वर्धा जिल्ह्यात उभारणार कॉर्पोरेट शेळी बाजार

वर्धा जिल्ह्यात उभारणार कॉर्पोरेट शेळी बाजार
वर्धा जिल्ह्यात उभारणार कॉर्पोरेट शेळी बाजार

वर्धा : कॉर्पोरेट लूक असणारा राज्यातील पहिला शेळी बाजार वर्धा जिल्ह्यात उभारला जाणार आहे. सुमारे तीन कोटी रुपये खर्चून या बाजाराची उभारणी होणार असून, अद्ययावत तसेच वातानुकूलित शेतकरी प्रशिक्षणगृहासोबतच शेतकरी निवासाची सोय देखील या ठिकाणी असेल, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी दिली.  राज्यात अनेक ठिकाणी शेळ्यांच्या खरेदी- विक्री होते. त्यालाच शेळी बाजार असे संबोधले जाते. परंतु वर्धा जिल्ह्याच्या सालोड (हिरापूर) येथे उभारला जाणारा शेळी बाजार कॉर्पोरेट असणार आहे. जिल्हा प्रशासनाने याकरिता नुकतीच पाच एकर जागा दिली आहे. त्यानंतर खासदार रामदास तडस यांनी या बाजाराच्या उभारणीकरिता तीन कोटी रुपयांच्या निधीची मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. निधीसाठी अर्थमंत्री मुनगंटीवार सकारात्मक असल्याने येत्या काही दिवसांतच या प्रकल्पाचे काम सुरू होणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.  जनावरांना वाहनातून उतरविण्यासाठी या ठिकाणी खास रॅम्प उभारला जाणार आहे. ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत असलेल्या उमेदकडे बाजारातील विविध प्रकल्पाचे व्यवस्थापन देण्याचे प्रस्तावीत असून, उत्पन्नातील काही हिस्सा त्यापोटी ‘उमेद’ प्रकल्पातील महिलांना दिला जाणार आहे.  ...असा असेल कॉर्पोरेट शेळी बाजार

  • गोट ब्रीडिंग सुविधा ः या माध्यमातून चांगल्या प्रकारचे नर पैदास करून त्याची राज्यात इतर ठिकाणी विक्री केली जाईल. 
  • फॉडर कॅफेटेरिया ः विविध जातींचा चारा लागवड करून त्याची विक्री पशुपालकांना स्वस्त दरात होईल.
  • प्रशिक्षणगृह ः पशुपालकांकरिता या ठिकाणी प्रशिक्षणाची सोय असेल. त्याकरिता अद्ययावत तसेच वातानुकूलित प्रशिक्षणगृह उभारण्यात येईल. 
  • शेतकरी निवास ः राज्याच्या इतर भागांतून येणाऱ्या शेतकऱ्यांना गरजेच्यावेळी निवासाकरिता शेतकरी निवास उभारणी प्रस्तावित आहे.
  • लेंडी खत प्रकल्प ः शेळीपालकांकडून लेंडी खत खरेदी करून त्यावर प्रक्रिया व पॅकिंग करून विक्री करण्यात येईल. 
  • शेळी दुधावर प्रक्रिया ः शेळीच्या दुधापासून चीज, बटर, पनीर आणि आइस्क्रीम तयार करण्यासाठी प्रक्रिया प्रकल्प येथे असेल.
  • पहिला कॉर्पोरेट शेळीबाजार सालोड येथे प्रस्तावित करण्यात आला आहे. याकरिता तीन कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने याकरिता पाच एकर जागा दिली आहे. - डॉ. संजय खोपडे, पशुधन विकास अधिकारी, देवळी, जि. वर्धा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com