जगात सर्वाधिक दूध उत्पादनाची टिमकी वाजविणाऱ्या आपल्या देशात मुळातच दुधाचे सेवन फारच कमी आहे.
फळबाग
नारळावरील चक्राकार पांढरी माशी
रुगोज चक्राकार पांढरी माशीच्या प्रादुर्भावामुळे झाड मरत नाही. मात्र, झाडाच्या वाढीवर परिणाम होवू शकतो. पांढरी माशीचे पिल्ले तसेच प्रौढ किटक झाडाच्या पानातील रस शोषतात. त्यामुळे नारळाची पाने पिवळी व निस्तेज दिसतात.
रुगोज चक्राकार पांढरी माशीच्या प्रादुर्भावामुळे झाड मरत नाही. मात्र, झाडाच्या वाढीवर परिणाम होवू शकतो. पांढरी माशीचे पिल्ले तसेच प्रौढ किटक झाडाच्या पानातील रस शोषतात. त्यामुळे नारळाची पाने पिवळी व निस्तेज दिसतात.
भारतामध्ये २०१६ साली नारळावर तमिळनाडू व केरळ या राज्यांमध्ये नारळावर रुगोज चक्राकार पांढरी माशी या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला. त्यानंतर दक्षिण भारतातील इतर राज्यांनंतर मागील वर्षापासून महाराष्ट्रामध्ये रुगोज चक्राकार पांढरी माशी किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.या किडीची ओळख करून घेऊ.
मध्य अमेरिका व कॅरेबियन बेटावर उगमस्थान असलेली रुगोज चक्राकार माशी ही तिथे दुय्यम कीड आहे. आपल्या देशामध्ये चक्राकार पांढरी माशी ही नवीन कीड असल्याने या किडीच्या जीवनचक्राविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. या किडीचे जीवनचक्र जवळपास ३० दिवसात पूर्ण होते.
प्रौढ
सामान्यपणे आढळणाऱ्या पांढऱ्या माशीपेक्षा चक्राकार पांढरी माशीचे प्रौढ आकाराने जवळपास तिप्पट मोठे असतात. कोषावस्थेतून बाहेर पडल्यानंतर सुरवातीला पंख पारदर्शक असतात. मात्र, लवकरच ते मेणाच्या आवरणाने झाकून जातात. प्रौढ माशीच्या पंखावर असलेला फिक्कट तपकिरी पट्ट्यावरून चक्राकार पांढरी माशी ओळखता येते. प्रौढ नर कीटकांच्या पोटाच्या शेवटी चिमट्याप्रमाणे दिसणाऱ्या मऊ नख्या असतात.
बाल्यावस्था
या किडीच्या बाल्यावस्थेचे पाच टप्पे असतात. पहिल्या टप्प्यातील पिल्ले चालू शकत नाहीत. ही पिल्ले आपल्या तोंडातील सुईप्रमाणे असणाऱ्या अवयवाद्वारे पानातील रस शोषण करण्यासाठी जागा शोधतात. बाल्यावस्थेतील उर्वरित टप्प्यामध्ये पिल्ले आकाराने वाढत जातात. शेवटच्या बाल्यावस्थेत पिल्ले आपल्या शरीराभोवती मेणचट आवरण तयार करतात. शरीरातून मेणाचे तंतूमय धाग्यांची निर्मिती करतात. त्यानंतर पिल्ले कोषावस्थेत जातात.
यजमान पिके
रुगोज चक्राकार पांढरी माशी बहुपीक भक्षी कीड असून, ११८ विविध प्रकारच्या वनस्पतींवर आढळते. या सर्वच वनस्पतींवर रुगोज चक्राकार पांढरी माशी आपले पूर्ण जीवनचक्र करतेच असे नाही. काही वनस्पतींवर ही कीड आपल्या जीवनचक्रातील एक किंवा दोन अवस्था किंवा वाढीच्या अवस्थेतील काही काळच वास्तव्य करते.
नुकसानीचा प्रकार
- रुगोज चक्राकार पांढरी माशीच्या प्रादुर्भावामुळे झाड मरत नाही. मात्र, झाडाच्या वाढीवर परिणाम होवू शकतो.
- पांढरी माशीचे पिल्ले तसेच प्रौढ किटक झाडाच्या पानातील रस शोषतात. त्यामुळे नारळाची पाने पिवळी व निस्तेज दिसतात.
- पानांवर काळी बुरशी वाढल्याने झाडाला ताण बसू शकतो. पांढरी माशीच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या गोड द्रवाकडे मुंग्या व मुंगळे आकर्षित होतात. त्या बदल्यात मुंग्या पांढरी माशीचे शत्रूपासून रक्षण करतात.
- पानांवर पडणारा गोड द्रव पदार्थामुळे नारळाच्या झावळ्यावर व नारळाखाली वाढणाऱ्या विविध झाडे व गवतावर काळ्या रंगाची “कॅप्नोडीयम” बुरशी वाढते. कॅप्नोडीयम बुरशीमुळे झाडाच्या प्रकाश संश्लेषण क्रियेवर विपरीत परिणाम होतो.
- चक्राकार पांढरी माशी वनस्पतीतील विषाणू प्रसाराचे देखील काम करतात.
प्रादुर्भावाची लक्षणे
- प्रादुर्भावग्रस्त झाडांच्या पानांच्या खालच्या बाजूला किडीने चक्राकार घातलेली अंडी.
- मोठ्या प्रमाणात पानांवर असलेली रुगोज चक्राकार पांढरी माशीचे मेणचट तंतू.
- प्रादुर्भावग्रस्त पानांवर पसरलेला पिवळसर चिकट द्रवपदार्थ
- पानांवर वाढलेली काळी कॅप्नोडीयम बुरशी
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय रोपण पिके संशोधन, कासारगौड, केरळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, नारळाच्या झाडावरील सर्वात खालच्या म्हणजेच जुन्या झावळ्यांवर या किडीचा प्रादुर्भाव होत असल्याने नारळाच्या उत्पन्नावर या किडीच्या प्रादुर्भावाचा फारसा परिणाम होत नाही. मात्र, नारळाच्या झाडाखालील अन्य नगदी पिके उदा. केळी, फुलझाडे, कंदवर्गीय पिके, इतर फळझाडे इ. पिकांचे विक्री मूल्य त्या झाडांवर पडलेल्या काळी बुरशी व पांढरी माशीच्या अवशेषांमुळे कमी होऊ शकते.
व्यवस्थापन
- प्रादुर्भावाच्या सुरवातीच्या अवस्थेत पाण्याच्या फवाऱ्याद्वारे रुगोज चक्राकार पांढरी माशीच्या विविध अवस्था (अंडी, पिल्ले, प्रौढ किटक) धुवून जाऊ शकतात.
- या किडीचे शत्रू असलेले एनकार्शिया हे परजीवी कीटक व नेफ्यास्पिस हे परभक्षी भुंगेरे या मित्र किटकांचे संवर्धन व संरक्षण करावे.
- नारळाच्या झावळांवर तसेच नारळाच्या असलेल्या इतर वनस्पतींच्या पानांवर वाढलेली काळ्या कॅप्नोडियम बुरशीच्या नियंत्रणासाठी कपड्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्टार्चच्या १ टक्के तीव्रतेच्या (१० ग्रॅम किंवा १० मिली प्रति लिटर पाणी) द्रावणाची फवारणी करावी.
- नारळाच्या बागेमध्ये असलेल्या अन्य पिकांत चक्राकार पांढरी माशी नियंत्रणाकरीता पिवळ्या रंगाच्या चिकट सापळ्याचा वापर करावा.
- चक्राकार पांढरी माशीचा प्रादुर्भाव असलेल्या नारळाच्या झावळ्यांवर निंबोळी तेल (०.५ टक्के ) किंवा ॲझाडिरेक्टिन (१० हजार पीपीएम) ३ ते ५ मिली प्रति लिटर पाणी या द्रावणाची फवारणी करावी. ६. कोणत्याही परिस्थितीत चक्राकार पांढरी माशी नियंत्रणाकरिता रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये.
परजिवी किटकाद्वारे नियंत्रण शक्य
भारतामध्ये चक्राकार पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आढळून आलेल्या केरळ व तमिळनाडू या राज्यामध्ये एनकार्शिया या परजिवी किटकाद्वारे नैसर्गिकरित्या या किडीचे उत्तम नियंत्रण होत आहे. कोणतीही कीड नवीन भागात प्रथम आढळल्यानंतर सुरवातीच्या काळात त्यांच्या शत्रूकिटकांचा अभाव असतो. त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. मात्र, हळूहळू त्या किडीवर उपजीविका करणारे मित्र कीटक तयार झाल्यानंतर उद्रेक करणाऱ्या किडीची संख्या कमी होत जाते. ही जैविक कीड नियंत्रणाची पद्धत आहे. चक्राकार पांढरी माशीचा प्रादुर्भावाला शेतकऱ्यांना घाबरण्याचे कारण नाही. या किडीसाठी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करू नये. कारण किडीबरोबर त्यावर उपजीविका करणारे मित्र कीटकही मारले जातील.
संपर्क- ए. एस. ढाणे, ७०२८०६५६२६
(कनिष्ठ कीटकशास्त्रज्ञ, कृषी संशोधन केंद्र पालघर, जि. पालघर. )
- 1 of 21
- ››