ग्रामीण भागाला कोरोनाचा विळखा 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहरांसह ग्रामीण भागालाही मोठा विळखा घातला आहे. लक्षणांकडे केले जाणारे दुर्लक्ष आणि काळजी न घेण्याच्या प्रकारांनी संसर्गाची तीव्रता वाढत आहे. यातील अनेक आजार अंगावर काढत असल्याने परिस्थिती हाताबाहेर जात आहे.
Corona to the rural area
Corona to the rural area

नाशिक : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहरांसह ग्रामीण भागालाही मोठा विळखा घातला आहे. लक्षणांकडे केले जाणारे दुर्लक्ष आणि काळजी न घेण्याच्या प्रकारांनी संसर्गाची तीव्रता वाढत आहे. यातील अनेकजण आजार अंगावर काढत असल्याने परिस्थिती हाताबाहेर जात आहे. शहरांतील कोरोनाग्रस्तांची चर्चा होताना दिसते, मात्र ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होत असल्याने स्थिती चिंताजनक होत आहे. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील विषाणूचे संक्रमण अतिशय जलद होत आहे. ग्रामीण भागात खबरदारीच्या अभावामुळे संसर्ग वाढत आहे. तर कोरोनाची अनाठायी भीती बाळगल्यामुळे काही सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची परिस्थिती गंभीर होऊन मृत्यू होत आहेत. आजारामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे संवेदनशीलपणे आरोग्य यंत्रणेच्या मार्गदर्शन सूचनांचा अवलंब केल्यास हे संकट टाळता येणार आहे. ‘भिऊ नका, पुढे या अन् वेळीच उपचार घ्या” या पद्धतीने पुढे यावे लागणार आहे. गोंधळून न जाता कोरोनाची लक्षणे समजून घेणे महत्त्वाचे आहे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. 

अशी आहेत लक्षणे  कोरडा खोकला, ताप, घसा खवखवणे, श्‍वास घेण्यास त्रास, अंगदुखी, वास न येणे, थकवा ही या आजाराची सामान्य लक्षणे आहेत. काही वेळा उलटी, जुलाब अशी वेगळी लक्षणेही आढळतात. ही लक्षणे दिसून आल्यास दुर्लक्ष करू नका. 

संसर्ग रोखण्यासाठी स्वत: घ्यायची खबरदारी 

  • घरीच राहा; गरज नसताना बाहेर पडू नका. 
  • किमान २ मीटरचे शारीरिक अंतर राखा. 
  • हात वारंवार स्वच्छ धुवा, श्‍वसनासंबंधी स्वच्छता राखा. 
  • शिंकताना व खोकताना चेहरा झाकावा. 
  • आजारी असल्यास वैद्यकीय तपासणीशिवाय बाहेर निघू नका. 
  • अनावश्यक प्रवास व आजारी व्यक्तीला भेटणे टाळा 
  • सामाजिक कार्यक्रम टाळा; कमीत कमी लोकांना निमंत्रित करा. 
  • सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. 
  • वापरलेल्या मास्कची योग्य विल्हेवाट लावा. 
  • लस सुरक्षित आहे, सर्वांनी नोंदणी करून लसीकरण करून घ्या. 
  • खबरदारी घ्या, प्रादुर्भाव टाळा  कुठलीही लक्षणे दिसून आल्यास आशा, अंगणवाडी सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे त्वरित संपर्क साधा. ‘ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रीटमेंट’ ही त्रिसूत्री पाळा व कोरोना टाळा, असे आवाहन आरोग्य विभाग करत आहे. गरज असल्यास प्रत्येक आरोग्य केंद्रात ‘अँटीजन’ व ‘आरटीपीसीआर’ चाचण्या मोफत, तर खासगी ठिकाणी अनुक्रमे ३०० व ५५० रुपये चाचणीप्रमाणे व्यवस्था आहे. तर पुढील चाचण्या शासकीय दराप्रमाणे होत असल्याने आजाराचे लवकर निदान होईल. वैद्यकीय सल्ल्याने औषधे घ्या. कोरोनाची सौम्य लक्षणे असणारे बहुसंख्य रुग्ण घरच्या घरी बरे होऊ शकतात. याकरिता प्रत्येक रुग्णाला हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज नाही. गृह विलगीकरणाच्या माध्यमातून रुग्णाची देखभाल घरच्या घरी घेणे शक्य आहे. प्रत्येक रुग्णानुसार हा निर्णय वैद्यकीय सल्ल्यानुसार घ्यावा लागतो. 

    गृह विलगीकरणात रुग्णांची अशी घ्या काळजी 

  • रुग्णाने विलगीकरणात घरात राहताना वृद्ध, लहान मुले, गरोदर महिला, जोखमीचे आजार असणाऱ्या व्यक्तींशी संपर्क टाळवा. 
  • घरातील निश्‍चित अशा एकाच व्यक्तीने रुग्णाची नियमित काळजी घ्यावी. 
  • काळजीवाहू व्यक्तीने हाताची स्वच्छता, घरातील वस्तू, पृष्ठभाग नियमित स्वच्छ करावेत. 
  • रुग्णाचे कपडे, ताट आणि इतर गोष्टी वापरू करू नयेत. 
  • डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे उपचार घ्यावा. तापमानाची नियमित नोंद ठेवावी. ऑक्सिजनचे प्रमाण ९३ पेक्षा कमी होणे गंभीर आजाराचे लक्षण आहे. दिवसातून एक वेळा ६ मिनिट वॉक टेस्ट करा. 
  • रुग्णाने प्रकृतीची माहिती दैनंदिन स्वरूपात स्थानिक डॉक्टरांना 
  • द्यावी. रुग्णाची काळजी घरगुती पातळीवर नीटपणे घेता यावी यासाठी स्थानिक डॉक्टर आणि रुग्ण यांचा उत्तम समन्वय असावा तरच ‘मेरा घर, मेरा अस्पताल’, हे प्रत्यक्षात येणे शक्य आहे. 
  • कोविड उपचारासाठी त्रिस्तरीय उपचार सुविधा 

  • कोविड केअर सेंटर... तालुका पातळीवर राज्यभरात अशी दोन हजारांहून अधिक केंद्रे आहेत. या केंद्रांमध्ये सौम्य स्वरूपाच्या रुग्णांवर उपचार केला जातो. 
  • कोविड हेल्थ सेंटर... तालुका आणि जिल्हा पातळीवर ही केंद्रे आहेत. या केंद्रांमध्ये मध्यम स्वरूपाच्या रुग्णांवर उपचार केला जातो. काही ऑक्सिजन बेड्‍सदेखील या केंद्रांमध्ये उपलब्ध असतात राज्यात अशी सोळाशेहून अधिक केंद्रे कार्यरत आहेत. 
  • कोविड हॉस्पिटल... गंभीर स्वरूपाच्या रुग्णांसाठी ही केंद्रे कार्यरत आहेत. इथे ऑक्सिजन बेड्‍स, व्हेंटिलेटर्स आणि अतिदक्षता विभागाची सोय उपलब्ध आहे. राज्यात सुमारे ९५० कोविड हॉस्पिटल्स कार्यरत आहेत. 
  • सध्या कोरोनाच्या अनुशंगाने लढाईसदृश परिस्थिती आहे. यात फक्त आरोग्य यंत्रणेवर अवलंबून चालणार नाही. प्रत्येकाने योग्य ती खबरदारी घ्यायला हवी. कोविड कसा होतो, कसा पसरतो. तो टाळण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे आणि कोरोना झाला तर काय करायला हवे. निदान-उपचार सुविधा कुठे आहेत. याची पूर्ण माहिती घेऊन त्यानुसार निर्णय घेणे आवश्यक आहे.आजच्या संकटाच्या प्रसंगी छोटी छोटी वाटणारी माहिती हे संकट नाहीसे करण्यासाठी अत्यावश्यक आहे.  -डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी, आरोग्य विभाग 

    लक्षणे दिसल्यास ताबडतोड आपल्या जवळच्या आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधा. लक्षणे दिसून आल्यास अंगावर काढू नका, त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या. घाबरू नका, जागरूक राहा. योग्य वेळीच उपचार केल्याने कोरोना बरा होतो. सकारत्मक दृष्टिकोन ठेवा. आपणही जागरूक राहा, इतरानंही जागरूक करा. या संकटावर मात करूया.  - डॉ. कैलास बाविस्कर, उपसंचालक, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, पुणे.

    ग्रामीण भागात प्रतिबंधकात्मक उपाय कमी...  शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात लोकसंख्येची घनता कमी आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागात अधिक वाढतो आहे. ग्रामीण भागात रुग्णांची तपासणी करून त्याला संसर्ग झाला आहे किंवा कसे, हे शोधण्यासाठी किट, मनुष्यबळ हे अत्यंत कमी आहे. शिवाय लोकांमध्ये कोरोनाची भीती आहे, अज्ञान आहे. लोक आजार अंगावर काढतात. तपासणीसाठी जात नाहीत. योग्यवेळी तपासणी होऊन रुग्णाचे विलगीकरण होत नाही. त्याचा परिणाम म्हणून संसर्गित व्यक्ती अनेक लोकांच्या संपर्कात येते आणि प्रत्यक्ष लक्षणे दिसून येण्याअगोदर अनेक लोकांना संसर्गित करते. रुग्ण शोधण्यामध्ये आणि तो विलगीकरण कक्षात नेऊन त्याच्यावर उपचार करण्यामध्ये विलंब होतोय. त्याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागात कोरोनाचे संकट वाढत आहे. रुग्णांनी बराच आजार अंगावर काढल्यामुळे व उपचार घेण्यास उशीर केल्यामुळे संसर्ग गंभीर होतो आहे. संकट मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. हे याच मुख्य कारण आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आजार शोधण्यासाठी आवश्यक असणारे रॅपिड अँटिजन कीट किंवा बाकी तपासण्या लवकरात लवकर होतील. प्राथमिक पातळीवर रुग्ण शोधला जाईल. तो विलगीकरण कक्षात जाईल. त्यावर वेळेवर उपचार होतील, हे केलं तरच ग्रामीण भागात प्रसार रोखता येणार आहे. केवळ लॉकडाउन हा पर्याय नाही.  - डॉ. अजित नवले , सरचिटणीस. किसान सभा 

    आरोग्य मंडळनिहाय रुग्णस्थिती... (२१ एप्रिल २०२१ पर्यंतची)
    आरोग्य मंडळ मनपा क्षेत्र जिल्हा क्षेत्र एकूण रुग्ण संख्या मृत्यू
    ठाणे १०,९६,३६१ १,५५,९७३ १२,५२,३३४ २२,०५७
    नाशिक २६३४५६ ३,१६,२२५ ५,७९,६८१ ७००१
    पुणे ६,०२,७६३ ३,२९,४५६ ९,३२,२१९ १३,०८६
    कोल्हापूर ४०,६२३ १,१३,२०३ १,५३,८२६ ४,३६३
    औरंगाबाद ९१,४०६ ९७,९८८ १,८९,३९४ २,७१८
    लातूर ५५,०४९ १,५३,९२० २,०८,९६९ ३,६९५
    अकोला ५८,६१४ १,३४,३८६ १,९३,००० २,५५४
    नागपूर २,९३,८९७ २,२४,३६१ ५,१८,२५८ ६,३२३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com