नगर जिल्ह्यातील १०६ गावांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः जिल्ह्यातील १०६ गावांमध्ये सद्यःस्थितीत दूषित पाण्याच्या पुरवठा होत आहे. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व वरिष्ठ वैज्ञानिक भूजल सर्वेक्षण यांच्या मासिक अहवालातून ही आकडेवारी स्पष्ट झाली आहे. वारंवार चर्चा होऊनही अनेक गावांमध्ये पाणी निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येणारी टीसीएल पावडर निकृष्ट असल्याने नागरिकांच्या जिवाशी एकप्रकारे खेळच सुरू आहे. त्यातच दूषित पाण्यामुळे आजारांमध्ये वाढ होत आहे.

दूषित पाण्यामुळे विविध प्रकारचे आजार पसरतात. दूषित पाणी प्यायल्याने नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण होत असतो. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व ग्रामपंचायत या दोन विभागांवर जिल्ह्यात स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागानेही याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असताना, या दोन्ही सरकारी यंत्रणांच्या चालढकल कारभाराचा फटका ग्रामीण भागातील जनतेला बसत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून पाणीपुरवठा योजना राबविण्यात येतात. परंतु, जलस्रोत व पाणी शुद्धीकरणासाठी उपाययोजना करण्यात येत नसल्याने नागरिकांना अशुद्ध पाणी मिळते. अद्यापही १० टक्के गावांमधील लोकांना अशुद्ध पाणी मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे. पाणीपुरवठा, ग्रामपंचायत विभाग व आरोग्य यंत्रणा यांच्यातील असमन्वय दूषित पाणीपुरवठ्याला कारणीभूत आहे.

टीसीएल पावडरचा वापर पाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी केला जातो. पावडरची उपलब्धता करून पाणी निर्जंतुकीकरणाची जबाबदारी ही संबंधित ग्रामपंचायतीची आहे. त्यामुळे निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येणारी पावडर ही चांगल्या गुणवत्तेची असणे आवश्यक आहे. २० टक्क्यांपेक्षा कमी क्लोरिन असलेली टीसीएल पावडर ही निकृष्ट समजली जाते. जिल्ह्यात अनेक गावांमध्ये पाणी निर्जंतुकीकरणासाठी निकृष्ट पावडर वापरून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.

या गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा नगर ः बहिरवाडी, ससेवाडी, इमामपूर, धनगरवाडी, डोंगरगण, मांजरसुंबा, रुईछत्तीसी, साकत, अकोले ः कातळापूर, तेरुंगण सरोवर, माळेगाव, केळूगण, भंडारदरा, गुहिरे, सांगवी, केळी, रुम्हणवाडी, चैतन्यपूर, कळंब, करंडी, मनाळे, वीरगाव, देवठाण, खेतेवाडी, येरासाठाण, घोटघरवाडी, जामगाव, घिगेवाडी, शेलद, औरंगपूर, धुमाळवाडी, ताभोळ, अकोले, कुंभेफळ, सुगाव खु., कोपरगाव ः सोयगाव, चांदेकसारे पाथर्डी ः कोनोशी, कळसपिंप्री, नि. जळगाव, कारेगाव, चितळवाडी, करोडी, हनुमान टाकळी, सातवड, माळेवाडी. राहाता ः दहेगाव, कोऱ्हाळे, रांजणगाव खु. शेवगाव ः आव्हाणे बु., नांदूर, भायगाव, विजयपूर, एरंडगाव, मुशरातपूर, मुंगी, संगमनेर ः मांडवे, शिदोडी, कौठे मलकापूर, दरेवाडी, बिरवाडी, धांदरफळ, पिंपळगाव माथा, सावरगावतळ, हिवरगाव पावसा, शिबालापूर, मालदाड, सुकेवाडी. कर्जत ः कोपरेवाडी, बर्गेवाडी, भांबोरा, गणेशवाडी, मिरजगाव, रावकाळेवाडी. श्रीरामपूर ः कारेगाव, उंबरगाव, वळदगाव, पडेगाव.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com