मक्यावरील लष्करी अळीचे नियंत्रण

मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. या नुकसानकारक किडींचे एकात्मिक पद्धतीने नियंत्रण व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
american army worm in maize 
american army worm in maize 

मका हे खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक असून, मका उत्पादनात जागतिक पातळीवर भारताचा तिसरा क्रमांक लागतो. भारतात कर्नाटक राज्यामध्ये मक्याखाली सर्वाधिक क्षेत्र आहे. गेल्या दोन वर्षापासून आपल्या राज्यामध्ये मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. या नुकसानकारक किडींचे एकात्मिक पद्धतीने नियंत्रण व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचा (शा. नाव- स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा ) प्रथम प्रादुर्भाव आफ्रिका खंडात सन २०१६ मध्ये आढळून आला. २०१८ पासून ही कीड भारतात आढळून येत आहे. ही कीड लेपीडोप्टेरा कुळातील असून, मका, ऊस, ज्वारी, भाजीपाला, कापूस यासारख्या ८० पेक्षा अधिक पिकांचे नुकसान करते.  ओळख लष्करी अळी ही तपकिरी रंगाची असून, अळीच्या डोक्यावर उलटा वाय आकाराचे चिन्ह असते. शेपटीकडील शेवटून दुसऱ्या भागावर चार काळे ठिपके समान अंतरावर चौरसाप्रमाणे दिसतात. वाढीच्या शेवटच्या टप्प्यात अळीच्या अंगावर गडद ठिपके स्पष्ट दिसून येतात. किडीचा पतंग हा करड्या रंगाचा असतो. पतंगाचे पुढील पंख तपकिरी, तर मागील पंख पांढऱ्या रंगाचे असतात. जीवनक्रम मादी पतंग ही मक्याच्या पोंग्यात, कोवळ्या पानावर वरच्या बाजूने किंव्हा खोडाजवळ समूहात किंवा पुंजक्यात अंडी घालते. तसेच अंडी पांढऱ्या केसाच्या थराने झाकते. लष्करी अळीचा संपूर्ण जीवनक्रम ३५ ते ४० दिवसात पूर्ण होतो. अंडे अवस्था दोन ते तीन दिवसाची असून, त्यानंतर अळी बाहेर येते. अळी वाढीच्या सहा अवस्थेतून पूर्ण करते. त्यासाठी १२ ते २० दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतर शेवटच्या अवस्थेतील अळी पिकावरून जमिनीत २ ते ८ सेंमी खोलीवर कोषात जाते. किडीची कोष अवस्था १२ ते १५ दिवसात पूर्ण होते. नुकसानीचा प्रकार पहिल्या अवस्थेतील अळी ही पानाचा पृष्ठभाग खरवडून खाते. पानावर पांढरा डाग दिसतो, त्यास ‘विंडो’ असे म्हणतात. प्रथम अवस्थेतील अळी ही पानाच्या खाली चिकट धाग्याच्या साहाय्याने लोंबकळते. वाऱ्याने उडून नजीकच्या झाडावर पोचते. अळी पोंग्यात शिरून कोवळी पाने खाते, त्यामुळे पाने कुरतडल्यासारखी दिसतात. अळीची विष्ठा लाकडाच्या भुश्श्यांसारखी दिसते. पिकाच्या वाढीच्या नंतरच्या कालावधीत अळी कणसाभोवतीच्या कोवळ्या पानावर आपली उपजीविका करते. दाणे भरण्याच्या वेळी कोवळे दाणे खाते. अळ्या अधाशीपणे पाने खाऊन पानांच्या मध्य शिरा शिल्लक ठेवतात. निसवत असलेल्या कणसातसुद्धा या अळ्यांचा प्रादुर्भाव होऊन मोठे नुकसान होते. एकात्मिक कीड व्यवस्थापन

  • अळ्या व अंडी वेचून नष्ट करावीत.
  • हंगाम संपल्यावर पिकाच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी.
  • जमिनीची खोल नांगरट करावी.
  • पेरणी वेळेवर करावी. टप्प्याटप्प्याने पेरणी टाळावी.
  • मक्यामध्ये तूर/ मूग/ उडीद यांचे आंतरपीक घ्यावे.
  • रासायनिक खताचा शिफारशीपेक्षा अधिक वापर टाळावा.
  • जैविक पद्धती

  • ट्रायकोग्रामा प्रीटीओसम किंवा टिलेनोमस रेमस यांची परोपजीवीची ५० हजार अंडी प्रती एकर या प्रमाणे १ आठवड्याच्या अंतराने ३ वेळा शेतात सोडावीत.
  • रोपावस्था ते सुरुवातीची पोंग्याची अवस्था या कालावधीत ५% प्रादुर्भावग्रस्त कणसे आढळून आल्यास उपयुक्त बुरशी व जीवाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी करावी.
  • मेटारायझीम ॲनीसोप्ली ५ ग्रॅम किंवा नोमुरीया रीलाई ५ ग्रॅम किंवा बॅसिलस थुरीन्जिएन्सिस प्रजातीवर आधारीत कीटकनाशकाची २ ग्रॅम प्रती लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  • यांत्रिक पद्धती

  • मोठ्या अळ्या हाताने वेचून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून नष्ट कराव्यात.
  • सर्वेक्षणाकरिता ५ कामगंध सापळे प्रती एकरी लावावेत.
  • रासायनिक नियंत्रण

    कालावधी प्रादुर्भावाची पातळी कीटकनाशके मात्रा (प्रती लिटर)
    रोपावस्था ते सुरुवातीची पोंग्याची अवस्था ५ % प्रादुर्भावग्रस्त झाडे निंबोळी अर्क किंवा ॲझाडिरेक्टीन १५०० पीपीएम ५ मिली
    मध्यम ते शेवटची पोंग्याची अवस्था १० ते २० % प्रादुर्भावग्रस्त झाडे थायामेथोक्झाम (१२.६ टक्के ) अधिक लॅंबडा सायहॅलोथ्रीन ( ९.५ टक्के झेडसी) ०.५ मिली
    -- -- क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ % एससी) ०.४ मिली
    -- -- स्पिनोटोरम ०.९ मिली

    संपर्क- प्रा. के. एम. जाधव, ८९८३१०४९१९ (महात्मा गांधी मिशन, नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय, गांधेली, औरंगाबाद.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com