असे करा ज्वारी, गव्हावरील खोडमाशीचे व्यवस्थापन..

control measures of stem fly in wheat and sorghum
control measures of stem fly in wheat and sorghum

रब्बी हंगामातील ज्वारी व गहू पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. ही कीड महत्त्वाची व गंभीर असून, वेळीच उपाययोजना न केल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होते. खोडमाशी ही घरमाशीप्रमाणेच दिसत असली, तरी आकाराने लहान असते. रंग काळपट राखाडी असून, तिच्या पृष्ठभागावर खालच्या बाजूने ४ ते ५ ठिपके असतात.  नुकसानीचा प्रकार

  • खोडमाशी प्रामुख्याने ज्वारी, बाजरी, मका, गहू यांसारख्या तृणधान्य व तृणवर्गीय गवतावर उपजीविका करते.   
  • या किडींचा प्रादुर्भाव फक्त रोपावस्थेतच आढळून येतो. अंड्यातून निघालेली अळी रोपाच्या बुडापर्यंत जाऊन खोडाला छिद्र पाडते. आत शिरून वाढणाऱ्या पोंग्यावर उपजीविका करते. सुरुवातीला मधला वाढणारा रोपाचा भाग पिवळसर पडून नंतर तो मरून जातो. यालाच पोंगेमर असे म्हणतात. लहान रोपे या किडीच्या प्रादुर्भावामुळे पूर्णत: मरून जातात, तर मोठ्या रोपांना बाजूने फुटवे फुटून उत्पादनात घट येते.   
  • या किडीचा प्रादुर्भाव उशिरा पेरणी झालेल्या ठिकाणी जास्त प्रमाणात आढळतो.   
  • ढगाळ वातावरणामुळे बागायती क्षेत्रात या किडीची वाढ झपाट्याने झाल्याचे आढळून येते. 
  • जीवनक्रम

  • अंडी, अळी, कोष व प्रौढ माशी अशा चार अवस्था असतात.   
  • प्रौढ मादी माशी तिच्या एक महिन्याच्या जीवनक्रमात पानाच्या खालच्या बाजूस किंवा लहान रोपाच्या नवीन खोडावर एकएकी अशी एकूण ४० ते ५० अंडी घालते. अंडी पांढरी, चपटी व लांबट आकाराची असतात.   
  •  २ ते ३ दिवसांनी अंड्यातून पांढुरक्या रंगाची अळी बाहेर पडते. ती तिचा १० ते १२ दिवसांचा जीवनक्रम खोडाच्या आत पूर्ण करते. पूर्ण वाढ झालेली अळी पिवळसर रंगाची, १० ते १२ मि.मी. लांब असून, ती तोंडाकडे निमुळती असते. तिला पाय नसतात.   
  • पूर्ण वाढ झालेली अळी खोडामध्ये किंवा खोडाबाहेर येऊन जमिनीत कोषावस्थेत जाते. कोष तपकिरी रंगाचे असतात. कोषावस्था एक आठवड्याची असते.   
  • कोषातून प्रौढ माशी बाहेर पडते. मिलनानंतर ती अंडे द्यायला सुरुवात करते.   
  •  अशा प्रकारे एक माशी तिची एक पिढी एकूण २ ते ३ आठवड्यांत पूर्ण करते. अशा कित्येक पिढ्या एका वर्षात तयार होतात.   
  •  या किडीमध्ये अळी व कोष या सुप्तावस्था असतात, त्या कडब्यामध्ये आढळून येतात  
  • एकात्मिक कीड व्यवस्थापन 

  • पिकाची कापणीनंतर शेताची नांगरणी करून त्यातील धसकटे गोळा करून नष्ट करावीत. त्यामधील सुप्तावस्थेतील अळ्यांचा नाश होईल.   
  • पेरणी वेळेवर करावी. पेरणीस उशीर झाल्यास बियाण्याचे प्रमाण वाढवावे.  
  • पिकाची फेरपालट करावी.  
  • कोळपणी व खुरपणी वेळेवर करावी, त्यामुळे जमिनीतील कोष नष्ट होतील.  
  • निंबोळी अर्क (५ टक्के) फवारणी करावी.
  • प्रादुर्भाव आढळताच रासायनिक नियंत्रण  ज्वारी 

  • बीजप्रक्रिया - इमिडाक्लोप्रीड  (७० डब्ल्यूएस) १० मिलि किंवा इमिडाक्लोप्रीड (४८ एफएस) १२ मिलि किंवा थायामिथॉक्झाम (३० एफएस) १० मिलि प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.  
  • (फवारणी प्रति लिटर पाणी) क्विनालफॉस (२५ ईसी) ३ मिलि 
  • गहू

    फवारणी प्रतिलिटर पाणी

  • सायपरमेथ्रिन (१० ईसी) १.१ मिलि. 
  • अशा प्रकारे वेळेवर योग्य उपाययोजना केल्यास खोडमाशीचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन होईल.
  • संपर्कः  डॉ. बी. व्ही. भेदे, ७५८८०८२०२८ (कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com