कपाशीचा झाला झाडा, शेतात नुसत्या पऱ्हाटी

यंदा दोन एकरांवरील पीक पावसात भिजल्याने कपाशीची बोंडे झाडावरच नासून गेली. त्यानंतर एकच वेचणी झाली. तीन क्विंटल कापूस निघाला. पऱ्हाटी उपटून ज्वारीची पेरणी केली. - अरुण जाधव, कुडली, जि. नांदेड आधी अतिवृष्टीमुळे पातेगळ, बोंडगळ होऊन नुकसान झाले. त्यानंतर वेचणीसाठी दरवाढ करूनही मजूर मिळाले नाहीत. एकच वेचणी झाली. तीन एकरांत आठ क्विंटल कापूस निघाला. बाजारात भाव कमी मिळत आहेत. दुहेरी नुकसान झाले. - वैजनाथ मालकर, सारोळा बुद्रुक, जि. परभणी दोन एकरांत दरवर्षी २० क्विंटलपर्यंत कापूस निघतो. यंदा पहिल्या वेचणीस चार क्विंटल निघला. अजून जेमतेम एखादी वेचणी होईल. पहिल्यापेक्षा कमीच कापूस निघेल. - दिलीप दराडे,अनखळी-पोटा,जि. हिंगोली जिरायती क्षेत्रातील कापूस हंगाम लवकर संपेल. परंतु, पुढील वर्षी गुलाबी बोंड अळीचा बागायती क्षेत्रातील शेतकऱ्यांनी फरदड कपाशीचे उत्पादन घेऊ नये. - डॉ. के. एस. बेग, शास्त्रज्ञ, कापूस संशोधन केंद्र, नांदेड
Cotton empty, just down the field
Cotton empty, just down the field

नांदेड :  नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील बहुतांश भागात झाडावरील सर्व बोंडे फुटल्यामुळे कपाशीचा लवकरच झाडा झाला आहे. वेचणीनंतर शेतामध्ये केवळ पऱ्हाटी उभी आहे. जिरायती क्षेत्रातील कापूस हंगाम यंदा लवकरच संपुष्टात आला. परिणामी, उत्पादनात घट झाली. खुल्या बाजारात कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत. उत्पादन घट आणि कमी बाजारभाव, असा दुहेरी फटका बसल्याने कापूस उत्पादकांचे अर्थकारण बिघडले आहे.

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र ६ लाख ३१ हजार ४६० हेक्टर आहे. त्यापैकी यंदा केवळ ४ लाख ८१ हजार १३७ हेक्टरवर लागवड झाली. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे लवकर लागवड केलेल्या कपाशीच्या पिकांत पाणी साचून राहिले. पहिल्या बहाराची वजनदार बोंडे सडून गेली. त्यानंतर मध्यंतरी काही दिवस उघडीप दिलेल्या कालावधीत बोंडे फुटली. परंतु, सततच्या पावसामुळे बोंडातील कापूस झाडावरच भिजला. सरकीला कोंब फुटले. पिवळा पडल्याने कापसाची प्रत खराब झाली. नोव्हेंबर महिन्यात पावसाने उघडीप दिली. परंतु, सोयाबीन काढणीची कामे आणि कापूस वेचणीची कामे एकाच वेळी आली. त्यामुळे वेचणीसाठी मजूर मिळाले नाहीत.

तब्बल महिनाभराहून अधिक कालावधीत झाडावरील सर्व बोंडे फुटून निघाली. बहुतांश भागात जिरायती क्षेत्रातील कापसाची एकच वेचणी झाली. वेचणीनंतर झाडाला नवती फुटली नाही. नुसत्या नख्या शिल्लक राहिल्याने शेतामध्ये पऱ्हाटी उभी आहे. यंदा पहिल्या बहाराच्या बोंडांचे पावसामुळे नुकसान झाले. बागायती क्षेत्रातील भारी जमिनीवरील कपाशीला नवती फुटत आहे. परंतु, बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे नुकसान होत आहे. त्यामुळे यंदा सिंचनासाठी पाणी असल्यामुळे शेतकरी कपाशीचे पीक उपटून हरभरा, गहू, ज्वारीची पेरणी, ऊस लागवड करीत आहेत.

दरवर्षी जिरायती क्षेत्रात जानेवारी महिन्यापर्यंत, तर बागायती क्षेत्रात फेब्रुवारी, मार्च महिन्यापर्यंत कापूस वेचणी हंगाम सुरू राहतो. परंतु, यंदा नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यातच तो संपुष्टात आला आहे.

वेचणीअभावी दीर्घकाळ कापूस झाडावरच राहिल्याने उत्पादनात मोठी घट येत आहे. खुल्या बाजारात हमीभावापेक्षा प्रतिक्विंटलमागे हजार ते दीड हजार रुपये कमी दराने खरेदी केली जात आहे. त्यामुळे यंदा उत्पादनातील घट, कमी बाजार, वाढलेला उत्पादन खर्च, यामुळे नुकसान झाले. त्यामुळे कापूस उत्पादकांचे अर्थकारण बिघडले आहे.

कापूस लागवड स्थिती (हेक्टरमध्ये)

जिल्हा सर्वसाधारण क्षेत्र लागवड क्षेत्र टक्केवारी
नांदेड ३४१३४९ २३१८१०  ६७.९१
परभणी २०९४८०  २०२३१६ ९६.५८
हिंगोली ८०६३१ ४७०११ ५८.३०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com