कृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यच

या कायद्याचे स्वागतच आहे. मात्र यापूर्वी पशुपालकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. आपण कोणत्या व्यावसायिकाकडून कृत्रिम रेतन करून घेतोय, त्याने दिलेल्या वीर्यकाडींचा दर्जा, विर्याचा दर्जा, शुद्धता याबाबत आग्रह धरला पाहिजे. अनेक वेळा कृत्रिम गर्भधारणा केल्यानंतर गायी उलटण्याचे प्रकार घडतात. किमान दोन वेळा तरी गाय उलटते असा माझा अनुभव आहे. - आण्णासाहेब माने, पशुपालक, जाखले, ता. पन्हाळा, कोल्हापूर
कृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यच
कृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यच

पुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त कार्यपद्धतींच्या अवलंबाअभावी राज्यात गाय-म्हशींची गर्भधारणा न होण्याचे प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत असल्याचे पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितले. तर कृत्रिम रेतनाचा खासगी व्यवसाय नियंत्रणात आणण्याच्या शासनाच्या भूमिकेचे पशुपालकांनी स्वागत केले आहे.  परभणीच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मार्कंडेय म्हणाले, ‘‘कृत्रिम रेतनाबाबतच्या शास्त्रोक्त कार्यपद्धतींच्या अवलंबाअभावी राज्यात गाय-म्हशींची गर्भधारणा न होण्याचे प्रमाण हे ८० टक्क्यांपर्यंत आहे. यामुळे पशुपालकांच्या आर्थिक नुकसानीबरोबर पशुधनाच्या आरोग्यावरदेखील विपरित परिणाम होत आहेत. कृत्रिम गर्भधारणा करणे म्हणजे इंजेक्श्‍न देणे अशी सहज भावना पशुपालक आणि खासगी व्यावसायिकांची झालेली आहे. त्यामुळे पशुधनाचा योग्य माज ओळखता न येणे, गर्भाशय हाताळता न येणे यामुळे गर्भाशयासह पशुधनाच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कृत्रिम रेतनाचे २५ फायदे आहेत याची माहितीदेखील ग्रामपंचायतीमध्ये नसते. यामुळे नवीन कायद्यामुळे सर्व खासगी व्यावसायिकांना त्यांच्या सेवेचा दर्जा सुधारता येणार आहे.’’ कात्रज दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विवेक क्षीरसागर म्हणाले, ‘‘खासगी व्यावसायिकांकडून होणाऱ्या कृत्रिम रेतनाद्वारे ७० टक्क्यांपर्यंत गायी उलटण्याचे प्रमाण आहे. हे टाळण्यासाठी येणारा कायदा, नियमावली चांगली असून, यामध्ये ज्या व्यक्तीने कृत्रिम रेतन केले आहे. त्याच्यावर जबाबदारी निश्‍चित करण्यात यावी. तसेच प्रत्येक दिलेल्या रेतमात्रेची नोंद ठेवत, भविष्यात या नोंदीवर निष्कर्ष काढता येतील. इस्त्राईल देश केवळ प्रत्येक गायीच्या वंशावळीचे आणि त्या पशुधनाला दिलेल्या रेतमात्रेच्या दस्तावेजामुळे प्रगत आहे. आपल्याकडे सर्व आकडेवारी मोघम असल्याने धोरण आखताना अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणींमधील एक अडचण किमान कृत्रिम रेतन कायद्याच्या पातळीवर कमी होईल.’’ याबाबत बोलताना बाळासाहेब साकोरे (रा. केंदूर, ता. शिरूर, जि. पुणे) म्हणाले, ‘‘आमच्या गावात साधारण ३००० गायी-म्हशी आहेत. या वाड्या वस्त्यांवर असणाऱ्या पशुधनाला शासनाचा एक पशुवैद्यकीय अधिकारी सेवा देऊ शकत नाही. यामुळे खासगी सेवा घ्यावी लागते. कृत्रिम रेतनासाठी पण खासगी व्यावसायिक वेळेवर उपलब्ध होतात. मात्र त्यांनी आणलेली वीर्यमात्रा कोणत्या वळूची आहे, हे त्यांनादेखील माहिती नसते. त्यामुळे कोणत्या गायीला कोणत्या वळूचे वीर्य द्यायचे याचे शास्त्रीय ज्ञान नसल्याने अनेक वेळा पुढच्या पिढ्यांमध्ये दोष निर्माण होतात. तसेच काही वेळा गाय, म्हैस उलटण्याचे प्रमाणदेखील जास्त असते. मात्र केवळ वीर्यमात्रेचा दर्जा खालावलेल्या असतो, हे म्हणणे चुकीचे ठरेल. गाय उलटण्याच्या प्रमाणामध्ये गायीचे आजारपण, आहार, कोणता चारा किती प्रमाणात खाल्ला आहे, हेदेखील महत्त्वाचे असते. अनेक वेळा ऊसाचे वाढे जास्त खाल्ल्यानेदेखील गर्भधारणा होण्यास अडचणी निर्माण होतात. खासगी व्यावसायिकांनीदेखील पशुसंवर्धन विभागाने दिलेली नियमावली पाळली तर त्याच्या व्यवसायाची विश्‍वासार्हता वाढणार आहे. त्यांनी त्याचे पालन करावे.’’ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com