लाळ्या खुरकूत आजाराचे नियंत्रण

लाळ्या खुरकूत आजारामुळे जनावराच्या तोंडातून सतत लाळ गळते. वैरण खाण्याचे प्रमाण कमी होते. तोंडात फोड व अल्सर आल्यामुळे वैरण अजिबात खात नाहीत. लसीकरण हाच या आजाराच्या नियंत्रणाचा योग्य पर्याय आहे.
foot and mouth disease in cattle
foot and mouth disease in cattle

लाळ्या खुरकूत आजारामुळे जनावराच्या तोंडातून सतत लाळ गळते. वैरण खाण्याचे प्रमाण कमी होते. तोंडात फोड व अल्सर आल्यामुळे वैरण अजिबात खात नाहीत. लसीकरण हाच या आजाराच्या नियंत्रणाचा योग्य पर्याय आहे. लाळ्या खुरकूत आजार जनावरांतील संसर्गजन्य आजार आहे. आजाराचा  प्रादुर्भाव हिवाळ्याच्या शेवटी व उन्हाळ्याच्या सुरवातीस जास्त प्रमाणात दिसून येतो. गाय, म्हैस, शेळी, मेंढी, उंट, वराह, मिथुन या सारख्या जनावरांमध्ये प्रादुर्भाव दिसतो. परदेशी व संकरित जनावरांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात दिसतो. पावसाळ्याच्या शेवटी आजाराच्या नियंत्रणासाठी लसीकरण करून घेणे महत्त्वाचे असते. आजाराचे कारण  आजार पिकोर्ना विषाणूमुळे होतो. संपूर्ण जगात या विषाणूच्या सात प्रजाती (ओ, ए, सी, आशिया-१, स्याट-१, स्याट-२ व  स्याट-३) आहेत. यापैकी ओ, ए आणि आशिया-१ या प्रजाती भारतातील लाळ्या खुरकूत आजाराच्या प्रादुर्भावास कारणीभूत आहेत.  प्रसार 

  • आजारी जनावराच्या थेट संपर्कात निरोगी जनावर आल्यामुळे होतो. 
  • दूषित खाद्य, पाणी, हवेद्वारे, यांत्रिक प्रसारक (उदा. वाहने, उपकरणे, कपडे इ.) आणि जनावरांच्या लैंगिक संबंधातून होतो. 
  • विषाणू गोठवलेले मांस, लीम्फ  गाठी, खारवलेले मांस आणि पाश्‍चरायजझेशन न केलेल्या दुग्धजन्य पदार्थामध्ये दीर्घकाळ जिवंत राहू शकतात.
  • लक्षणे 

  • उच्च ताप (१०४-१०६ अंश फॅरानाईट)  २४ ते ४८ तास पर्यंत राहू शकतो.
  • तोंडातून सतत लाळ गळते. वैरण खाण्याचे प्रमाण कमी होते. तोंडात फोड व अल्सर आल्यामुळे वैरण अजिबात खात नाहीत.
  • ताप असल्यास भूक मंदावते.
  • दुग्धोत्पादनात घट दिसते. ही घट एकूण दूध उत्पादनाच्या १० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते. ही तूट आजार बरा झाल्यानंतर सुद्धा भरून येत नाही. 
  • पायांच्या खुराच्या आतील त्वचेवर व सांध्यावर फोड आणि अल्सर येतात, त्यामुळे बाधित जनावरे लंगडतात.
  • वयस्क जनावरांमध्ये मरतुकीचे प्रमाण कमी दिसून येते. मात्र वासरांमध्ये मरतुक जास्त प्रमाणात दिसून येते.कमी वयाच्या वासरांमध्ये हृदय विकृती होऊन बळी पडण्याचे प्रमाण जास्त दिसून येते. 
  • आजारातून बरे झाल्यावरही आजारी जनावर पुढील २-३ वर्ष या विषाणूचे वाहक राहू शकते. 
  • आजारी जनावरामध्ये गर्भपात, कासदाह, फुफ्फुसदाह, रक्तक्षय, खुरामध्ये व्यंग निर्माण होणे, शरीरावरील केसांची अनियमित व अस्ताव्यस्त वाढ होणे, धाप लागते. 
  • निदान व उपचार 

  • निदान लक्षणे तसेच रक्तजल चाचण्या व पीसीआर या पद्धतीने करता येते.
  • आजारावर कोणत्याही प्रकारचे विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत. मात्र आजारी जनावरांना नियमित प्रथमोपचार करणे फायदेशीर ठरते.
  • १ टक्के पोट्यॅशियम परमॅंगनेटच्या द्रावणाने  तोंड व खुरांतील जखमा धुवून घ्याव्यात. 
  • जखमांवर माशा बसून अंडी घालू नये किंवा जंतू संसर्ग होऊ नये म्हणून माशा परावर्तित करणारे प्रतिजैविक मलम लावावे. जखमांवर बोरीक पावडर व ग्लिसरीन याची पेस्ट करून लावावी. 
  • उपचारासाठी नोंदणीकृत पशुवैद्यकांचा सल्ला घ्यावा.
  • प्रतिबंधात्मक उपाय 

  • आजारी जनावराचे तत्काळ विलगीकरण करावे.
  • दूषित वैरण व आजारी जनावराखाली अंथरलेला पाला जाळून टाकावा.
  • गोठ्याचे २ टक्के कॉस्टिक सोडा किंवा फॉरमॅलीन द्रावणाने निर्जंतुकीकरण करावे.
  • गोठ्यात उपयोगात येणारी उपकरणे, अवजारे, मजुरांचे कपड्यांचे  निर्जंतुकीकरण करावे.
  • आजारी जनावरास निरोगी जनावरांसोबत बाहेर चरावयास सोडू नये. 
  • आजारी जनावरांना सामुदायिक पाणवठ्यावर पाणी पिण्यास नेऊ नये.
  • वासरांना आजारी मातेपासून दूर ठेवावे.
  • सामुदायिक पद्धतीने लसीकरण, जनावरांच्या आंतर-राज्यीय व आंतरराष्ट्रीय वाहतुकीवर निर्बंध, आजारी जनावरांचे विलगीकरण, शीघ्र निदान पद्धती, निर्जंतुकीकरण व आजाराविषयी सार्वजनिक जागरूकता याद्वारे प्रतिबंध करण्यास मदत होते.
  • लसीकरण

  • सामुदायिक लसीकरण करणे हा आजारावरील सर्वोत्तम उपाय आहे. सर्व सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यात याची लस उपलब्ध आहे. 
  • लसीकरण वर्षातून दोनदा म्हणजेच मार्च व सप्टेंबर या महिन्यात किंवा लसीच्या प्रमाणित पद्धतीनुसार करून घ्यावे.
  • संपर्क- डॉ. सुधाकर आवंडकर, ९५०३३९७९२९ (पशुवैद्यकीय सुक्ष्मजीवशास्त्र  विभाग, पशुवैद्यक  व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com