कापूस खरेदी
कापूस खरेदी

परभणी विभागात १३ लाख क्विंटल कापूस खरेदी

परभणी : २०१७-१८ मधील कापूस खरेदी हंगामात शनिवारपर्यंत (ता. ३१) राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघाच्या परभणी विभागांतर्गत असलेल्या परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पणन महासंघ, सीसीआय, खासगी व्यापारी यांची मिळून एकूण १२ लाख ९७ हजार ९३७ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मार्चअखेरपर्यंतच्या कापूस खरेदीमध्ये दोन जिल्ह्यांत एकूण १ लाख ३९ हजार ६१८ क्विंटलने घट झाली आहे. सध्या फरदड कपाशी मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. फरदडचे दर ३००० रुपये क्विंटलपर्यंत कमी झाले आहेत.
 
परभणी जिल्ह्यातील ११ पैकी १० कृषी उत्पन्न बाजार समित्यांतर्गत ३८ जिनिंग कारखान्यांमध्ये खासगी व्यापाऱ्यांनी, तर ३ जिनिंगमध्ये कापूस खरेदी करण्यात येत आहे. सीसीआयतर्फे जिंतूर, सेलू आणि मानवत या तीन ठिकाणी हमीदरानुसार तसेच खुल्या बाजारातील दरानुसार कापूस खरेदी करण्यात येत आहे. परभणी जिल्ह्यात परभणी आणि ताडकळस येथे पणन महासंघाची खरेदी केंद्र सुरू करण्यात आली होती.
 
परंतु खुल्या बाजारातील दर जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी कापूस खरेदी झाली नाही. यंदा सेलू बाजार समितीअंतर्गत जिल्ह्यात सर्वाधिक ४ लाख ३६ हजार ४९२ क्विंटल, तर सर्वांत कमी पूर्णा बाजार समितीअंतर्गत १५२२ क्विंटल कापूस खरेदी झाली. मार्चअखेरपर्यंत १२,४७,५०५ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. गतवर्षी मार्चअखेरपर्यंत १४,१६,९७० क्विंटल कापूस खरेदी झाली होती.
 
हिंगोली जिल्ह्यातील चार बाजार समित्यांतर्गत यंदा ७ जिनिंग कारखान्यांमध्ये खासगी आणि १ जिनिंगमध्ये सीसीआयतर्फे कापूस खरेदी करण्यात आली. पणन महासंघाच्या हिंगोली येथील केंद्रावर १० शेतकऱ्यांच्या ११९ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. हिंगोली बाजार समितीअंतर्गत हिंगोली येथे सर्वाधिक २९,४०२ क्विंटल, तर सर्वांत कमी हयातनगर येथे ३१९१ क्विंटल कापूस खरेदी झाली. 
 
मार्चअखेर ५०,४३२ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३०,३४९ क्विंटलने कापूस खरेदीत वाढ झाली आहे. गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे यंदा कापूस उत्पादनात घट आली. त्याचा परिमाण कापूस खरेदीवर झाला आहे. दोन्ही जिल्ह्यांत गतवर्षीच्या मार्चअखेर १४ लाख ३७ हजार ०५५ क्विंटल कापूस खरेदी झाली होती. यंदा १२ लाख ९७ हजार ४३७ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे.

तुलनात्मक कापूस खरेदी

जिल्हा २०१७ २०१८
परभणी १४,१६,९७० १२,४७,५०५
हिंगोली २०,०८३ ५०,४३२

 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com