शेतशिवारात उरला फक्त पऱ्हाटीचा सांगाडा

माझ्याकडे दहा म्हशी व पाच एकर शेती आहे. पण पाऊस नसला तर कुठलाही उपयोग होत नाही. आता चारा महागला आहे. ज्वारीचा कडबा चार हजार रुपये प्रतिशेकड्यावर आहे. एवढा महाग चारा कसा घेऊ. पशुधनाची संख्या कमी करण्याशिवाय पर्याय नाही. माळरान यंदा तर सप्टेंबरमध्येच उजाड झाले. - गुलाब चैत्राम पाटील, शेतकरी, जानवे (ता. अमळनेर)
जळगाव दुष्काळ
जळगाव दुष्काळ

ज्वारीचे पीक तेवढे यंदा हाती आले आहे. काळ्या कसदार जमिनीतच ज्वारी आली, तिचा उतारा (उत्पादन) मात्र यंदा भरला नाही. ज्वारीवर आता काहीच पेरता येणार नाही, कारण जमिनीत हवा तसा ओलावा नाही. रब्बीचे नियोजन कोलमडले आहे. आमच्या भागातील काळी कसदार जमीन कोरडवाहू गव्हाचे उत्पादन द्यायची. कोरडवाहू दादरचे (ज्वारी) उत्पादनही चांगले यायचे. पण मागील पाच, सहा वर्षे कमी पावसाने रब्बीलाही फटका बसतो. यंदा तर कोरडवाहू रब्बीची पिके मोडून आली आहेत, अशी प्रतिक्रिया जुन्या जळगावचे शेतकरी लीलाधर जगन्नाथ खडके यांनी दिली. जळगाव जिल्ह्यातील शेती हलकी, मध्यम, काळी कसदार प्रकारची आहे. जळगाव, चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगरमध्ये तापी काठावरील भागात स्थिती बरी आहे. चोपडा, जळगाव, अमळनेरमधील अनेक शेतकरी कोरडवाहू ज्वारीचे पीक रब्बीमध्ये घेतात. परंतु यंदा जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने रब्बीचे नियोजन कोलमडले आहे. तर पावसाअभावी कोरडवाहू कापसाच्या क्षेत्रात फक्त पऱ्हाटीचा सापळा दिसत आहे. कोरडवाहू कापूस पिकाचा खेळ संपला आहे. कोरडवाहू क्षेत्र अमळनेर, पाचोरा, पारोळा, भडगाव, चाळीसगाव, जामनेर व बोदवड भागात अधिक आहे. याच भागात पाऊस कमी होता. हे सर्व तालुके दुष्काळी जाहीर झाले आहेत. शेतकऱ्यांना दुष्काळी उपाययोजनांची प्रतीक्षा आहे. या भागात खरीप पिकांची स्थिती अतिशय बिकट झाली आहे. माळरान उजाड झाले आहे. पशुधनाला चराईसाठी कुठे न्यायचे, हा प्रश्‍न आहे.   

दोनच तालुके का वगळले? जिल्ह्यातील धरणगाव व एरंडोल या तालुक्‍यांना दुष्काळी छायेतून वगळले आहे. या भागात ७५ टक्‍क्‍यांवर पाऊस झाल्याने दुष्काळ नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. परंतु या तालुक्‍यांमधील अनेक महसूल मंडळांमध्ये पाऊस ५० टक्केही झाला नाही. प्रत्येक महसूल मंडळातील वस्तिुस्थिती लक्षात घेऊन कार्यवाही करावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. अमळनेर शहरापासून धुळे भागाकडच्या गावांची स्थिती अधिक बिकट आहे. जवखेडा, वावडे, गलवाडे, मुडी, मांडळ, जानवे, मंगरूळ, अंचलवाडी, रणाईचे आदी गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे संकट आहे. लोंढवे (ता. अमळनेर) येथील वृद्ध शेतकरी उत्तम श्रावण पाटील हे शिवारात शेळ्या चराईसाठी फिरत होते. ते म्हणाले, आमच्याकडे कोरडवाहू कापूस अधिक आहे. विहिरी आहेत. पण पाणीच नाही. पूर्वहंगामी कापूस लागवड अतिशय कमी होती. आमच्या गावात दोनच शेतकऱ्यांचा पूर्वहंगामी कापूस आहे. त्यांना उत्पादन बरे आले. परंतु ज्यांचा कोरडवाहू कापूस आहे, त्यांच्या शेतात दोनच वेचण्या होतील. एकरी एक क्विंटलही उत्पादन येणार नाही, अशी स्थिती आहे. आमची शेती आहे. परंतु हंगाम पावसाअभावी वाया गेला. यंदा पाऊस झालाच नाही. मध्यंतरी दोन दिवस रिपरीप पाऊस झाला. नंतर पाऊसच नाही. नदी-नाले वाहून निघाले नाहीत. मी शेळ्या चराईसाठी येतो. महिन्याला घरात आर्थिक मदत मिळावी यासाठी शेळीपालनाशिवाय पर्याय नाही. सकाळी शिवारात जातो. दुपारी घरी परततो. कारण दुपारी शिवारात मन रमत नाही. सर्वत्र कोरड आहे. जानवे येथील कृष्णा साहेबराव पाटील म्हणाले, की माझ्याकडे दोन विहिरी आहेत. पण दोन्ही आटून गेल्या आहेत. कापसाची हंगामी लागवड केली. पाऊस आला असता तर आता कापसाचे सिंचन करता आले असते. त्यासाठी ठिबकही टाकली होती. आमच्याकडे दरवर्षीच दुष्काळ असतो. एकरी दोन क्विंटलही कापूस येणार नाही, अशी स्थिती आहे. गावात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. शेतातही पाणी पुरेसे नाही. ज्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बरी आहे, त्यांनी घरी आरओचे पाणी घ्यायला सुरवात केली आहे. परंतु इतरांचे हाल होत आहेत. अमळनेरातील डांगर, इंदापिंप्री, कावपिंप्री भागातही स्थिती बिकट आहे. शेतकरी पुढील सहा आठ महिने कसे काढतील, अशी भीती कृष्णा पाटील यांनी व्यक्त केली.  पीकविम्याच्या तक्रारी मागील दोन वर्षे सोसायट्यांनी कोरडवाहू शेतीसाठी कापूस पिकाचे विमा हप्ते परस्पर कापून घेतले. परंतु परतावे मिळालेच नाहीत. विमा भरून फायदा काय? आता दुष्काळ जाहीर झाला, तरी शेतकऱ्यांच्या समस्या कायमच. मग प्रशासन रोज खोटे दावे कशाला करते, असा मुद्दा जानवे, अंचलवाडी भागात भेटलेल्या शेतकऱ्यांनी विविध ठिकाणी उपस्थित केला.  पाणीपातळी खालावली अमळनेर, पारोळामधील पश्‍चिम भागातील विहिरींची पाणीपातळी घटली आहे. या भागात पाणीपातळी ०.१५ मीटरपर्यंत खाली गेल्याचे सांगण्यात आले. ज्या शेतकऱ्यांनी लीजवर जमिनी केल्या, ते कर्जबाजारी झाले आहेत. कारण कापसाचे एकरी एक क्विंटलही उत्पादन हाती आलेले नाही. जलयुक्तची कामे रणाईचे, जानवे, पारोळा तालुक्‍यातील इंधवे, जिराळी भागात झाली आहेत. परंतु त्यात जलसंचय झालाच नाही. जूनमध्ये सुरवातीला एकदा जोरदार पाऊस आला. नंतर पाऊसच आला नाही. नदी-नाले खळाळून वाहिलेच नाहीत. जलयुक्त शिवारची कामेही निरुपयोगी ठरल्याचे चित्र या भागात दिसत आहे. अमळनेर व पारोळा तालुका अवर्षणप्रवण असल्याने पशुधनाच्या चाऱ्याचाही प्रश्‍न आहे. पशुधन यंदा जगवायचे कसे, हा प्रश्‍न आहे. कारण ज्वारीचा चारा संपल्यात जमा आहे. दूध उत्पादन करणारी मंडळी या भागात आहेत. त्यांना यंदा महागडा चारा घ्यावा लागेल. पण दुधाला दर परवडणारे नसल्याची प्रतिक्रिया शेतकरी दीपक पाटील (जानवे) यांनी दिली. दूध धंदा परवडत नाही. म्हणून आता या भागातून स्थलांतर वाढत आहे. प्रत्येक कुटुंबातील एक कर्ता मुलगा गुजरातेत नोकरीच्या शोधात जात आहे. यापूर्वीही अनेक जण गुजरातेत नोकरी, कामासाठी स्थलांतरीत झाले आहेत, अशी माहिती मिळाली.  प्रतिक्रिया आम्ही पाच एकर शेती लीजवर केली आहे. परंतु यंदा पाऊस आलाच नाही. मागील वर्षीही अशीच स्थिती होती. विहिरी आटल्या आहेत. जो खर्च केला तो निघणार नाही. एकरी एक क्विंटलच कापूस हाती येईल.  - समाधान राजू वंजारी, युवक, अंचलवाडी (ता. अमळनेर)

आमचा दहा एकर बागायती कापूस आहे. २० मे रोजी लागवड केली होती. सध्या पाणी मिळत आहे. पण पुढे पाणी पुरणार नाही. कारण यंदा पावसाळा हवा तसा झालाच नाही. यंदाचा दुष्काळ अधिक भीषण दिसत आहे.  - विजय वेडू पाटील, शेतकरी, मांडळ (ता. अमळनेर)

माझे दोन बिघे शेत आहे. सोयाबीन पेरला होता. परंतु पावसाअभावी दीड क्विंटलच उत्पादन आले. विहीर आहे, पण पाण्याची हमी नाही. यंदा नदी-नाल्यांना पूरच आला नाही. आमच्याकडील गिरणा नदीला एकदाही पूर आला नाही. पुढचे पाच, सहा महिने कसे निघतील, असा प्रश्‍न आहे.  - चिंधा सोनवणे, शेतकरी, वडनगरी (ता. जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com