चीन, अमेरिकेचे कापूस उत्पादन पुढील हंगामात वाढणार?

चीन, अमेरिकेचे कापूस उत्पादन पुढील हंगामात वाढणार?
चीन, अमेरिकेचे कापूस उत्पादन पुढील हंगामात वाढणार?

जळगाव : देशात ३१ जानेवारीअखेर सुमारे १८० लाख कापूस गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) आवक झाली आहे. मागील हंगामाच्या तुलनेत ही आवक जवळपास ३० लाख गाठींनी कमी आहे. याच वेळी आंतरराष्ट्रीय बाजारात चीन व अमेरिकेत पुढील हंगामात कापसाचे उत्पादन २०-२० टक्‍क्‍यांनी वाढेल, अशी माहिती विविध संस्थांनी दिल्याने न्यूयॉर्क वायदामध्ये कापसाचे दर नीचांकी पातळीवर म्हणजेच ७० सेंटवर आले आहेत.  देशात उत्पादन घटल्याचे समोर येत आहे. परंतु निर्यातीसंबंधी फारशी सकारात्मक स्थिती नाही. ३१ जानेवारी २०१९ अखेरपर्यंत देशांतर्गत बाजारात १८० लाख गाठींचा पुरवठा झाला आहे. अर्थातच ४० टक्के कापूस बाजारात अजून आलेला नाही. ही आकडेवारी लक्षात घेता देशात ३३० ते ३३५ लाख गाठींचे उत्पादन निश्‍चित मानले जात आहे. सरकी तेलाचे दर बऱ्यापैकी असल्याने सरकीला उठाव कायम असून, मागील आठवड्यात सरकीचे दर प्रतिक्विंटल ५० रुपयांनी वधारून २३०० रुपयांपर्यंत आहेत. कापसाचा सर्वांत मोठा निर्यातदार असलेल्या अमेरिकेत या हंगामात सुमारे २३८ लाख गाठींचे उत्पादन हाती आले असून, तेथे हंगाम संपला आहे. तर चीनमध्ये ३४५ लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज आहे. पुढील हंगामात म्हणजेच सप्टेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०१० मध्ये चीन आणि अमेरिकेतील कापूस उत्पादन अनुक्रमे २०-२० टक्‍क्‍यांनी वाढेल आणि हवी तशी मागणी राहणार नाही, असे अहवाल आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत संस्थांनी प्रसिद्ध केले आहेत. परिणामी न्यूयॉर्क वायदामध्ये कापूस दर नीचांकी पातळीवर पोचले. मागील पाच दिवसात दर ७४ सेंटवरून ७० सेंटवर आले आहेत. भारतीय खंडीला (३५६ किलो रुई) ४२०० हजार रुपयांपर्यंत कमाल दर आहे.  निर्यातही रखडत मागील हंगामात जानेवारीअखेर सुमारे ३७ लाख गाठींची भारतातून परदेशांत निर्यात झाली होती. या हंगामात सुमारे २५ लाख गाठींची निर्यात झाली आहे. चीन व अमेरिकेत व्यापार युद्ध संपुष्टात आल्यासंबंधीची अधिकृत घोषणा अजूनही झालेली नसल्याने निर्यात रखडत सुरू असल्याची माहिती मिळाली.  चीनची गरज कमी व्यापार युद्धामुळे कापसाचा सर्वांत मोठा आयातदार असलेल्या चीनची कापसाची गरज सुमारे २५ ते ३० टक्‍क्‍यांनी कमी होणार आहे. चीनमध्ये मागील तीन हंगामात सरासरी ३५० लाख गाठींचे उत्पादन झाले आहे. चीनला प्रत्येक हंगामात सुमारे ५५० ते ६०० लाख गाठींची गरज असते. चीनचा वस्त्रोद्योग जगात सर्वांत मोठा असून, सात हजार कोटी किलोग्रॅमपेक्षा अधिक सुताचे उत्पादन चीन करतो. त्यासाठी चीन भारत, चीनमधून सूत, रुईची आयात करतो. परंतु व्यापार युद्ध व इतर कारणांमुळे चीनमधील वस्त्रोद्योगाला फटका बसला आहे. परिणामी भारतासह अमेरिकेतील कापूस निर्यात रखडत सुरू आहे, अशी माहिती जाणकारांनी दिली.  प्रतिक्रिया... पुढील हंगामात चीनसह अमेरिकेचे उत्पादन वाढेल, अशी  माहिती जागतिक कापूस बाजारात वाऱ्यासारखी पसरली आहे. त्यात चीन - अमेरिकेतील व्यापार युद्धाचा फटका जगभरातील वस्त्रोद्योगाला बसत आहे. देशात कापूस उत्पादन कमी असले तरी अजून ४० टक्के कापूस बाजारात आलेला नाही. परिणामी वायदा बाजारात सध्याचे दर दबावात दिसत आहेत. - अरविंद जैन, माजी अध्यक्ष,  खानदेश जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com