चीनसह बांगलादेशची कापूस आयात वाढणार

कापूस व्यापारासाठी नवा कापूस हंगाम अतिशय चांगला राहील. कारण चीन यंदा आयात कोटा वाढविल, याची खात्री वाटते. चीनचा संरक्षित साठा कमी झाला आहे. त्यांची गरज मोठी आहे. आजघडीला भारतीय रुई चीनला परवडणारी आहे. कारण अमेरिकेशी त्यांचे संबंध अजूनही सुधारलेले नाही. बांगलादेशातही मोठी कापूस निर्यात होईल. शिवाय भारतीय रुईचा दर्जा यंदा चांगला राहील. कारण पावसामुळे सध्या कुठेही नुकसान झालेले नाही. गुलाबी बोंड अळीही नियंत्रणातच आहे. - दिनेश हेगडे, कापूस निर्यातदार, मुंबई
कापूस आयात
कापूस आयात

जळगाव ः देशात आॅगस्टअखेर ११२ लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड झाली आहे. महाराष्ट्रासह गुजरातेतही सद्यःस्थितीत बोंड अळी नसल्याने दर्जेदार रुईची निर्मिती दिवाळीला सुरू होईल. याच वेळी चीन यंदा आपली कापूस आयात २५ लाख गाठींवरून ८० ते ९० लाख गाठींपर्यंत करण्याच्या तयारीत आहे. बांगलादेशही जवळपास ४० ते ५० लाख लाख गाठी एकट्या भारतातून खरेदी करील, अशी स्थिती आहे. तर पुढील हंगामात जवळपास ८० लाख गाठींची निर्यात भारतातून होईल. अर्थातच मागील पाच वर्षांमधील सर्वात मोठी कापूस निर्यात भारतातून होईल, असे संकेत जाणकारांकडून मिळाले आहेत.  चीनमध्ये जिझियांग प्रांतात कापसाचे क्षेत्र अधिक असते. नेमक्‍या याच भागात कापूस पिकाची स्थिती फारशी सकारात्मक नव्हती. चीनमध्ये ३१ लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड झाली आहे. चीनकडे ६ कोटी (एक गाठ १७० किलो रुई) संरक्षित साठा होता. तर मागील हंगामात (२०१७-१८) तेथे जवळपास ३५३ लाख गाठींचे उत्पादन हाती आले. तेथे कापसाचा पुरवठा नोव्हेंबरमध्ये अपेक्षित आहे. परंतु उत्पादन कमी येईल, अशी स्थिती आहे. चीनला दरवर्षी ७०० लाख गाठींची गरज आहे. कारण चीनमध्ये वस्त्रोद्योग मोठा असून, दरवर्षी जगात सर्वाधीक किमान सात हजार कोटी किलोग्रॅम सुताचे उत्पादन तेथे घेतले जाते. चीनच्या कापडाला युरोपात मोठी बाजारपेठ आहे. चीनमध्ये यंदाही सुमारे ३५० लाख गाठींपर्यंत उत्पादन येईल. उर्वरित गरज चीन आपल्या संरक्षित गाठींच्या साठ्यातून भागवेल. संरक्षित साठा कमी होत असल्याने चीन मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास ६५ लाख गाठींची अधिक आयात करील.  चीन व अमेरिकेतील संबंध ताणलेले असल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपया फारसा मजबूत नसल्याने भारतीय रुईला चीन पुढील हंगामात (२०१८-१९) पसंती देईल. कारण भारतीय रुई दर्जेदार असेल. सोबतच ती ऑस्ट्रेलिया, अमेरिकेच्या कापसाच्या तुलनेत स्वस्त पडेल, अशी स्थिती आहे. चीनने २०१७-१८ मध्ये फक्त २५ लाख गाठींच्या आयातीचा निर्णय जाहीर केला होता. तेथे भारतातून जवळपास आठ लाख गाठींची निर्यात ऑगस्ट २०१८ अखेर झाली आहे. नंतर संरक्षित साठा कमी होत असतानाच अमेरिकेशी संबंध ताणले गेल्याने चीनने आयात वाढविली. २०१७-१८ चे कापूस व्यापाराचे वर्ष येत्या ३० सप्टेंबर रोजी संपणार आहे. नवा कापूस व्यापाराचा हंगाम १ ऑक्‍टोबर २०१८ ला सुरू होईल. अर्थातच ऑक्‍टोबरमध्ये चीन आपले कापूस आयात धोरण, गरज यासंबंधीची माहिती जाहीर करील, अशी माहिती मिळाली. 

बांगलादेशची भारतालाच पसंती बांगलादेश जगातील सर्वात मोठा कापूस किंवा रुईचा आयातदार देश आहे. तेथे कापूस उत्पादन अत्यल्प किंवा अपवादानेच आहे. तर वस्त्रोद्योग मोठा आहे. तो आयातीवर निर्भर असून, बांगलादेशला भारतातून कापूस आयात रस्ते व समुद्रीमार्गे सुकर असल्याने आणि इतर देशांच्या तुलनेत स्वस्त पडत असल्याने बांगलादेश भारतीय रुईलाच यंदाही पसंती देईल. तेथे २०१७-१८ मध्ये जुलैअखेरपर्यंत जवळपास ४५ लाख गाठींची निर्यात भारतातून झाली आहे. बांगलादेश आयात वाढविणार आहे. तेथे भारताला पुढील हंगामातही जवळपास ५० लाख गाठींची निर्यात करायला यंदा संधी आहे.

जागतिक उत्पादन घटीची चिंता २०१७-१८ मध्ये २६.८७ दशलक्ष टन कापसाचे जगभरात उत्पादन होण्याची शक्‍यता आहे. तर भारतातील कापसाखालील घटलेले क्षेत्र, चीनमधील कापूस उत्पादक प्रांतांमधील नकारात्मक स्थिती व लांबणीवर पडलेले उत्पादन आणि अमेरिकेतील टेक्‍सास, जॉर्जिया भागातील कापूस पिकावरील संकटे लक्षात घेता २०१८-१९ मध्ये कापसाचे उत्पादन २५.८९ दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत येऊ शकते. ही चिंता चीनला अधिक सतावत आहे. यामुळे चीन यंदा आयातीचे धोरण लवकर जाहीर करू शकतो, असे सांगितले जात आहे. तेथील काही सूत खरेदीदारांनी महाराष्ट्रातील निर्यातदारांशी मध्यंतरी संपर्क साधून आयातीसंबंधी चर्चाही केली. तर मध्यांचल (महाराष्ट्र, मध्य प्रदेश) व गुजरात भागातील काही जिनर्स व सूत उत्पादकांनी चीन, सिंगापुरात भेट देऊन काही बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्याची माहिती मिळाली.  बोंड अळीचा धोका टळला देशात कर्नाटकात वेचणी सुरू झाली. हरियाणा, पंजाब व राजस्थानात मागील वर्षाप्रमाणे वेचणी वेळेत सुरू झाली आहे. तेथे उत्पादन कमी येणार असले तरी कापसाचा दर्जा चांगला आहे. बोंड अळी तेथे नाही. गुजरातेतही बोंड अळीचे संकट नाही. तर महाराष्ट्रातही पूर्वहंगामी कापूस उत्पादन घेणाऱ्या खानदेश, मराठवाडा, विदर्भातील काही भागात येत्या १५ ते २० दिवसांत कापूस वेचणी काही प्रमाणात सुरू होईल. महाराष्ट्रातही पहिल्या वेचणीला गुलाबी बोंड अळीचे संकट दिसत नसल्याची स्थिती आहे. यामुळे रुईचा दर्जा चांगला असेल. पण या महिन्यात पाऊस आला तर महाराष्ट्रातील वेचणी लांबणीवर पडेल. उत्पादनही पुढे २० ते ३० दिवस उशिरा येईल, असा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com