बिलाची थकीत रक्कम न भरल्यास आता थेट वीजतोडणीची (कनेक्शन कट) कारवाई करण्याचा इशारा महावितरणने राज्
ताज्या घडामोडी
वऱ्हाडात यंदा पांढरे सोने ठरले आतबट्ट्याचे
यंदाच्या खरिपात लागवड केलेले कपाशीचे पीक बहुतांश प्रमाणात बोंड अळी तसेच बोंडसडीच्या तडाख्यात सापडल्याने वऱ्हाडात उत्पादकता सुमारे ५० टक्क्यांपेक्षा कमी आली आहे.
अकोला ः यंदाच्या खरिपात लागवड केलेले कपाशीचे पीक बहुतांश प्रमाणात बोंड अळी तसेच बोंडसडीच्या तडाख्यात सापडल्याने वऱ्हाडात उत्पादकता सुमारे ५० टक्क्यांपेक्षा कमी आली आहे. बहुतांश शेतकऱ्यांना एकरी पाच क्विंटलपेक्षा अधिक कापूस झालेला नाही. सध्या अनेकांनी कपाशी उपटून रब्बीत दुसरे पीक घेण्याची तयारी सुरू केली आहे. तीन हंगामानंतर यंदा बोंड अळीचे संकट वाढले असून, पुढील वेळी कापूस क्षेत्रात घटीची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.
यंदाच्या खरिपात वऱ्हाडात कुठलेच पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर राहिलेले नाही. त्यातही कापूस, सोयाबीनसारख्या प्रमुख पिकांना अतिवृष्टी, किडींचा तडाखा बसल्याने हा उत्पादक आर्थिक संकटात सापडला.
अकोला जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात सरासरी १ लाख ५५ हजार ६८७ हेक्टरच्या तुलनेत १ लाख ४३ हजार ३१९ हेक्टरवर पेरणी झाली होती. बुलडाणा जिल्ह्यात सरासरी १६८८७९ च्या तुलनेत ११८ टक्के म्हणजे १ लाख ९८ हजार ४४७ हेक्टरवर पेरणी झाली. तर वाशीम जिल्ह्यात सरासरी १९२४५ च्या तुलनेत १४६ टक्के म्हणजेच २८१४७ हेक्टरवर पेरणी झाली होती. वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांत शेतकऱ्यांनी कपाशी पिकाला पसंती दिली होती. याला गेल्या वर्षात मिळालेला दर कारणीभूत ठरला होता.
यंदा तर पाऊसमान चांगले राहिल्याने, तसेच पीकही जोमदार दिसल्याने शेतकरी उत्साही होते. परंतु कपाशीच्या झाडांवर बोंड परिपक्व होऊ लागताच त्यावर मोठ्या प्रमाणात बोंड अळी वाढली. परतीच्या पावसाने सलग काही दिवस ढगाळ वातावरण बनलेले होते. यामुळे बोंडसडही निर्माण झाली. या दोन्ही बाबी कपाशीच्या क्षेत्रासाठी बाधक ठरल्या. यंदा कीडनियंत्रणासाठी प्रत्येक शेतकऱ्याला चारपेक्षा अधिक फवारण्या कपाशीवर कराव्या लागल्या.
यामुळे खत, कीडनाशक, फवारणी असा व्यवस्थापनाचा खर्च २० हजारांवर गेला. त्या तुलनेने उत्पादन तीन ते पाच क्विंटलदरम्यान राहिल्याने लावलेल्या खर्चाची बरोबरीही अनेकांना झालेली नाही. ज्या शेतात गेल्या हंगामात ८ ते १० क्विंटल कापूस झाला तेथे अर्धेच उत्पादन आले. आता दिवाळीनंतरच शेतकऱ्यांनी प्रतीक्षा न करता कपाशीची उलंगवाडी केली आहे. कुठे शेवटची वेचणी केली जात आहे तर कुठे कपाशी उपटून रब्बीतील दुसऱ्या पिकाची तयारी सुरू झाली आहे.