शेतीमाल ताजा, पण चेहरे कोमेजलेले; ‘कोराना’च्या संकटाने शेतकरी हतबल

पंधरवड्यापूर्वी काकडीस वीस रुपये किलोपर्यंत दर होता. आता हा पाच ते दहा रुपये इतका मिळत आहे. मुंबईत मागणी नसल्याने दरात निम्म्याहून अधिक घट झाली आहे. स्थानिक ठिकाणी तर याहून कमी दर आहेत. — अण्णासाहेब कर्वे, नांदणी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर
vegetable
vegetable

कोल्हापूर : सहा महिन्यांपूवी आलेल्या महापुराने सुबत्ता घालविली, त्यातून सावरण्याचा प्रयत्न करीत असतानाच ‘कोराना’च्या संकटाने दक्षिण महाराष्ट्रातील आता उरली सुरली रयाही जाण्यास प्रारंभ झाला आहे. दर नसल्याने अस्वस्थ चेहरे, भाजीपाल्याचे चांगले प्लॉट येऊनही त्या पिकांच्या भवितव्याची स्पष्ट चिंता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून आली. स्थानिक बाजारपेठा बंद, मुंबई, पुण्याच्या बाजारपेठांत दर नसल्याने नीचांकी पातळीवर भाजीपाल्याचे दर गेले आहेत. जिल्ह्यातील भाजीपाल्याचे आगार असलेला शिरोळ तालुका हबकून गेला आहे. भाजीपाल्याला महिन्यापूर्वी असणारा पंचवीस ते तीस रुपये किलोचा दर आता पाच ते दहा रुपये इतका घसरला आहे. विशेष करून अल्पधभूधारक शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. पाच, दहा किलो भाजीपाला शहरातील बाजारात विकून चरितार्थ चालविणाऱ्या शेतकरी कुटुंबांची अवस्था बिकट बनली आहे. आठवडा बाजार किमान पंधरा दिवस तरी बंद असल्याने आता खायचे काय, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. ऑगस्टनंतर एक, दोन महिन्यांनी तालुक्‍यातील जिद्दी शेतकऱ्यांनी उसाबरोबरच भाजीपाल्याची लागवड करण्यास प्रारंभ केला. कोबी, फ्लॉवर, ढोबळी मिरची, वांगी आदींबरोबर पालेभाज्या करून महापुरातील नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने हवामान चांगले असल्याने भाजीपाल्याचे उत्पादन चांगले निघण्यास प्रारंभ झाला होता. परंतु पंधरवड्यापासून ‘कोरोना’चा पादुर्भाव सुरू झाला आणि गणित बिघडले. जसे मुंबई, पुण्यासारख्या शहरांवर निर्बंध येऊ लागले, तसे जिल्ह्यातील अर्थकारण बिघडू लागले.  मोठ्या बाजारपेठांत लोक बाहेर पडत नसल्याने भाजीपाला शिल्लक राहू लागला. त्याचा परिणाम दरावर झाला. हे पाहून तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी स्थानिक भागात जादा प्रमाणात भाजीपाला पाठविण्यास प्रारंभ केला. यामुळे या बाजारातही दर स्थिर राहू शकले नाहीत. आठ दिवसांपासून मात्र आठवडे बाजारही सक्तीने बंद होत असल्याने आता निघणारा भाजीपाला पाठवायचा कोठे, या चिंतेत शेतकरी आहेत.  प्रत्येक गावात दहा, वीस किलोची पाटी समोर ठेवून भाजीपाला विकत बसलेले चिंतातूर चेहरे परिस्थिती स्पष्ट करीत आहेत. उत्पादन खर्चही निघत नसल्याने आता करायचे काय, असा प्रश्‍नही उपस्थित होऊ लागला आहे. आणखी काही दिवसांत दर न लागल्यास सोन्यासारख्या पिकावर नांगर फिरवल्याशिवाय पर्याय नसल्याची हतबलता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. संसाराचा आर्थिक गाडा थांबणार शिरोळ तालुक्‍यात सुमारे तीनशे टन शेतीमाल स्थानिक बाजारपेठेत, तर दोनशे टन शेतीमाल मुंबई, पुण्याच्या बाजारपेठेत जातो. मुंबई पुण्याकडे शेतीमाल जात असला, तरी दर घसरल्याने हातात नाममात्र रक्कम येत आहे. तर स्थानिक आठवडी बाजार, सौदे बंद असल्याने दररोजच्या तीनशे टन शेतीमालाचे भवितव्य अधांतरी आहे. याचा मोठा परिणाम अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या संसारावर अर्थकारणावर येत्या काही दिवसांत होणार आहे.  प्रतिक्रिया मी उसाबरोबर इतर भाजीपाला पिकेही घेत असतो. महिन्यापूर्वी दोडका सुरू झाला. त्या वेळी किलोला ३० दर होता. आता दहा रुपये मिळणेही मुष्कील झाले आहे. स्थानिक बाजारपेठ बंद झाल्याने अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. घातलेला खर्चही कसा काढायचा या चिंतेत आहे. — सागर संभूशेटे, नांदणी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com