टोळधाडीचा धोका; सतर्क राहा

control measure for locus
control measure for locus

टोळधाडीमुळे केवळ पिकांचेच नाही, तर बहुतांश सर्व वनस्पतीचे नुकसान होते. आहारासाठी वनस्पतींवर अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांसाठी समस्या असणारी ही कीड प्रचंड हानिकारक आहे. सध्या गुजरात आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये टोळधाडीचा हल्ला झाला असून, आपल्या राज्यामध्ये सावधान राहण्याची आवश्यकता आहे. सध्या गुजरात आणि राजस्थान राज्यांच्या काही भागांमध्ये वनस्पतींवर टोळधाडीचा हल्ला झाला आहे. टोळधाडीमुळे वनस्पतींचे एकही हिरवे पान शिल्लक राहत नसल्याने केवळ मनुष्यजातीसाठीच नव्हे, तर सर्व जनावरांच्या आहाराचा प्रश्न तयार होतो. ही टोळ कीड समूहाने येत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. नुकसानीचे प्रमाण इतके प्रचंड असते की, एक टोळधाड एका दिवसामध्ये साधारणपणे १० हत्ती, २५ उंट आणि २५०० माणसांना पुरेल इतके अन्न फस्त करते. रात्रीच्यावेळी टोळधाड मोठमोठ्या वृक्षांवर किंवा विविध पिकांच्या क्षेत्रामध्ये मुक्कामाला येते. सूर्योदय झाला की टोळधाड सभोवतालच्या कोणत्याही पिकांवर तुटून पडते. प्रामुख्याने पिकांचे पाने, फुले, फळे, बिया यांचा फडशा पाडतानाच झाडाची साल, फांद्यांचा शेंडाही खाऊन टाकते. एकाच वेळी टोळ मोठ्या संख्येने फळझाडे, फांद्यावर बसल्याने अनेकवेळा फांद्यांना वजन सहन न झाल्यामुळे त्या तुटतात. अनेकवेळा वृक्षांनाही प्रचंड प्रमाणावर इजा झाल्याचे निदर्शनास आले आहे. एका समूहांमध्ये टोळांची संख्या १० लाखांपर्यंत असते. १२ ते १६ किलो प्रतितास या वेगाने त्यांचा प्रवास सुरू असतो. या प्रवासामध्ये वाऱ्याच्या दिशेचाही फायदा घेतला जात असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. टोळधाड एक देशातून दुसऱ्या देशात स्थलांतर करत असते. टोळ किडीचे प्रकार जगामध्ये टोळ किडीच्या १० महत्त्वाच्या प्रजातींचा उल्लेख आढळतो. मात्र, यापैकी रन टोळ, स्थलांतरित टोळ, बॉम्बे टोळ आणि वृक्ष टोळ या चार प्रजाती भारतामध्ये आढळून येतात. त्यातही रन टोळ ही सर्वात नुकसानकारक प्रजाती आहे. टोळ किडीचा जीवनक्रम

  • टोळ किडाची प्रौढ मादी जमिनीमध्ये छिद्र तयार करून ८ ते १० सेंमी खोलीवर अंडी घालते. आठवड्याच्या अंतराने तीन वेळा प्रति वर्गमीटर क्षेत्रांमध्ये सुमारे एक हजार अंडी सोडली जातात. |
  • टोळ किडीच्या जीवनक्रमामध्ये अंडे, पिल्ले आणि प्रौढ अशा तीन अवस्था असतात.
  • जीवनक्रम कालावधी  

  • अंडी अवस्था -१० ते ६५ दिवस  
  • पिल्लांची अवस्था - २४ ते ९५ दिवस (सरासरी ३६ दिवस)  
  • प्रौढ अवस्था - २.५ ते ६ महिने  
  • अंडी घालण्याचा काळ - ४० ते ५० दिवस  
  • प्रौढ अवस्था येण्याचा काळ - सरासरी २ ते ४ महिने  
  • संपूर्ण किडीचा जीवनकाळ - २ ते ६ महिने
  • रन टोळ मादी किडीमधील जीवनक्रम   प्राथमिक अवस्था   नुकतेच अंड्यातून बाहेर पडलेली पिल्ले पांढऱ्या रंगाची असतात. परंतु १ ते २ तासामध्ये काळ्या रंगामध्ये रूपांतर होते. द्वितीय अवस्था डोके मोठ्या आकाराचे आणि पिवळसर रंग आढळून येतो. तिसरी अवस्था किडीच्या पोटाच्या मधल्या भागावरून दोन्ही बाजूला पंखाच्या दोन जोड्या बाहेर येतात. चौथी अवस्था    रंग सतत काळा आणि पिवळा होतो. पाचवी अवस्था गडद- पिवळा रंग असून त्यावर काळा रंग असतो. संभाव्य उपाययोजना  सध्या गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये टोळधाडीचा प्रादुर्भाव झालेला आहे. मात्र, तो शेजारच्या कोणत्याही राज्यामध्ये येण्याची शक्यता असते. याच्या नियंत्रणासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.

  • टोळधाड आल्याची बातमी मिळताच, ताबडतोब सर्व शेतकऱ्यांना जागरूक करावे. शेतामध्ये ढोल, ताशा, स्टिलची भांडी यांच्या साह्याने मोठ्या तीव्रतेचा आवाज करावा. त्यामुळे शेताकडे येण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.  
  • रात्री टोळधाडीच्या मुक्कामाची बातमी मिळताच आगीचा लोट करून टोळधाडीवर फेकावा.  
  • राजस्थान शासनासह, कृषी विस्तार विभागाच्या निर्देशानुसार, टोळधाड आल्याचे काळामध्ये पीक संरक्षणासाठी पुढील प्रकारे किडनाशकांचा वापर करता येईल.  
  • क्लोरपायरीफॉस (२० टक्के ईसी) १.२ लिटर प्रति हेक्टर किंवा मॅलेथिऑन (५० ईसी) १८५० मि.लि. प्रति हेक्टर किंवा क्लोरपायरीफॉस (२० टक्के ईसी) २.५ मि.लि. प्रति लिटर किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के ईसी) १ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे कीडनाशकांचा वापर टोळधाड जमिनीवर, पिकांवर असेल तरच करावा. कीडनाशकांचा वापर करताना त्याचे अंश जलाशय किंवा पाण्याच्या स्रोतांमध्ये मिसळणार नाहीत, याची काळजी घ्यावी. जलस्रोत जवळ असल्यास अशी फवारणी टाळावी.  
  • फवारणी करते वेळी वाऱ्याच्या दिशेचा अंदाज घेऊन फवारणीची दिशा निश्चित करावी.  
  • उघड्या जमिनीवर वास्तव्यास असलेल्या टोळधाडीनंतर खोलवर नांगरणी करावी. यामुळे टोळ किडीची अंडी अवस्था नष्ट होण्यास मदत होईल.
  • सर्वेक्षण टोळधाडीचा हल्ला गुजरात आणि राजस्थानच्या सीमेवरील काही गावांमध्ये झाला असून, त्याच्या सर्वेक्षणासाठी साबरकंठा येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ डॉ. पी. ए. साबळे, समन्वयक डॉ. जनक मिस्त्री, कीटकशास्त्रज्ञ डॉ. जे. आर. पटेल यांच्या गटाने भेट दिली. या किडीच्या नियंत्रणासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली. भौतिक उपाययोजनांसह रासायनिक उपाययोजना समूहाने केल्यास अधिक फायदा होतो, हेही शेतकऱ्यांना समजावले.

    संपर्क ः डॉ. पी. ए. साबळे, ०८४०८०३५७७२ (डॉ. साबळे हे कृषी विज्ञान केंद्र, (साबरकंठा), गुजरात येथे, तर, डॉ. पाटोळे हे , नागपूर येथे सहाय्यक पीक संरक्षण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com