नियंत्रण भातावरील लष्करी अळीचे

सध्या काही ठिकाणी भात पिकावर मोठ्या प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. या किडीचा जीवनक्रम, प्रादुर्भावाची लक्षणे जाणूननियंत्रणाचे उपाय केल्यास नुकसान कमी करता येते.
army worm in paddy
army worm in paddy

पालघर जिल्ह्यात भात पीक सध्या कापणीला आले आहे. काही ठिकाणी भात पिकावर मोठ्या प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या किडीचा जीवनक्रम, प्रादुर्भावाची लक्षणे आणि व्यवस्थापन या बाबी व्यवस्थित समजून घेतल्या आणि नियंत्रणाचे सर्व उपाय केल्यास नुकसान कमी करता येते. भात पीक सध्या कापणीच्या अवस्थेपर्यंत आहे. या पिकात लष्करी अळीची समस्या पालघर जिल्ह्यातील भातपट्ट्यात जाणवत आहे. या किडीचे शास्त्रीय नाव मायथिम्ना सेपरेटा असे आहे. किडीच्या पतंगाचे पुढील पंख जरासे गुलाबी तपकिरी रंगाचे असतात. पंखांवर दोन फिक्कट गोलाकार ठिपके असतात. मागील पंखांवर ठळक शिरा दिसतात. छोट्या अवस्थेतील अळ्या पुढे चालताना पाठ (मध्य शरीर) वर घेऊन ‘लूप' करते. स्पर्श करताच पटकन खाली पडते. मोठ्या अवस्थेतील अळ्या चालताना पाठ वर घेत नाहीत. मोठी अळी चार सेंटीमीटरपर्यंत लांब वाढते. पूर्ण वाढलेल्या अळीच्या पाठीवर व दोन्ही बाजूंनी पिवळसर पांढऱ्या रंगाचे पट्टे स्पष्टपणे दिसतात. जीवनक्रम 

  • किडीची मादी (पतंग) भात किंवा गवताच्या पानांवर एका जागी परंतु दोन ते तीन सरळ रेषेत अंडी घालते. एक मादी पतंग १५० पासून ५०० किंवा त्यापेक्षा जास्त अंडी घालू शकते. एका ठिकाणी ६० ते १०० अंडी असतात.
  • अंड्यातून पाच ते आठ दिवसांत अळी बाहेर येते. या अळ्या सुरुवातीला लहान पाने खरवडून हिरवा भाग खातात. मोठ्या होत जातात तशा संपूर्ण पाने मध्यशिरांसहित खातात. पाकळ्या, ओंब्या, दाणे अधाशीपणे खातात.
  • अळी अतिशय खादाड असून २०० पेक्षा अधिक पिकांवर प्रादुर्भाव करते. अळी अवस्था वीस ते तीस दिवसांची असते. पूर्ण वाढ झालेली अळी मातीमध्ये कोषावस्थेत जाते. दहा ते वीस दिवसांत कोषामधून पतंग तयार होतो. अशा प्रकारे एक ते दीड महिन्यात आणि खाद्य भरपूर असेल तर केवळ एक महिन्यात एक पिढी पूर्ण होते. त्यामुळे प्रादुर्भाव झपाट्याने वाढत जातो.
  •  भाताव्यतिरिक्त मका, ऊस, भाजीपाला, फळपिके, फूलपिके अशा सर्वांवर कमी-जास्त प्रमाणात प्रादुर्भाव आढळतो. 
  • नियंत्रण व्यवस्थापन

  • कोकणात भात पिकाच्या हळव्या, निमगरव्या आणि गरव्या अशा प्रकारातील जातींची लागवड केली जाते. त्यापैकी सध्या हळव्या (कमी दिवसांत) तयार होणाऱ्या जातींचे भातपीक कापणीस तयार झाले आहे. त्यामुळे या जातींवर अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत आहे. भात कापणीला आले असल्याने जास्त विषारी कीटकनाशके वापरू नये असा सल्ला देण्यात येत आहे. 
  • हळव्या जातीचा भात पक्व झाला असल्याने तो त्वरित कापून  घ्यावा. भात कापून एकदा जमिनीवर आडवा झाला म्हणजे सहसा अळी खाण्यास येत नाही. तिचा मोर्चा दुसऱ्या उभ्या पिकाकडे वळतो. 
  • जो भात कापणीला उशिरा येणारा आहे (गरवे वाण) जातींवर अळी स्थलांतरित होते. त्यामुळे तिकडे प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता जास्त आहे.
  • अशावेळी शेताच्या बाजूने बांधावर क्विनॉलफॉस दीड टक्के किंवा क्‍लोरपायरीफॉस दीड टक्के भुकटी स्वरुपातील कीटकनाशक वापरावे. म्हणजे एका शेतातून दुसऱ्या शेतात अळी स्थलांतरित होणार नाही. 
  • फवारणीसाठी बिव्हेरिया बॅसियाना किंवा मेटारायझियम अनिसोप्ली यापैकी जैविक कीटकनाशक ५ मिलि किंवा निमतेल, करंज तेल यापैकी वनस्पतीजन्य कीटकनाशक ५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात संध्याकाळी फवारणी करावी. कारण या अळ्या संध्याकाळी व रात्री सक्रिय होतात.
  • भात कापणीला २० दिवसांपेक्षा जास्त कालावधी असेल तर रासायनिक कीटकनाशकांमध्ये सायपरमेथ्रिन (२५ इसी) ०.६ मिलि प्रति लिटर पाण्यातून संध्याकाळी फवारणी करावी.
  • शेतात पक्षी थांबे एकरी दहा ते बारा उभे करावेत. पक्षांच्या दृष्टीक्षेपात सहज या अळ्या येत असल्याने सकाळी लवकर पक्षी या अळ्यांना आपले भक्ष्य बनवतात.
  • सुरुवातीपासून कामगंध सापळे एकरी सहा ते सात व एकरी एक प्रकाश सापळा लावावा. म्हणजे किडीचे पतंग नष्ट होऊन अळीच्या उत्पत्तीवर नियंत्रण मिळते.
  • भातपिकातील नुकसान 

  • भातपिकात एखाद्या उंदराने नुकसान केल्यासारखे ही अळी जमिनीवर मोठ्या प्रमाणात दाणे व पाकळ्या तोडून जमिनीवर टाकते. प्रादुर्भावित शेतात असंख्य दाणे पडलेले दिसतात. अर्धे खाऊन व अर्धे जमिनीवर पडल्याने जास्त प्रादुर्भावाच्या शेतामध्ये ८० ते ९० टक्के तर काहीवेळा १०० टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकते.
  • प्रादुर्भाव सुरुवातीच्या काळात लक्षात न आल्यास चार ते पाच दिवसांत खूप मोठे नुकसान होऊ शकते. अळी दिवसा उन्हापासून संरक्षण करण्यासाठी जमिनीतील भेगांमध्ये किंवा पानांच्या सावलीत अथवा खोडामध्ये लपून राहते. मात्र संध्याकाळी व रात्री झाडावर चढून ओंबीतील दाणे खाते. त्यामुळे जमिनीवर पांढऱ्या, पिवळ्या रंगाच्या लेंड्या किंवा विष्ठा पडलेली दिसते.
  • संपर्क- उत्तम सहाणे, ७०२८९००२८९  (पीक संरक्षण तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल,  ता. डहाणू, जि. पालघर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com