देशात १२७ लाख हेक्टरवर कपाशी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : देशातील कापूस लागवडीचा कालावधी संपला असून, लागवड आटोपली आहे. कापाशी पिकाची आत्तापर्यंत १२७ लाख हेक्टरवर लागवड झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ५.३ टक्के क्षेत्र वाढले आहे. महाराष्ट्रात लागवड ६.३ टक्क्यांनी वाढून सर्वाधिक ४३ लाख ८३ हजार ७०० हेक्टरवर झाली. तर मध्य प्रदेशात १२.६ टक्क्यांनी लागवड घटून सहा लाख ९ हजार हेक्टर क्षेत्र कपाशीखाली आले, अशी माहिती केंद्रीय कृषी विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून मिळाली.  

हंगामाच्या सुरवातीला कापाशी लागवड माघारली होती. त्याचे प्रमुख कारण अपर्याप्त पाऊस आणि दुष्काळ होते. परंतु, ऑगस्ट महिन्यात मॉन्सूनने जोर धरला आणि देशातील जवळपास सर्वच भागांत हजेरी लावली. त्यामुळे लागवडीने जोर धरला आणि सुरवातीला लागवडीत घटीचा वर्तविण्यात येणारा अंदाज केवळ चुकीचाच ठरला नाही, तर लागवड सरसरी क्षेत्राच्या पुढे झाली. यंदा गुजरात आणि मध्य प्रदेशाचा अपवाद वगळता ऑगस्टनंतर जवळपास सर्वच राज्यांमध्ये लागवड वाढली आहे.

मागील पाच वर्षांचा विचार करता सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत देशात कपाशी लागवडीची सरासरी ही ११७ लाख हेक्टर आहे. परंतु, यंदा लागवड क्षेत्र तब्बल १० लाख हेक्टरने वाढले आहे. 

यंदा पावसाने दडी दिल्यानंतर गुजरात आणि मध्य प्रदेशात कापूस लागवडीत घट झाली आहे. गुजरातमध्ये कपाशीखालील क्षेत्र १.५ टक्क्यांनी घटले. ‘‘मध्य प्रदेशात कापूस लागवड १२.६ टक्क्यांनी घटून सहा लाख ९ हजार हेक्टरवर आली. मध्य प्रदेशात गेल्या हंगामात सोयाबीन आणि मका पिकाला चांगला दर मिळाला होता. त्यामुळे येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन आणि मका लागवडीला प्राधान्य दिल्याचे दिसते,’’ अशी माहिती मध्य प्रदेश कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.   

महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कपाशी पिकावर झाला होता. त्यामुळे लागवड सरासरी क्षेत्राच्या पुढे होईल, अशी शक्यता कमी होती. मात्र यंदा ६.४ टक्क्यांनी कपाशी लागवड क्षेत्र वाढले आहे. राज्यात आत्तापर्यंत ४३ लाख ८३ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर कापूस आहे. गुजरात आणि महाराष्ट्राचा विचार करता देशातील जवळपास ५५ ते ६० टक्के कापूस उत्पादन या दोन राज्यांमध्येच होते.    उत्तर भारतात आवक सुरू कापूस बाजाराचा हंगाम हा दिवाळीनंतर जोमात असतो. परंतु, काही राज्यांमध्ये लागवड लवकर झाली असल्याने काही प्रमाणात सप्टेंबर महिन्यातच बाजार कापसाने फुलू लागतात. सध्या उत्तर भारतातील काही राज्यांमधील बाजारांमध्ये कमी प्रमाणात का होईना कापूस आवक सुरू झाली आहे. तर उत्तर राज्यांमध्ये कापूस वेचणी ही ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापासून सुरू होते. त्यानंतर कापूस बाजारात विक्रीसाठी येतो.   

राज्यनिहाय कापूस लागवड क्षेत्र (हेक्टरमध्ये)
राज्य २०१९-२० २०१९-१९ बदल (टक्के)
आंध्र प्रदेश ६,२०,००० ५,५१,०००  १२.५
तेलंगणा  १८,५९,५०० १७,९४,३०० ३.६ 
गुजरात  २६,६६,८०० २७,०८,६०० (-) १.५ 
हरियाना   ७,०१,००० ६,६५,०००  ५.४
कर्नाटक ५,७५,४०० ५,४८,००० ५.०
मध्य प्रदेश   ६,०९,००० ६,९७,००० (-) १२.६
महाराष्ट्र  ४३,८३,७०० ४१,२३,३०० ६.३
ओडिशा  १,६९,६०० १,५७,९०० ७.४
पंजाब ४,०२,००० २,८४,०००  ४१.५ 
राजस्थान ६,४४,५०० ४,९६,१००  २९.९
तमिळनाडू ५०,१०० २१,७०० १३०.९
इतर   २७,१०० १७,२०० ५७.६
एकूण  १२७,०८,६००  १२०,६४,१०० ५.३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com