कापसाचे दर राहतील ७००० रुपयांच्या पुढे ः विजय जावंधिया

जागतिक बाजारात १९९४ व २०११ नंतर पहिल्यांदाच कापसात तेजी अनुभवली जात आहे. त्याच कारणामुळे यावर्षी भारतात कापसाचे दर ७००० रुपये प्रती क्‍विंटलपेक्षा अधिक राहण्याची शक्‍यता शेती प्रश्‍नाचे ज्येष्ठ अभ्यासक विजय जावंधिया यांनी वर्तविली आहे.
Cotton prices will remain above Rs 7,000
Cotton prices will remain above Rs 7,000

नागपूर ः जागतिक बाजारात १९९४ व २०११ नंतर पहिल्यांदाच कापसात तेजी अनुभवली जात आहे. त्याच कारणामुळे यावर्षी भारतात कापसाचे दर ७००० रुपये प्रती क्‍विंटलपेक्षा अधिक राहण्याची शक्‍यता शेती प्रश्‍नाचे ज्येष्ठ अभ्यासक विजय जावंधिया यांनी वर्तविली आहे. 

१९९४ साली जागतिक बाजारात एक पाऊंड रुईचा दर एक डॉलर प्रती दहा सेंट प्रती पाऊंड होता. २०११ साली तो विक्रमी दोन डॉलर १४ सेंट प्रती पाऊंडच्या स्तरापर्यंत पोचला. १९९५ नंतर जागतिक बाजारात कापसाचे दरात मंदी होती व ते ४० सेंट प्रती पाऊंड पर्यंत खाली घसरले होते. त्यामुळेच १९९७ ते २००३ पर्यंत भारतात ११० लक्ष कापूस गाठींची आयात झाली होती. त्यानंतर हे दर २०१९ पर्यंत ७० सेंट ते एक डॉलर प्रती पाऊंड दरम्यानच राहिले. १९९४ साली डॉलरचा विनिमय दर ३३-३४ रुपये असा होता. म्हणून भारतात कापसाचे दर २५०० रुपये प्रती क्‍विंटल होते. २०११ साली देखील डॉलर आणि रुपयाच्या विनिमय दरात जास्त अंतर नव्हते. त्यावेळी विनिमय दर ५५ रुपये असा होता. त्याच्या परिणामी देखील कापसात तेजी अनुभवण्यात आली. ६००० ते ७५०० रुपयांपर्यंत कापसाचे दर २०११ मध्ये पोचले होते. 

आजचा अमेरिकेतील कापसाचा दर एक डॉलर १३ सेंट ते एक डॉलर १५ सेंट प्रती पाऊंड रुई असा आहे. त्याचवेळी विनिमय दर ७४ रुपये इतका आहे. २०२०-२१ या हंगामात हेच भाव ८० सेंट ते एक डॉलर प्रती पाऊंडचे होते. परंतु २०२१ या वर्षातील हंगामाच्या सुरुवातीपासूनच हे भाव एक डॉलर १० सेंट ते १ डॉलर प्रती पाऊंड आहेत. पंजाब, राजस्थान, हरियाना या राज्यांमध्ये कापसाची मोठ्या प्रमाणात आवक बाजारात सुरू झाली आहे. ६५०० ते ७२०० रुपये असा प्रती क्‍विंटलला दर मिळत आहे. भारतात व अमेरिकेत यावर्षी कापसाची उत्पादकता कमी होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. त्यामुळेच हे दर कायम राहण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. डॉलरमध्ये झालेली वाढ त्याचवेळी रुपयाचे झालेले अवमूल्यन यामुळे हंगामात सात हजार रुपये क्‍विंटलपेक्षा अधिकचाच दर कापूस उत्पादकांना मिळेल, असा दावा विजय जावंधिया यांनी केला आहे.

कापसातील तेजी ही तीन कृषी कायद्यांच्या परिणामी आल्याचा भ्रम निर्माण केला जात आहे. मात्र, तसे काहीही नसून जागतिक बाजारात कापसाची आवक कमी असल्याने दरातील ही तेजी आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन हे देखील एक कारण त्यामागे आहे.  - विजय जावंधिया, शेती प्रश्‍नाचे ज्येष्ठ अभ्यासक

असा आहे ताळेबंद 

  • एक क्‍विंटल कापसापासून ३४ किलो रुई व ६४ किलो सरकी मिळते.
  • १ डॉलर १५ सेंट १ पाऊंड रुईचा भाव (१८७ किलो रुई). 
  • ३४ किलो रुईचे (१८७ x ३४) = ६३६३. 
  • ६४ किलो सरकीचे ३० रुपये प्रती किलोप्रमाणे १९२० रुपये 
  • १ क्‍विंटल कापसाचे ६३६३ + १९२० = ८२५० 
  • प्रक्रिया खर्च व व्यापारी नफा १२५० रुपये वजा केले तर ७००० रुपये होतात.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com