सिंदीत कापसाला ९९०० रुपयांचा दर

संततधार पाऊस, बोंड अळी व बोंडसडीच्या प्रादुर्भावामुळे कापसाच्या उत्पादकतेवर परिणाम झाला आहे. परिणामी, कापसाच्या दरात हमीभावापेक्षा तेजी अनुभवली जात आहे.
Cotton got good price in Sindi Bazar Samiti
Cotton got good price in Sindi Bazar Samiti

पुणे ः संततधार पाऊस, बोंड अळी व बोंडसडीच्या प्रादुर्भावामुळे कापसाच्या उत्पादकतेवर परिणाम झाला आहे. परिणामी, कापसाच्या दरात हमीभावापेक्षा तेजी अनुभवली जात आहे. सिंदी (रेल्वे) बाजार समितीत गेल्या पंधरवाड्यापासून ९५०० रुपये दराने कापसाचे व्यवहार होत आहेत. शुक्रवारी (ता. ३१ डिसेंबर) एका गाडीतील वीस क्विंटल कापसाला विक्रमी ९९०० रुपयांचा दर मिळाला. शनिवारीही (ता.१) सरासरी दर ९७०५ इतका होता. देशात गेल्या हंगामात सोयाबीनचे दर विक्रमी दहा हजारांच्या पुढे गेले होते. त्यामुळे देशासह महाराष्ट्रात देखील शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीला पसंती दिली. परिणामी महाराष्ट्रात सरासरी ४२ ते ४३ लाख हेक्टरवर कापसाची लागवड होत असताना गेल्या खरिपात हे क्षेत्र ३८ लाख हेक्टरपर्यंत मर्यादित राहिले. सोयाबीन लागवड क्षेत्र मात्र ४३ लाख हेक्टरच्या पुढे गेले होते. कापसाचे क्षेत्र कमी झाल्याने उत्पादन कमी होणार हे निश्‍चित असतानाच विविध कीड, रोगांचा प्रादुर्भाव देखील उत्पादकतेवर झाला. या सर्वांचा परिणाम म्हणून खुल्या बाजारात कापसाचे दर हमीभावापेक्षा दुप्पट राहतील, असे अंदाज जाणकारांनी पूर्वीपासूनच बांधले होते.  त्यानुसार प्रक्रिया उद्योजकांची मागणी वाढल्याने कापसाचे दर १० हजार रुपये प्रति क्विंटल वर पोहोचले आहेत. वर्धा जिल्ह्यात मोठ्या संख्येने जिनिंग व्यवसाय आहेत. त्या सोबतच कापसावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांची संख्यादेखील या भागात मोठी आहे. याच कारणामुळे सिंदी बाजार समितीत कापसाला ९५०० रुपयांचा दर मिळत आहे. शुक्रवारी (ता. ३१ डिसेंबर) हेच दर ९९०० रुपयांवर पोहोचले. एका गाडीतील वीस क्विंटल कापसाला हा दर मिळाल्याचे बाजार समिती सूत्रांनी सांगितले. सध्या सिंदी बाजार समितीत कापसाचे सरासरी दर ९६०० रुपयांवर स्थिरावले आहेत.

प्रतिक्रिया खेडा खरेदीत अनेक कारणे सांगून व्यापाऱ्यांकडून कमी मोबदला देत शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकार होत आहेत. ते टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी बाजार समितीत कापूस विक्रीसाठी आणला पाहिजे. बाजार समितीत शुक्रवारी ९९०० रुपयांचा विक्रमी दर मिळाला. येत्या काळात कापूस दरात आणखी तेजी शक्यता आहे.  - सुफी, सचिव, बाजार समिती सिंदी (रेल्वे) कापसाचा हमीभाव ६०२५ रुपये आहे. मात्र उत्पादन घटल्याने कापसाचे दर दहा हजारांपेक्षा अधिक राहतील, असे या पूर्वीच सांगितले आहे. याच कारणामुळे सीसीआयने देखील या वर्षाच्या हंगामात हमीभावाने खरेदी न करण्याचा निर्णय घेतला. खुल्या बाजारात कापसाचे दर अधिक असल्याने सीसीआय केंद्रावर कापसाची आवक झाली नसती, त्यामुळे हा निर्णय सीसीआयकडून घेण्यात आला. कापसात रुईचा उतारा हा घटक महत्त्वाचा ठरतो. सध्या रुईला चांगली दर आहेत. त्यामुळे देखील कापूस दरात तेजी आली आहे.  - गोविंद वैराळे, कापूस विषयाचे ज्येष्ठ अभ्यासक

खुल्या लिलाव पद्धतीने बोली लावून बाजार समितीत कापसाचे व्यवहार होत आहे. परिसरातील सात जिनिंग व्यावसायिकांकडून ही खरेदी होते, त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळत आहे.  -विद्याधर वानखडे, सभापती,  सिंदी रेल्वे बाजार समिती, ​वर्धा ............

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com