कपाशीवर 'या' तालुक्यातील शेकडो एकरवर रोटाव्हेटर

बारा एकर क्षेत्रातील सहा एकरांवर सोयाबीन, तर उर्वरित क्षेत्रात कपाशी होती. कपाशीला संततधार पावसामुळे बोंडधारणा झाली नाही. परिणामी कपाशीचे पीक काढून टाकत रब्बी हंगामातील गहू घेण्याचा निर्णय घेतला आहे. खरीप गेला आता रब्बीकडून अपेक्षा आहेत. - कल्पना नासरे, शेतकरी, सावळी खुर्द
cotton crop damage
cotton crop damage

कारंजा घाडगे, जि. वर्धा  ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतकऱ्यांना जेरीस आणले आहे. खरीप पिकातील सोयाबीनसह कापसालाही याचा फटका बसला. हाती काहीच लागणार नसल्याचे लक्षात आल्याने तालुक्‍यात शेतकऱ्यांनी शेकडो एकर कापसावर रोटाव्हेटर फिरविला.  संततधार पावसामुळे कापसाची बोंडे सडली, काही ठिकाणी सरकीला अंकुर फुटले. परिणामी कापसाला चांगली प्रत राहणार नसल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. यापुढील काळात वाचलेल्या कपाशीवर कीड-रोगाचा प्रादुर्भावही वाढीस लागणार आहे. याची जाणीव झालेल्या शेतकऱ्यांनी कपाशीचे पीक काढून टाकत त्याऐवजी रब्बी पीक घेण्याची मानसिकता तयार केली. त्याकरिता शेकडो एकरांवरील कपाशीवर थेट रोटाव्हेटर चालविला जात आहे.  तालुक्‍यात खरीप पिकांची लागवड झाल्यानंतर सतत पाऊस सुरू होता. काही भागांत पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनी असल्याने अशा शेतकऱ्यांना या पावसाने हवालदिल केले. कापसाच्या झाडावरील फुलांची व पात्याची गळ झाली. तसेच कापसाला बोंडधारणाही झाली नाही. लाल्याचा प्रादुर्भावही अनेक भागात दिसून आला. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले होते. या साऱ्या प्रकारानंतर शासनाच्या मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांना असताना साधे सर्वेक्षण व पंचनाम्याचे कामही तालुक्‍यात अद्याप पूर्णत्वास गेले नाही. त्यामुळेदेखील शेतकऱ्यांचा संयम सुटल्याने त्यांनी रब्बी पिकांच्या लागवडीचा निर्णय घेत कापूस पीक काढण्यास सुरुवात केली आहे.  गवंडी, धावसा, सारवाडी, पारडी, बोरगाव (ढोले), बोंदरठाणा, सावळी, आगरगाव, काजळी, धानोली, हेटीकुंडी, सेलगाव, उमी, नारा यांसह इतर गावांतील शेतकऱ्यांचा पीक काढणाऱ्यांमध्ये समावेश आहे. धावसा येथील मारोती भागे, सावळी येथील कल्पना नासरे यांनी सहा एकरांवर, देवराव देवासे यांनी दोन एकर, मधुसूदन राठी यांनी एक एकर, सुमन चोपडे यांनी तीन एकर, गणेश बिरघडे यांनी एक एकर, विश्‍वनराथ कायरकर यांनी एक, नारा येथील विलास खवशी यांनी दोन एकरांतील कपाशीवर रोटाव्हेटर फिरवीत रब्बी पीक घेण्यासाठी मशागतीचे काम चालविले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com