उत्तर भारतातील कापूस लागवड पूर्णत्वाकडे

देशात उत्तर भारतातील कापूस लागवडीने वेग घेतला आहे. तेथील पूर्वहंगामी लागवड पुढील ८ ते १० दिवसांत पूर्ण होईल. देशात कापसाखालील क्षेत्रात यंदा किंचित वाढ होऊन क्षेत्र १३० लाख हेक्टरपर्यंत जाऊ शकते.
Cotton cultivation in North India is nearing completion
Cotton cultivation in North India is nearing completion

जळगाव ः देशात उत्तर भारतातील कापूस लागवडीने वेग घेतला आहे. तेथील पूर्वहंगामी लागवड पुढील ८ ते १० दिवसांत पूर्ण होईल. देशात कापसाखालील क्षेत्रात यंदा किंचित वाढ होऊन क्षेत्र १३० लाख हेक्टरपर्यंत जाऊ शकते. तसेच पिकासाठी सर्व बाबी अनुकूल राहिल्या, तर उत्पादनदेखील २०२०-२१ च्या तुलनेत ३० ते ३५ लाख गाठींनी वाढून ३७५ ते ३८० लाख गाठींपर्यंत पोहोचू शकते.

उत्तर भारतात २०२०-२१ मध्ये सुमारे १४ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली होती. यंदाही एवढीच लागवड या भागात होऊ शकते. या भागात कापसाखालील ९५ टक्के क्षेत्र ओलिताखाली असते. लागवड एप्रिलमध्येच या भागात सुरू झाली आहे. पूर्वहंगामी लागवड लवकरच पूर्ण होईल. उत्तर भारतात तेलबिया पिकांखालील क्षेत्रही वाढणार आहे. यामुळे कापसाखालील क्षेत्र या भागात वाढणार नाही. पण क्षेत्र स्थिर राहू शकते.

यंदा गुजरातेत क्षेत्र काहीसे वाढू शकते. तसेच महाराष्ट्र, तेलंगणातही क्षेत्र स्थिर राहील. कारण महाराष्ट्र, तेलंगणात कापूस पिकाला पर्यायी पीक नाही. तसेच कापसाला महाराष्ट्रात सरासरी प्रतिक्विंटल पाच हजार रुपये दर मिळाला. दर स्थिर राहिले. शासनानेदेखील खरेदीला वेग दिला. देशात गेले दोन वर्षे कापूस उत्पादन ३५० लाख गाठींवर गेलेले नाही. कापूस लागवड २०२०-२१ मध्ये देशात १२९ लाख हेक्टरवर झाली. २०१९-२० मध्ये कापूस लागवड १२५ लाख हेक्टर एवढी होती. लागवड वाढली, यामुळे उत्पादन वाढेल. २०२०-२१ मध्ये देशात कापसाचे उत्पादन ३८० लाख गाठींवर जाईल, असा अंदाज विविध संस्थांनी व्यक्त केला होता. परंतु उत्पादन सुमारे ३३० लाख गाठी एवढेच हाती येईल, अशी स्थिती आहे.

देशात उत्तर भारतात कापसाचे उत्पादनही स्थिर राहील. कारण त्या भागात सिंचनाची सुविधा आहे. परंतु देशात इतर भागांत उत्पादन वाढीसंबंधी साशंकता आहे. कारण महाराष्ट्र, तेलंगण, कर्नाटक, गुजरातमधील कापसाखालील मोठे क्षेत्र कोरडवाहू असते. राज्यात कापसाची सुमारे ४३ ते ४३ लाख ६० हजार हेक्टरवर लागवड अपेक्षित आहे. परंतु महाराष्ट्रात कापसाखालील फक्त पाच टक्के क्षेत्रालाच सिंचनाची सुविधा आहे. उर्वरित क्षेत्र कोरडवाहू असणार आहे. तेलंगणातही कापूस पिकाला सिंचनाची सुविधा फारशी नाही. यामुळे या दोन्ही राज्यांमध्ये पावसाच्या भरवशावरच कापूस पीक अवलंबून असणार आहे.

पावसाचा लहरीपणा, अतिपाऊस, गुलाबी बोंड अळीची समस्या आली तर तेलंगण, महाराष्ट्रातील कापूस पिकाला मोठा फटका बसतो. यामुळे नव्या म्हणजेच २०२१-२२ च्या हंगामात कापूस उत्पादन वाढीचा अंदाज पिकाला सर्व बाबी अनुकूल राहिल्या तरच खरा ठरणार आहे, अशी माहिती मिळाली.  

उत्तर भारतात कापसाखालील क्षेत्र फारसे वाढणार नाही. पण क्षेत्र स्थिर राहील. देशात महाराष्ट्र, तेलंगणात कापसाखालील कमाल क्षेत्र कोरडवाहू असते. या भागातील पाऊस व इतर बाबी कशा राहतील, यावर उत्पादनाचा अंदाज आहे. परंतु तूर्त तरी देशात कापूस लागवड किंचित वाढेल व उत्पादन अधिक येईल, असे सांगितले जात आहे. - महेश सारडा, अध्यक्ष, नॉर्थ इंडिया कॉटन असोसिएशन (हरियाना)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com