कापूस दरात सुधारणा, सरकीच्या दरातही वाढ

कापूस दरात सुधारणा, सरकीच्या दरातही वाढ
कापूस दरात सुधारणा, सरकीच्या दरातही वाढ

जळगाव : नवा कापूस हंगाम सुरू होऊन तीन महिने पूर्ण होऊन देशभरात १३० लाख गाठींची आवक झाली आहे. अर्थातच देशांतर्गत बाजारात या हंगामात २० लाख गाठींनी कापसाची आवक घटली आहे. मागील म्हणजेच २०१७-१८ च्या हंगामात डिसेंबर २०१७ अखेर जवळपास १५० लाख गाठींची आवक झाली होती. कापूस गाठींच्या उत्पादनात घटीचे स्पष्ट संकेत यातून मिळत असतानाच कापसाच्या दरात सरत्या वर्षात क्विंटलमागे १०० ते १२५ रुपयांनी वाढ झाली आहे.  गुजरात व महाराष्ट्र या प्रमुख कापूस उत्पादक राज्यांना दुष्काळ व इतर अडचणींचा सामना या हंगामात करावा लागला असून, गुजरातेत तब्बल १८ ते २० लाख तर राज्यात १० ते १५ लाख गाठींनी कापसाचे कमी उत्पादन येईल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला होता. आजघडीला कापूस गाठींची आवक झाली आहे, त्यानुसार जाणकारांचा उत्पादनातील घटीचा अंदाज खरा ठरताना दिसत आहे. जिनिंगना दर्जेदार कापूस मिळत असला तरी कापूस टंचाईचा सामना जिनिंगसमोर कायम आहे. कारण कापूस घटीचा अंदाज येताच गुजरातमधील कापसासंबंधीच्या प्रक्रिया उद्योजकांनी महाराष्ट्र व तेलंगणातून कापसाची आयात केली.  राज्यात अगदी मध्य, पश्‍चिम विदर्भापर्यंत गुजरातमधील एजंट कापूस खरेदीसाठी सक्रिय आहेत. अशातही परदेशातील कापूस निर्यात रखडत सुरू असल्याने रुई व सुताच्या दरांवर दबाव होता. हा दबाव सरत्या वर्षात काहीसा कमी झाला असून, सरकीच्या दरात मागील काही दिवसात क्विंटलमागे किमान ५० रुपयांनी तर कापसाच्या दरात क्विंटलमागे १०० ते १२५ रुपयांनी वाढ झाली आहे. सरकीचे दर २२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. खंडीचे (३५६ किलो रुई) दर मात्र न्यूयॉर्क वायदामध्ये फारशी दरवाढ दिसत नसल्याने स्थिर असून, ते ४२५०० ते ४३५०० रुपये असे आहेत.  उत्तरेकडील राज्यांची आघाडी कापूस उत्पादनात यंदा उत्तरेकडील राज्यांनी (नॉर्थ झोन) काहीशी आघाडी घेतल्याने कापूस उत्पादनातील घटीसंबंधी ही राज्ये मोठी भर काढतील, असे प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार दिसते. पंजाबमध्ये सरत्या वर्षात (३१ डिसेंबर, २०१८) पाच लाख गाठी (एक गाठ १७० किलो रुई), हरियाणात १५ लाख, राजस्थानमध्ये १४ लाख व मध्य प्रदेशात ११ लाख गाठींचे उत्पादन झाले आहे. कापूस लागवडीत आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रात १७ लाख, गुजरातेत २१ लाख गाठींचे उत्पादन झाले. तर दाक्षिणात्य राज्यांमध्ये आंध्र प्रदेशात तीन लाख, तेलंगणात १० लाख आणि कर्नाटकातही सुमारे तीन लाख गाठींचे उत्पादन किंवा आवक झाली आहे. ही आकडेवारी लक्षात घेतली तर उत्तरेकडील राज्यांमध्ये महाराष्ट्र, गुजरातपेक्षा अधिक उत्पादन आजघडीला झालेले दिसत आहे. परंतु पुढे महाराष्ट्र व गुजरातमधील कापूस गाठींचे उत्पादन अधिक असेल, असे सूत्रांनी सांगितले.  उत्पादन ३३० ते ३४० लाख गाठींचेच येणार कापूस गाठींची आवक लक्षात घेता देशात यंदा ३३० ते ३४० लाख गाठींचे उत्पादन या कापूस हंगामात (ऑक्‍टोबर, २०१८ ते सप्टेंबर, २०१९) येईल, असे निश्‍चित मानले जात आहे. हंगाम पूर्ण होण्यास आणखी नऊ महिने राहिले असून, मध्य भारतात मार्चमध्ये जिनिंग प्रेसिंग कारखान्यांमध्ये अधिक गतीने, क्षमतेने सुरू होतील, असा अंदाज खानदेश जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद जैन यांनी व्यक्त केला.    कापूस बाजार काहीसा सावरताना दिसत आहे. निर्यातीला आता चालना मिळत आहे. पण कापूस गाठींची आवक रखडत सुरू असून, मागील हंगामाच्या तुलनेत २० लाख गाठींनी आवक घटली आहे. सरकीचे दर वधारल्याने कापसाच्या दरातही क्विंटलमागे किमान १०० रुपयांची सुधारणा दिसत आहे.  - अरविंद जैन, माजी अध्यक्ष,  खानदेश जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com