एकात्मिक पद्धतीने गाजरगवताचे नियंत्रण

दरवर्षी १६ ते २२ ऑगस्ट या सप्ताहात संपूर्ण देशात गाजरगवत जनजागृती मोहीम राबवली जाते. एकात्मिक पद्धतीने या तणाचे प्रभावी नियंत्रण करणे शक्य होते.
Zygograma insect helps to control Parthenium hystirophores grass
Zygograma insect helps to control Parthenium hystirophores grass

गाजरगवत म्हणजे समस्त शेतकऱ्यांसाठी प्रचंड समस्या असलेले तण आहे. दरवर्षी १६ ते २२ ऑगस्ट या सप्ताहात संपूर्ण देशात गाजरगवत जनजागृती मोहीम राबवली जाते. एकात्मिक पद्धतीने या तणाचे प्रभावी नियंत्रण करणे शक्य होते. गाजरगवत (कॉंग्रेस गवत) हे अत्यंत उपद्रवी तण आहे हे सर्वांना माहीत आहेच. त्याचे शास्त्रीय नाव ‘पार्थेनियम हिस्टेरोफोरस’ (Parthenium hysteroforus) असून हे ॲस्टरासीई (Asteraceae) कुळातील तण आहे. या वनस्पतीचे मूळ मेक्सिको, उत्तर अमेरिका, वेस्ट इंडीज भागातील आहे. आरोग्यासाठी हानिकारक अशा या तणाने देशातील ३५ दशलक्ष हेक्टरपेक्षा अधिक जागा व्यापली आहे. या तणाच्या नियंत्रणासाठी दरवर्षी १६ ते २२ ऑगस्ट या सप्ताहात संपूर्ण भारतात गाजरगवत जनजागृती मोहीम राबवली जाते. सन १९५० च्या दशकात देशात पडलेल्या दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारने पीएल ४८० ही योजना आखली. त्यानुसार अमेरिकेतून मोठ्या प्रमाणात गहू आयात केला. त्याबरोबरच गाजर गवताचं बी भारतात आले असे मानले जाते. देशात १९५५ मध्ये पुणे येथे ते सर्वप्रथम ठळकपणे आढळले. त्यानंतर देशभरात झपाट्याने पसरले. रस्त्यांच्या बाजूला, तळ्याशेजारी, नदी-नाल्याकाठी, रेल्वेरुळांच्या आजूबाजूला, कॅनॉल-विहिरी, पडीक जमिनी व शेतांमधून ते आढळते. गाजरगवताविषयी ठळक बाबी

  • नावाप्रमाणे या तणाची पाने गाजरासारखी. अतिशय वेगाने वाढणारे गवत असून उंची १ ते २ मीटरपर्यंत वाढू शकते.
  • पांढऱ्या रंगाची छोटी असंख्य फुले येतात. बिया अत्यंत हलक्या व छोट्या असतात. त्या वाऱ्याने सहज उडून एका ठिकाणाहून दुसऱ्या जागी पोचतात.
  • एक झाड साधारण ५ हजार ते २.५ लाखांपर्यंत बीज तयार करू शकते.
  • गाजरगवताचा सर्वांत मोठा दुष्परिणाम म्हणजे ते मातीतील पोषणमूल्य शोषून घेते. त्यामुळे स्थानिक गवतवर्गीय वनस्पती आणि फुलझाडांच्या वाढीवर परिणाम होतो.
  • या तणात पार्थेनिन, अँब्रोसिन अशी विषारी रसायने असतात. ती सजीव परिसंस्थेतील सजीवांना हानिकारक ठरतात.
  • कडधान्यांच्या मुळांमध्ये नत्र स्थिरीकरण करून जमिनीची सुपीकता वाढवणारे रायझोबियम, अझोटोबॅक्टर हे जिवाणू गाजरगवतामुळे मृत पावतात. नत्र स्थिरीकरणाची प्रक्रिया थांबून जमीन नापीक होते.
  • ज्या ज्या भागांमध्ये हे गवत फोफावलं आहे  त्या त्या भागांत शेती उत्पादन लक्षणीय घटलं आहे.
  • आरोग्यावरील दुष्परिणाम

  • मानवी आणि जनावरांच्या आरोग्यावर दुष्परिणाम आढळले आहेत.
  • शेतातील गाजर गवत उपटून टाकताना त्याचे परागकण श्वसनावाटे शरीरात जाऊन अनेक दमा,  खोकला आदी श्वसनविकार होऊ शकतात.
  • यातील विषारी रसायनांमुळे खाज उठणे, फोड येणे, जळजळ, त्वचारोग देखील होतात.
  • जनावरांनी खाल्ल्यामुळे त्यातील विष दुधात उतरतं.  गाजर गवत खाल्लेल्या प्राण्याचं मांस खाल्ल्यानेही माणसाच्या शरीरात त्यातील विषारी रसायने जाऊन आजार निर्माण होतात.
  • गाजर गवत खाल्ल्यामुळे जनावरांच्या तोंडाला इजा झाल्याचं तसंच जनावरांचा मृत्यू झाल्याचं काही अभ्यासकांना आढळलं आहे.
  • एकात्मिक नियंत्रण व्यवस्थापन नियंत्रणासाठी शास्त्रज्ञांनी विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. अत्यंत वेगाने वाढणारे तण असल्यामुळे केवळ एखाद्या पद्धतीच्या वापरातून ही समस्या कमी होत नाही. जागरूकता व प्रेरणा नियंत्रणाची पहिली पायरी म्हणजे होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल शैक्षणिक संस्था, शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्या साह्याने ग्रामीण भागात जागरूकता निर्माण करणे. त्यासाठी कार्यशाळा, चर्चासत्रे, कार्यक्रम यांचा उपयोग होईल. गाजर गवताकडे सामाजिक दक्षतेचा विषय म्हणून पाहून त्यानुसार नियोजन करावे. यांत्रिक व्यवस्थापन

  • यंत्राच्या साह्याने किंवा विळ्याने गाजरगवत मुळासकट काढावे व त्याची विल्हेवाट लावावी. योग्य प्रकारे नष्ट न केल्यास ते पुन्हा उगवू शकते. या क्रियेसाठी पावसाळा हा सर्वांत चांगला काळ आहे.
  • हाताने गाजरगवत उपटताना मोज्यांचा वापर करावा. चेहऱ्यावरही रुमाल अथवा वस्त्राचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.
  • नैसर्गिक व्यवस्थापन विविध लागवडी पद्धतींप्रमाणे विविध पिकांची फेरबदल करूनही गाजरगवताची समस्या कमी करता येऊ शकते. उदा. ज्वारी, बरसीम, झेंडू, धेंचा आदींमुळे प्रसार कमी होतो. त्याची वाढ खुंटते. जास्त वाढू नये यासाठी गाजरगवताशी स्पर्धा करणाऱ्या पिकांचे व फूल-फळांचे बी शेताच्या चहूबाजूने फेकून द्यावे. कंपोस्टिंग

  • या तणाचे अनेक दुष्परिणाम असले तरी त्यापासून सेंद्रिय खत, कंपोष्ट बनवता येते. खड्डा बनवून कंपोष्ट तयार करण्याची पद्धत
  • यात ५ किलो शेणाचा संपूर्ण थर बनवतात. त्यामध्ये ५०० ग्रॅम युरिया टाकतात. सर्वांत खाली गाजरगवताचे चांगले बारीक तुकडे करून टाकावे. खत बनविण्यासाठी फुलांवर येण्याआधीचे गाजरगवत मुळासकट काढून वापरावे. गांडूळखत निर्मितीमध्येही त्याचा वापर करता येतो.
  • जैविक व्यवस्थापन सध्यातरी उपलब्ध असलेला परिणामकारक आणि सुरक्षित उपाय म्हणजे जैविक नियंत्रण  (Biological Control). यात गाजर गवत खाऊ शकणाऱ्या मित्रकीटकांची पैदास करण्यात येते. तसेच गाजरगवत वाढू न देणाऱ्या वनस्पतींची लागवड केली जाते. ‘झायगोग्रामा बायकोलोरॅटा पॅलिस्टर’ (Zygogramma bicolorata pallister) हा गाजर गवत खाणारा कीटक आहे. सन १९८२ मध्ये मेक्सिकोतून तो भारतात आणण्यात आला इथे तो किती प्रभावी ठरतो त्याची चाचणी करण्यात आली. त्यानंतर गाजरगवत असलेल्या ठिकाणी त्याला सोडण्यात आलं.  हा कीटक गाजर गवताची पाने खाऊन जगतो. या कीटकामुळे गाजरगवत बऱ्यापैकी नियंत्रणात आणण्यात यश आलं आहे. या मित्रकिटकाविषयी

  • साधारणपणे जून ते ऑगस्ट महिन्यामध्ये शेतात भुंगेरे सोडावेत. ते पांढरे व लालसर रंगाचे असतात. पंखावर उभ्या रेषा असतात.
  • मादी पिवळसर रंगाची अंडी पानाच्या खालच्या आतील बाजूस देते.
  • नर व मादी दोघे गाजरगवताचे भक्षण करतात. मुख्यतः नवीन व कोवळ्या झाडाकडे आकर्षित होतात.
  • ही नियंत्रण पद्धती पर्यावरणपूरक व कमी खर्चीक आहे.
  • हे भुंगे एखाद्या वातावरणात एका ठिकाणी स्थिर झाले की पुढीलवर्षी पुन्हा प्रसारित करण्याची गरज भासत नाही.
  • शेतात प्रति हेक्‍टरी ५०० भुंगे सोडल्यास ते स्थिर होऊन प्रभावी नियंत्रण करतात.
  • रासायनिक व्यवस्थापन

  • पडीक जमिनीत म्हणजेच कोणतेही पीक, फळझाडे नसलेल्या ठिकाणी ग्लायफोसेट (४१ टक्के एस. एल.) ८ ते १० मि.ली. किंवा २,४-डी (५८ टक्के) २ ते २.५ मि.ली. प्रति लिटर यानुसार तणनाशकाची शिफारस आहे.
  • तथापि २,४-डी चा वापर करताना परिसरात द्विदल पीक असलेल्या शेतात फवारणी जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • पीक उभे असताना तणनाशकाचा वापर करणे टाळावे.
  • उगवणपूर्व तणनाशकाचा वापर करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
  • संपर्क- डॉ. मिलींद जोशी, ९९७५९३२७१७ (लेखक कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे विषय विशेषज्ज्ञ आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com