देशात कापसाचे उत्पादन २० टक्‍क्‍यांनी वाढणार

कापूस
कापूस

जळगाव ः देशात नव्या हंगामात म्हणजेच २०१९-२० मध्ये कापसाचे उत्पादन मागील हंगामाच्या तुलनेत २० टक्‍क्‍यांनी वाढून ३७५ लाख गाठींपर्यंत पोचेल. हमीभावापेक्षा कमी दराची भीती सध्या देशात व्यक्त केली जात असली, तरी अमेरिका व चीनमधील व्यापार युद्धामुळे भारतीय कापसाची मागणी चीन, इंडोनेशिया व व्हिएतनाममध्ये वाढू शकते. नवा कापूस हंगाम देशातील शेतकऱ्यांसाठी लाभदायी असाच राहील, असा अंदाज जैन हिल्स येथे सोमवारी (ता.२३) आयोजित महाकॉट वार्षिक संमेलनात तज्ज्ञ, कापूस जगतातील मंडळींनी व्यक्त केला.  संमेलनात भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) अध्यक्ष डॉ. पी. अली राणी, कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे उपव्यवस्थापक प्रेमजी सुरंसे, खानदेश जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन, औरंगाबाद येथील मनजित समूहाचे राजदीपसिंह चावला, कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे सहयोगी सदस्य अरविंद जैन आदी उपस्थित होते. सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. 

संमेलनात जिनर्स, व्यापाऱ्यांनी केलेल्या मागण्या 

  • वस्तू व सेवाकरासंबंधीची रिव्हर्स कनसेप्ट मेकॅनिझम प्रणालीत बदल करून या कराबाबत जिनर्स, व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा
  • सीसीआयने कच्चा माल किंवा कापसाप्रमाणे व्यापारी, जिनर्सकडून थेट मापदंड, हमीभाव निश्‍चित करून गाठींची खरेदी सुरू करावी 
  • कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने जळगाव व इतर भागात कापूस चाचणी प्रयोगशाळा स्थापन कराव्यात
  • कापूस निर्यातीसंबंधी प्रोत्साहन अनुदान केंद्राने द्यावे
  • सीसीआयने कापूस खरेदीसंबंधीची आर्द्रतेची अट बदलून १२ टक्‍क्‍यांपर्यंत आर्द्रतेचा कापूस खरेदी करावा
  • कापसाची देशातील उत्पादकता हमी असून, ती वाढविण्यासाठी व्यापक प्रयत्न व्हावेत
  • धरणगाव (जि. जळगाव) येथे सीसीआय खरेदी केंद्र सुरू करावे. 
  • या मागण्यांबाबत खानदेश जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन, जीवन बयस आदींनी मुद्दे उपस्थित केले. 

    शेतकऱ्यांनाच प्राधान्य,  आयात शुल्काबाबत सरकार ठरवेल भारतीय कापूस महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. राणी म्हणाल्या, की सीसीआय कापूस आयात शुल्कासंबंधी हस्तक्षेप करून निर्णय घेऊ शकत नाही; परंतु जिनर्सच्या याबाबतच्या मागण्या शासनाकडे पोचवू. सीसीआय देशात यंदाही कापूस खरेदी करणार आहे. त्यासाठी जिनर्स, व्यापाऱ्यांकडून थेट गाठींची खरेदी करण्याचा विचार नाही. शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करू. शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. कापसाला हमीभावापेक्षा कमी दरांचा मुद्दा मागील दोन महिने चर्चेत आहे. काही मिलांकडून थेट जाहिराती प्रसिद्ध करून मंदीचे मुद्दे उपस्थित केले जात आहेत. परंतु जेव्हा कापसाचे दर तेजीत होते, तेव्हा ही चर्चा नव्हती. अमेरिका व चीनमधील व्यापारयुद्धामुळे अमेरिकेच्या कापसाचे दर दबावात आहेत. कापूस उत्पादनात भारत यंदा पहिला राहील. भारत आघाडीचा कापूस उत्पादक देश आहे; परंतु कापसाचे दर अमेरिकेचा वायदा बाजार, कॉटइंडेक्‍सवरून देशात ठरतात. भारतातील दर, कापूस बाजाराची स्थिती यावरून दर ठरविले पाहिजेत. भारतात महाकॉट व इतर अनेक उत्तम रुईचे ब्रॅण्ड आहेत. सहकार्य व समन्वय याची गरज बाजारात आहे. परकीय कापसासारखा कापूस देशात पिकतो. सीसीआयने जे मापदंड लावले त्यानुसार दर्जेदार रुईच्या गाठी सीसीआयला मिळाल्या. भारतीय कापूस बाजार आघाडीवर, ताकदीचा असताना परकीय रुईचे दर, अमेरिका व चीनमधील व्यापारयुद्ध यासंबंधी चर्चा करण्याची, बाऊ करण्याची गरज नाही, असेही त्यांनी सांगितले. 

    बाजाराची चाल निर्यात, चीन-अमेरिकेतील  व्यापार आणि सरकी दरांवर कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा म्हणाले, की कापूस बाजाराबाबतचे चित्र दिवाळीनंतर स्पष्ट होईल; परंतु आयात व निर्यात नव्या हंगामात किती होईल, सीसीआय किती कापूस खरेदी करेल, चीन व अमेरिकेतील व्यापारयुद्धाबाबत काही तह होतो का, सरकीचे दर टिकून राहतील का, यावर कापूस बाजाराचे भवितव्य आहे; परंतु चीन व अमेरिकेतील व्यापारयुद्धामुळे चीन आपल्या नजीक असलेल्या व कापूस निर्यात करणाऱ्या भारताकडून कापूस खरेदी करील. कारण चीनमध्ये सध्या जो साठा आहे, तो २०१२ ते २०१६ दरम्यानचा आहे. त्याचा दर्जा घसरला आहे. चीनला एक कोटींपेक्षा अधिक गाठींची गरज आहे, असा मुद्दा गणात्रा यांनी मांडला; तर चीन व अमेरिकेतील व्यापारयुद्धामुळे काही अडचणी वाढल्याचे सांगितले जात असले तरी इंडोनेशिया व व्हिएतनाममधील कापूस निर्यात वाढली आहे. नवीन देश आपल्याकडून कापूस खरेदी करू लागले आहेत, असे विधानसभेतील माजी अध्यक्ष अरुण गुजराथी म्हणाले. 

    जळगाव, रायचूरमध्ये प्रयोगशाळा कापूस बाजार, व्यापार यासंबंधी महत्त्वाची कापूस चाचणी प्रयोगशाळा कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया जळगाव व रायचूर (कर्नाटक) येथे सुरू करणार आहे. मुंबईत कॉटन ग्रीन इमारतीत शेतकरी प्रशिक्षण वर्ग सुरू केला जाईल. देशात कापूस लागवड वाढविण्याची गरज नाही. कापूस उत्पादकता वाढली पाहिजे. महाराष्ट्रात देशात कापूस लागवडीच्या क्षेत्रातील वाटा ३३ टक्के आहे; तर उत्पादनातील वाटा फक्त २७ टक्के आहे. हेक्‍टरी १.७० गाठींचे उत्पादन महाराष्ट्रात घेतले जाते. यामुळे उत्पादकता वाढीसाठी देशभरातील कापूस व्यापार, उद्योग क्षेत्रातील विभागीय संघटनांसोबत कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया काम आहे. येत्या १९ ते २१ ऑक्‍टोबरदरम्यान अकोला येथे कापूस परिषद घेतली जाणार असल्याचे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष गणात्रा म्हणाले.  असा असेल नवीन हंगाम देशात २०१८-१९ च्या हंगामात ३१२ ते ३१५ लाख गाठींचे उत्पादन झाले आहे. त्यात महाराष्ट्राचा वाटा ७३ लाख गाठींचा आहे. नव्या हंगामात देशात ३७५ लाख गाठींचे उत्पादन होईल. त्यात महाराष्ट्राचा वाटा ८८ लाख गाठींचा राहील. आयात २५ लाख गाठींवर तर निर्यातही ४० लाख गाठींची होईल. महाराष्ट्रात ४४ लाख हेक्‍टरवर तर देशात १२५ लाख हेक्‍टरवर कापूस लागवड झाली असून, देशात नव्या हंगामत हेक्‍टरी ५०० किलो रुईपर्यंतची उत्पादकता राहील, असे भाकित या संमेलनात तज्ज्ञांनी केले.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com