असे करा उसावरील पांढऱ्या माशीचे नियंत्रण

 control measures for white fly in sugarcane
control measures for white fly in sugarcane

ऊस हे प्रमुख नगदी पीक असून, त्यावर सुमारे २८८ प्रकारच्या कीटक व अकीटकवर्गीय किडी आढळून येतात. एकेकाळची दुय्यम समजली जाणारी पांढरी माशी ही आता मुख्य कीड झाली आहे. राज्यामध्ये या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. या किडीमुळे उसाच्या उत्पादनात २६ ते ८६ टक्के व साखरेच्या उताऱ्यात १.४ ते १.८ टक्के घट झाल्याचे आढळून आले आहे. पांढऱ्या माशीच्या उद्रेकाची संभाव्य कारणे 

  • शेतामध्ये पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत व पिकाला पाण्याचा ताण पडल्यास अशा दोन्ही परिस्थितीत पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढतो.  
  • रासायनिक खताचा असमतोल वापर विशेषतः नत्रयुक्त खताचा कमी, अधिक आणि अवेळी वापर हा किडीसाठी पोषक वातावरण तयार करतो.  
  • प्रदीर्घ काळ हवेतील जास्त आर्द्रता, ढगाळ वातावरण व उष्ण हवामान अशा प्रकारच्या अनुकूल परिस्थितीत प्रजनन क्षमता वाढते आणि जीवनक्रम कमी कालावधीचा होतो. यामुळे किडींच्या संख्येत वाढ होण्यास मदत होते.  
  • पावसाळ्यात जास्त प्रमाणात पावसाची उघडीप किंवा खंड पडणे. लांब व रुंद पानाच्या जाती जास्त प्रमाणात बळी पडतात. खोडव्याचे व्यवस्थापन योग्य न करणे.
  • किडीची ओळख 

  • महाराष्ट्रात अॅलिरोलोबस बॅरोडेन्सीस या पांढऱ्या माशीच्या प्रजातीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येतो.  
  • पांढऱ्या माशीचा प्रौढ फिकट पिवळसर असून, पंखाच्या दोन्ही जोड्या पांढऱ्या रंगाच्या असतात. म्हणूनच त्यास पांढरी माशी म्हणून संबोधले जाते.  
  • बाल्यावस्थेत ही कीड सुरुवातीस पिवळसर व नंतर काळसर करड्या रंगाची दिसते. तसेच तिच्या कडेला पांढऱ्या रंगाचे तंतू दिसतात. नंतर संपूर्ण बाल्यावस्था पांढऱ्या चिकट मेणाद्वारे झाकली जाते. तिथेच कोषावस्थेत जाते.  
  • एकाच पानावर ५००० पर्यंत कोष आढळून आले आहेत. पानाची मागची बाजू कोषामुळे पूर्णपणे काळी पडते.
  • नुकसानीचा प्रकार 

  • पांढऱ्या माशीची बाल्यावस्थाच पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते. या अवस्थेत कीड पानाच्या मागील बाजूने स्थिर राहून रस शोषण करते. परिणामी पाने निस्तेज होतात, पिवळी व गुलाबी पडतात.  
  • कालांतराने अशी पाने वाळतात. उसाची वाढ खुंटते. ऊस कोरडा पडून वजन घटते.  
  • बऱ्याचदा किडीच्या स्रावामुळे कॅप्नोडीयम बुरशीची पानावर वाढ होऊन पाने काळी पडतात. पर्यायाने प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये अडथळा येतो.  
  • राज्यामध्ये ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो.
  •   व्यवस्थापन 

  • उसात पाणी साचत असल्यास चर काढून पाण्याचा निचरा करावा. पावसाळ्यात पाण्याचा १५ दिवसापेक्षा जास्त ताण पडल्यास पाणी द्यावे.  
  • रासायनिक खतांची मात्रा शिफारशीनुसारच व योग्य वेळी द्यावी. नत्रयुक्त खतांचा जास्त वापर केल्यास पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढतो.  
  • सेंद्रिय खतांचा वापर करावा. खोडव्यालाही शिफारशीनुसार रासायनिक खतांच्या मात्रा द्याव्यात.  
  • उसाच्या शेंड्याजवळील दुसऱ्या व तिसऱ्या पानावर जास्त अंडी असतात. अशी २-३ पाने तोडून अंडी व कोषासहित जाळून टाकावीत किंवा जमिनीत पुरावीत. कीडग्रस्त ऊस तोडणीनंतर पाचट जाळावे, त्यामुळे अंडी, बाल्यावस्था व कोष मरतात.  
  • मार्च ते मे महिन्यात लागवड केलेल्या उसावर पांढरी माशी ऑगस्ट ते डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात आढळते, म्हणून उसाची लागवड किंवा तोड उशिरा करू नये.  
  • खोडव्यावर किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो. म्हणून त्याचे विशेष व्यवस्थापन करावे.  
  • कीडग्रस्त शेतात पिवळ्या रंगाचे चिकट सापळे लावावते. पिवळ्या रंगाचे डब्याला, पत्र्याला किंवा कार्डबोर्डला ग्रीससारखा चिकट पदार्थ लावून वाऱ्याच्या दिशेने ठेवल्यास पांढऱ्या माशीची मादी आकर्षित होवून सापळ्यास चिकटते. शेतातील माश्यांचे प्रमाण कमी होते.  
  • क्रायसोपर्ला कार्निया या भक्षक किडीचे १००० प्रौढ अथवा २५०० अंडी/अळ्या प्रति हेक्टरी सोडावेत. या किडीचे इन्कार्सीया व इरिटमोसिरस या परोपजिवी किडीद्वारे नियंत्रण होण्यास मदत होते. वनस्पतिजन्य कीटकनाशक (कडुनिंबाचा अर्क) ४ लिटर या प्रमाणात ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी १५ दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.  
  • पट्टा पद्धतीने ऊस लागवड केल्यास पिकात हवा खेळती राहते. त्याचप्रमाणे या पट्ट्यातून फवारणी करणे सोयीचे होते.  
  • रासायनिक नियंत्रण फवारणी प्रति लिटर पाणी डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) २.७ मि.लि.  
  • फवारणीनंतर १० ते १५ दिवस ऊस किंवा उसाचे वाढे जनावरांना घालू नये.
  • जीवनक्रम  पिले एकूण पिलावस्था ही १५ ते ३० दिवसांची असून, त्याची चार टप्प्यात विभागणी होते. पहिल्या अवस्थेत पिले २ ते ४ दिवसात पानाच्या मागच्या बाजूला योग्य जागी स्थिरावतात. त्यानंतर ती तिथेच कोषावस्थेत जातात.   कोष   काळ्या व करड्या रंगाचे, आयताकृती असून चपटे दिसतात. कोषाचा कालावधी १० ते १५ दिवस असतो. कोषाला इंग्रजी टी अक्षरासारखे छिद्र पाडून या माशीचा प्रौढ बाहेर पडतो.     प्रौढ  प्रौढ फक्त २४ ते ४८ तास जिवंत राहतात. 

    अशा प्रकारे पांढऱ्या माशीचा जीवनक्रम २४ ते ४५ दिवसात पूर्ण होतो. सर्वसाधारणपणे एका वर्षात पांढऱ्या माशीच्या ९ पिढ्या तयार होतात. उसाचे को-२८५, कोएस-८३५ व कोएस-११५८ हे वाण इतर प्रचलित वाण को-६७१, ७४०, ८६०३२ व ४१९ पेक्षा पांढऱ्या माशीला कमी बळी पडतात.

    संपर्क ः डॉ. भैयासाहेब गायकवाड, ९४२०४५९८०८ (विषय विशेषज्ञ -कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, खामगाव, ता. गेवराई, जि. बीड.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com