नांदेड, परभणी, हिंगोलीत समन्वयातून भाजीपाला, फळे विक्री 

नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये लाॅकडाऊनमध्ये शेतकऱ्यांचा भाजीपाला, फळे तसेच अन्य शेतमाल विक्रीसाठी गाव ते शहर विपणन साखळी तयार करण्यात आली. शेतकरी ते ग्राहक भाजीपाला फळे विक्री यावर भर दिला जात आहे. या कामी कृषी विभाग, आत्माअंतर्गत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी महसूल, सहकार, पणन, परिवहन विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यासह स्थानिक नगरपालिका, महानगरपालिका प्रशासन यांच्याशी समन्वय साधत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी तत्परतेने सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
coordination with selling of vegetables, fruits in Nanded, Parbhani, Hingoli
coordination with selling of vegetables, fruits in Nanded, Parbhani, Hingoli

नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये लाॅकडाऊनमध्ये शेतकऱ्यांचा भाजीपाला, फळे तसेच अन्य शेतमाल विक्रीसाठी गाव ते शहर विपणन साखळी तयार करण्यात आली. शेतकरी ते ग्राहक भाजीपाला फळे विक्री यावर भर दिला जात आहे. या कामी कृषी विभाग, आत्माअंतर्गत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी महसूल, सहकार, पणन, परिवहन विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यासह स्थानिक नगरपालिका, महानगरपालिका प्रशासन यांच्याशी समन्वय साधत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी तत्परतेने सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लाॅकडाऊन सुरू आहे. त्यामुळे शेतमाल विक्रीची व्यवस्था विस्कळीत झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृषी विभाग, आत्मा अंतर्गंत कर्मचाऱ्यांचे जिल्हास्तरावर कार्यगट स्थापन करण्यात आले आहेत. या कार्यगटांमार्फत दररोज शेतकरी ते ग्राहक या उपक्रमाअंतर्गंत भाजीपाला, फळे विक्रीच्या नोंदी घेतल्या जात आहेत. 

शेतमाल वाहतुकीसाठी परिवहन विभागाकडून वाहन परवाना मिळवून देण्यासाठी मदत केली जात आहे. महसूल विभागामार्फत विविध शहरातील मोकळ्या जागेत शेतमाल विक्रीसाठी मदत होत आहे. सहकार आणि पणन विभागामार्फत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सभासदांना शेतमाल विक्रीसाठी सहकार्य केले जात आहे. 

महानगरपालिका, नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी तसेच लोकप्रतिंनिधी देखील शेतकऱ्यांना भाजीपाला-फळे विक्रीसाठी सहकार्य करत आहेत. नांदेड जिल्ह्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांच्या मार्गदर्शनाखाली आत्माअंतर्गंतचे ८५ हून अधिक शेतकरी गट तसेच वैयक्तिक शेतकरी जिल्ह्यातील विविध ९० ठिकाणी शेतमालाची थेट विक्री करत आहेत. 

नांदेड शहरातील विविध वसाहती, गृहनिर्माण सोसायट्यांमधील नागरिकांना ताजा-दर्जेदार भाजीपाला पुरवठा करीत आहेत. सर्व तालुक्यांतील शेतकरी ते ग्राहक उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. परभणी जिल्ह्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक के. आर. सराफ यांच्या पुढाकारातून शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीसाठी परिवहन विभागाच्या सहकार्याने ई-पासेस देण्यात आल्या. 

सहकार आणि पणन विभागाच्या मदतीने शेतकरी उत्पादक कंपनी तसेच शेतकरी गटांव्दारे परभणी शहरातील गृहनिर्माण सोसायट्या तसेच तालुक्याच्या शहरात भाजीपाला विक्रीसाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या. परभणी जिल्ह्यातील शेतकरी गट तसेच कंपनी यांच्या माध्यमातून दोनशे शेतकरी थेट भाजीपाला विक्री करीत आहेत. हिंगोली जिल्ह्यात महसूल विभाग, सहकार विभाग, नगरपालिका प्रशासनाच्या समन्वायातून २४० शेतकरी २८ ठिकाणी थेट भाजीपाला फळांची विक्री करत आहेत. 

शेतकरी ते ग्राहक भाजीपाला, फळे विक्री उपक्रमासाठी महसूल, सहकार, परिवहन विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महापालिका प्रशासनाचे सहकार्य मिळत आहे. आता नांदेड शहरातील विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये शेतकऱ्यांच्या गहू, ज्वारी, हळद आदी ध्यान्यांच्या विक्रीची व्यवस्था केली जाणार आहे.  - रवीशंकर चलवदे,  जिल्हा अधीक्षक कृषीअधिकारी, नांदेड 

लॅाकडाऊन मध्ये शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीसाठी परिवहन विभागाच्या मदतीने ई-वाहन परवाने मिळण्यासाठी मदत केली. महसूल, सहकार, पणन विभागाची थेटविक्रीसाठी मदत होत आहे. शीतगृहामध्ये संत्री ठेवल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला  - संतोष आळसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,परभणी 

जिल्हा प्रशासनाच्या मदतीने जिल्ह्यातील शेतकरी २८ ठिकाणी भाजीपाला, फळांची विक्री करीत आहेत. शहरातील नागरिक, अधिकारी, कर्मचाऱ्यांना व्हॅाटस्ॲप ग्रुपच्या माध्यमातून थेट भाजीपाला विक्रीवर भर दिला जात आहे.  - विजय लोखंडे,  जिल्हा अधीक्षक कृषीअधिकारी, हिंगोली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com