खरिपात यंदा कपाशी, रब्बीत गहू चांगले पीक :  भेंडवळचा अंदाज

या हंगामात सर्वसाधारण पाऊसमान राहणार असून, खरिपात कपाशी, तर रब्बीत गव्हाचे पीक चांगले येईल.
bhendwal
bhendwal

भेंडवळ, जि. बुलडाणा ः या हंगामात सर्वसाधारण पाऊसमान राहणार असून, खरिपात कपाशी, तर रब्बीत गव्हाचे पीक चांगले येईल. अवकाळी पावसाचे प्रमाण कमी असेल तर रोगराईचे वर्ष असून देशासमोर आर्थिक अडचणी वाढलेल्या असतील, असा अंदाज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मागील साडेतीनशे वर्षांपेक्षा अधिक काळापासून होत असलेल्या भेंडवळच्या घटमांडणीद्वारे शनिवारी (ता. १५) वर्तविण्यात आले. 

मागील वर्षीपासून कोरोनामुळे ही मांडणी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत केली जात आहे. भेंडवळ येथील चंद्रभान महाराज वाघ यांचे सध्याचे वंशज पुंजाजी वाघ, गजानन वाघ यांच्यासह सारंगधर महाराज वाघ व इतरांनी अक्षय तृतीयेला सायंकाळी भेंडवळ येथे घट मांडणी केली आणि शनिवारी सकाळी सूर्योदयापूर्वी घटमांडणीचे निरीक्षण करीत अंदाज वर्तविले. 

दरवर्षी या मांडणीच्या ठिकाणी अंदाज ऐकण्यासाठी हजारोंची गर्दी होत असते. गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे येथे गर्दी करण्यास मज्जाव करण्यात आला. यंदाही संचारबंदी लागू केलेली असल्याने पाच जणांच्या उपस्थितीत मांडणीचे अंदाज वर्तविण्यात आले. या घटमांडणी अंदाजांच्या आधारे आजही अनेक शेतकरी खरीप व रब्बी हंगामाचे नियोजन करीत असतात. 

यंदा जूनमध्ये साधारण स्वरूपाचा पाऊस असून जुलैत जोरदार असेल. त्यानंतर ऑगस्टमध्ये पाऊस जुलैच्या तुलनेत कमी होईल. सप्टेंबरमध्ये हे प्रमाण आणखी कमी होत जाईल. जूनमध्ये सार्वत्रिक पाऊस होण्याची चिन्हे नसल्याने पेरण्यासुद्धा मागे-पुढे होऊ शकतात. यंदा अवकाळी पावसाचे प्रमाण कमी असून चारा व पाणीटंचाईची शक्यता काही भागांत भेडसावू शकते. 

पीकपरिस्थितीबाबत व्यक्त केलेल्या अंदाजानुसार खरिपात कपाशी, ज्वारीचे पीक चांगले दर्शविले आहे. मूग, उडीद साधारण येईल. तुरीचे पीकही साधारण आहे. तिळाचे पीक चांगले असेल. रब्बी हंगामात गव्हाचे पीक चांगले येईल. हरभऱ्याचे पीक साधारण येणार असले, तरी हरभऱ्याचे दर वाढलेले राहू शकतात. इतर पिके कमी-अधिक प्रमाणात साधारण स्वरूपाची होतील, असे सांगण्यात आले.  रोगराई कायम  सध्याच्या काळात सर्वत्र रोगराई पसरलेली आहे. रोगराईचे प्रमाण आगामी वर्षातही काही प्रमाणात कायम राहील. यामुळे आर्थिक अडचणी आणखी वाढतील. देशासमोर आर्थिक अडचणी वाढणार आहेत. देशाचा राजा म्हणजेच पंतप्रधान कायम असेल, परंतु त्याच्या भोवतीची संकटे वाढलेली असतील.  महिनानिहाय पाऊस  जून ः साधारण  जुलै ः जोरदार  ऑगस्ट ः साधारण  सप्टेंबर ः सर्वसाधारण  अवकाळी ः प्रमाण कमी   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com