या नव्या बाळाचा नामकरण सोहळा पार पडला. नव्याने कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये जन्माला आलेल्या या हत्तीच्या पिल्लांचे नाव ‘लक्ष्मी’ असे ठेवण्यात आले. विशेष म्हणजे कमलापूर वनपरिक्षेत्रातील शासकीय हत्ती कॅम्प हा महाराष्ट्रातील एकमेव हत्ती कॅम्प आहे. गेल्या दोन वर्षांत कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्ये असलेल्या दहा हत्तींपैकी आदित्य, सई आणि अर्जुन या तीन हत्तींच्या पिलांचा आजाराने मृत्यू झाला. त्यानंतर येथे केवळ सात हत्ती उरले होते. शनिवारी प्रियांका नावाच्या हत्तीणीने एका पिलास जन्म दिला असून आता या ठिकाणी हत्तींची संख्या ८ वर पोहोचली आहे. आता या हत्ती कॅम्पमध्ये अजित, गणेश असे दोन नर हत्ती आणि बसंती, प्रियांका, मंगला, रूपा, राणी आणि लक्ष्मी अशा मादी मिळून एकूण ८ हत्ती आहेत. नामकरण सोहळ्यात गडचिरोलीचे उप वनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी, सिरोंचाचे उपविभागीय वनअधिकारी सुहास बडेकर, कमलापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद पाझारे, वनपाल भारत निब्रड, हत्ती कॅम्पचे वनरक्षक राजकुमार बन्सोड, इतर वनरक्षक तसेच माहूत व चारकटर आदी उपस्थित होते.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com