अकोट बाजारात कापूस  सातत्याने दहा हजारांवर 

यंदाच्या हंगामात पिकवलेला कापूस सध्या चांगला दर मिळवत आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील अकोट बाजारात कापसाचा दर सातत्याने दहा हजारांवर मिळत आहे.
Cotton in Akot Bazaar Consistently over ten thousand
Cotton in Akot Bazaar Consistently over ten thousand

अकोला ः यंदाच्या हंगामात पिकवलेला कापूस सध्या चांगला दर मिळवत आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील अकोट बाजारात कापसाचा दर सातत्याने दहा हजारांवर मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी १०,७०० पर्यंत प्रति क्विंटलला दर मिळाला. शनिवारी (ता.२९) हा दर १०,५०० पर्यंत मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. 

अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत खुल्या पद्धतीची कापूस हर्राशी केली जाते. या बाजारात चालू हंगामात सुमारे पावणेदोन लाख क्विंटलपर्यंत कापूस खरेदी झाली आहे. सध्याही दिवसाला तीन ते साडेतीन हजार क्विंटल कापूस दररोज विक्रीला येत आहे. 

सध्या कापसाचा दर सातत्याने दहा हजारांवर मिळत आहे. अकोटमध्ये जिनिंग उद्योग सक्रिय असल्याने तेथील व्यापारी कापसाची खरेदी करीत असतात. दर योग्य मिळत असल्याने या बाजारात आता अकोला जिल्ह्यासह अमरावती, बुलडाणा व इतर जिल्ह्यांतूनही कापसाची आवक होत आहे. दररोज शेकडो वाहने अकोट बाजार समितीत उभी असल्याची बघायला मिळत आहेत. 

या हंगामातील कापूस विक्री सध्या जोरावर आहे. कापूस राखून ठेवलेल्या शेतकऱ्यांना आता अनेक छोटे व्यापारी खेडा खरेदी करून कापूस अकोट बाजारात विक्रीला आणत आहेत. येथील खुल्या पद्धतीच्या हर्राशीमुळे चांगल्या दर्जाच्या कापसासाठी खरेदीदारांची चढाओढ बघायला मिळते. याच स्पर्धेतून कापूस सध्या दहा हजारांवर विकत आहे. बहुतांश कापूस या दराने जात आहे. चांगल्या दर्जाचा कापूस साडेदहा हजारांवर दर मिळवत आहे. 

अकोट बाजार कापूस विक्रीसाठी आकर्षण  या भागात कापसाला चांगला दर मिळवून देणारा बाजार म्हणून अकोटची ओळख मागील काही वर्षांत तयार झाली आहे. प्रामुख्याने येथील बाजारात स्थानिक व्यापारी मोठ्या संख्येने खरेदीसाठी पुढे आलेले आहेत. येथील जिनिंग उद्योगाला लागणारा कापूस स्थानिक पातळीवरच मिळू लागल्याने खरेदीसाठी व्यापाऱ्यात स्पर्धा लागलेली राहते. त्यातून शेतकऱ्यांच्या कापसाला इतर ठिकाणापेक्षा चांगला दर असल्याचे सांगितले जाते. परिणामी, शेतकरीही वेगवेगळ्या तालुक्यातून या ठिकाणी कापूस विक्रीला आणत आहेत.  

 मानवत कृषी बाजार समितीत  कापूस सरासरी ९९३० रुपयांवर 

परभणी ः मराठवाड्यातील कापसाची प्रसिद्ध बाजारपेठ असलेल्या मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. २९) कापसाची ३००० क्विंटल आवक होती. कापसाला प्रति क्विंटल किमान ८३०० ते कमाल १०,००० रुपये, तर सरासरी ९९३० रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

मानवत बाजार समितीत शुक्रवारी (ता.२८) कापसाची ४००० क्विंटल आवक होती. कापसाला प्रति क्विंटल किमान ८२०० ते कमाल ९९५० रुपये, तर सरासरी ९८६० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता.२७) कापसाची ३६०० क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटलला किमान ८२०० ते कमाल ९९८५ रुपये, तर सरासरी ९८७५ रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता.२५) कापसाची २८०० क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटलला किमान ८३०० ते कमाल ९८९५ रुपये, तर सरासरी ९८०० रुपये दर मिळाले. सोमवारी (ता.२४) कापसाची २५०० क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटलला किमान ८४०० ते कमाल ९८६० रुपये, तर सरासरी ९७४० रुपये दर मिळाले. यंदाच्या (२०२०-२१) हंगामात आजवर एकूण २ लाख ४० हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली, अशी माहिती बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com