कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन

गुलाबी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण, मित्र कीटकांचे संवर्धन, जैविक घटकांचा वापर तसेच गरजेनुसार रासायनिक कीटकनाशकांचा वापर केल्यास किडींचे प्रभावी आणि कमी खर्चामध्ये व्यवस्थापन शक्य आहे.
pink boll worm in cotton
pink boll worm in cotton

गुलाबी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण, मित्र कीटकांचे संवर्धन, जैविक घटकांचा वापर तसेच गरजेनुसार रासायनिक कीटकनाशकांचा वापर केल्यास किडींचे प्रभावी आणि कमी खर्चामध्ये व्यवस्थापन शक्य आहे. सुरुवातीच्या काळात रासायनिक कीटकनाशकांचा कमीत कमी वापर 

  • पहिल्या तीन महिन्यामध्ये मित्र कीटकांच्या संवर्धनासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा उपयोग करावा.
  • या काळात वनस्पतिजन्य कीटकनाशके आणि जैविक बुरशीनाशके यांच्या प्रतिबंधात्मक फवारण्या उपयोगी ठरतात.
  • कामगंध सापळ्यांचा वापर

  • पीक ४० ते ४५ दिवसांचे झाल्यानंतर, शेतामध्ये गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षणासाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे पिकाच्या उंचीपेक्षा एक फूट उंचीवर लावावेत. त्यामध्ये गुलाबी बोंडअळीचे लिंग प्रलोभने गोसीप ल्युर बसवावे. या कामगंध सापळ्यांमध्ये गुलाबी बोंडअळीचे नर पतंग अडकतात. त्यामुळे पुढील तयार होणाऱ्‍या पिढीस अडथळा निर्माण करून संख्या कमी करता येते.
  • कामगंध सापळ्यांमध्ये ८ ते १० पतंग सतत २ ते ३ दिवस आढळून आल्यास त्वरित योग्य उपाययोजना कराव्यात.
  • प्रकाश सापळ्यांचा वापर

  • एकरी एक सापळा वापरावा. सापळा सायंकाळी ६ ते रात्री १० पर्यंत सुरू ठेवावा.
  • हानिकारक किडीचे नर आणि मादी दोन्हीही प्रकाशाच्या दिशेने आकर्षित होतात. त्यामुळे त्यांच्या मिलनात अडथळा निर्माण होऊन नवीन येणाऱ्या पिढीला प्रतिबंध केला जातो.
  • डोमकळ्या अळीसहित नष्ट करणे

  • गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेली फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात, यालाच ‘डोमकळी’ म्हणतात. या पिकात इतर कोणत्याच किडीच्या प्रादुर्भावामुळे अशी डोमकळी तयार होत नाही.
  • पीक फुलोरा अवस्थेत आल्यानंतर दर आठवड्याला झाडांचे निरीक्षण करावे. प्रादुर्भावग्रस्त फुले जमा करून अळ्यासहित नष्ट करावे.
  • ट्रायकोकार्डचा वापर

  • पीक पात्यावर आल्यानंतर १० दिवसांच्या अंतराने, ट्रायकोग्रामा या परोपजीवी मित्र कीटकांची अंडी असलेले ट्रायकोकार्ड एकरी ३ या प्रमाणात ७ ते ८ कार्ड शेतात लावावीत.
  • ट्रायकोकार्डवरील अंड्यातून मित्र कीटक बाहेर पडतात. हे मित्र कीटक बोंडअळ्यांची अंडी शोधून त्यात आपली अंडी घालतात. त्यामुळे बोंडअळ्यांचा अंडी अवस्थेतच बंदोबस्त केला जातो.
  •  सर्वेक्षणावर आधारीत कीटकनाशक फवारणी आर्थिक नुकसान संकेत पातळी आधारित केंद्रीय कीटकनाशक बोर्ड यांनी शिफारस केलेल्या रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी.

    आर्थिक नुकसान पातळी

  • प्रति कामगंध सापळा सतत तीन दिवस आठ पतंग किंवा
  • १ अळी प्रति १० फुले किंवा १० हिरवी बोंडे
  • आर्थिक नुकसान संकेत पातळी ओलांडल्यास, फवारणी (प्रति लिटर पाणी) जैविक कीडनाशकांची फवारणी

  • सुरुवातीला पात्या, फुलोरा व बोंडे धरण्याच्या अवस्थेमध्ये,
  • ॲझाडीरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मिलि पुरेशी आर्द्रता असताना,
  • बिव्हेरीया बॅसियाना (जैविक कीडनाशक) (१.१५ टक्के डब्ल्यू.पी.) ५ ग्रॅम
  • रासायनिक फवारणी

  • क्विनॉलफॉस (२० टक्के ए.एफ.) २.५ मिलि किंवा
  • थायोडीकार्ब (७५ डब्ल्युपी) २ ग्रॅम  (कीटकनाशकांना लेबल क्लेम आहे)
  • शिफारशीत रासायनिक कीटकनाशकांचा योग्य मात्रेसह अवलंब करावा. एकाच कीटकनाशकाचा सतत वापर करू नये.
  • शेतात पक्षी थांबे उभारावेत. शिफारशीत नसलेली विविध कीटकनाशके, संजीवके, अन्नद्रव्ये यांचे मिश्रण करून फवारणी करू नये.
  • रासायनिक कीटकनाशके फवारताना सर्व सुरक्षा विषयक नियमांचे पालन करावे.
  • संपर्क- डॉ. प्रशांत उंबरकर, ८२०८३७९५०१ (शास्त्रज्ञ (पीक संरक्षण), कृषि विज्ञान केंद्र, वर्धा, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला )

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com