शिवडे ग्रामस्थांनी मोजणी पथकास पिटाळले

समृध्दी महामार्ग
समृध्दी महामार्ग
नाशिक  : मुंबई-नागपूर समद्धी महामार्गाच्या वाटेतील शिवडे ग्रामस्थांचा अडथळा काही केल्या कमी व्हायला तयार नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे शिवडेतील शेतकऱ्यांमध्ये दोन गट पडले असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असताना, रविवारी (ता. २५) सकाळी ११.३० च्या सुमारास जमिनीची मोजणी करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना संतप्त शेतकऱ्यांनी हुसकावले. त्यामुळे समृद्धी महामार्ग विरोधातील वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत.
 
शिवडे घाटात घोरवड गावाच्या हद्दीत सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास १० ते १२ अधिकारी, कर्मचारी शेतजमिनीची मोजणी करीत असल्याचे शेतकरी उत्तम हारक यांना दिसले. विचारपूस केली असता त्यांनी ‘समृद्धी’साठीच्या रस्त्यांसंदर्भातील मोजणी करीत असल्याचे सांगितले. मोजणी करण्याबाबतचे परवानगी पत्रदेखील दाखवले. कर्णोपकर्णी या बाबातची माहिती गाव शिवारात पसरली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी गोळा झाले. जमलेल्या शेतकऱ्यांनी मोजणी कर्मचाऱ्यांना घेराव घालून काम बंद पाडले. कर्मचाऱ्यांना गावातील मारुती मंदिरासमोर आणले. तेथे त्यांच्याकडील मोजणी कॅमेरा स्टॅंड व साहित्य जप्त करण्यात आले. शिवडे ग्रामस्थांची एकजूट फोडण्याचा डाव करून प्रशासन समृद्धी महामार्गाची वाट सोपी करू पाहत असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी सरकार विरोधात संताप व्यक्त केला.
 
दरम्यान, शेतकऱ्यांनी मोजणी कर्मचाऱ्यांना मारुती मंदिरात डांबण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कर्मचाऱ्यांना पुढे करून अधिकारी नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करीत असल्याचे मत काही शेतकऱ्यांनी मांडले. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना दुपारी ४.३० च्या सुमारास साहित्यासह गावाबाहेर काढून देण्यात आले. या वेळी सोमनाथ वाघ, उत्तम हारक, रावसाहेब हारक, भास्कर वाघ, हरिभाऊ शेळके, सुनील चव्हाणके, प्रकाश हारक, सचिन शेळके, किरण हारक, ज्ञानेश्‍वर चव्हाणके, आदींसह सुमारे दोनशेवर शेतकरी जमा झाले होते.
 
नाशिकचे जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन म्हणाले, की आमचे अधिकारी व कर्मचारी रविवारी सुटीवर होते. प्रत्यक्ष जागेवर गेलेले अधिकारी हे प्रकल्पासाठी निविदा भरलेल्या एल अँड टी कंपनीचे होते. त्यांनी जाण्यापूर्वी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नव्हती. सर्वेक्षणाला जाताना यापुढे पूर्वपरवानगी घेऊनच जाण्याच्या सूचना कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात येतील.
समृद्धी महामार्गासाठी होणारे सक्तीचे भूसंपादन, संपूर्ण कर्जमाफीची मागणी आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे, या संदर्भाने राज्य सुकाणू समिती शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणार आहे. १ एप्रिल रोजी नाशिक येथील हुतात्मा स्मारकात क्रांतिकारकांना अभिवादन करून समितीच्या जनजागृतीस सुरवात होणार असल्याची माहिती कॉम्रेड राजू देसले यांनी दिली. याच दिवशी सायंकाळी ६ वाजता शिवडे येथे सभा होणार असून, या वेळी रघुनाथ दादा पाटील, किशोर ढमाले, डॉ. अजित नवले, राजू देवले, करण गायकर, गणेशकाका जगताप, प्रतिभा शिंदे, सुशीला बोराळे आदी उपस्थित राहणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com