देशात कापूस उत्पादन घटणार

कापूस उत्पादनाबाबत देशात वेगवेगळे अंदाज विविध संस्थांनी व्यक्त केले आहेत. अतिपावसामुळे राज्यातील कापूस उत्पादन कमी होऊ शकते. परंतु पुढे कोरडवाहू कापूस पिकातून उत्पादन चांगले मिळेल. देशात ३८० लाख गाठींपर्यंतचे उत्पादन अपेक्षित आहे. - अनिल सोमाणी, माजी सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया
cotton production will decline
cotton production will decline

जळगाव ः देशात सर्वाधिक कापूस उत्पादित करणाऱ्या गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणातील पूर्वहंगामी कापूस पिकाला अतिपावसाने झोडपले. परिणामी, कापसाच्या उत्पादनात सुमारे ४० ते ४५ लाख गाठींनी (एक गाठ १७० किलो रुई) घट येण्याची शक्‍यता आहे. उत्तर भारतातील राजस्थान, पंजाब, हरियाणातील कापूस उत्पादन मात्र अनुकूल हवामानामुळे बऱ्यापैकी साध्य होईल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.  देशात १२७ लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड झाली आहे. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक सुमारे ४४ लाख, गुजरातेत २६ लाख, उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा व राजस्थानमध्ये मिळून १६ लाख हेक्‍टरवर लागवड झाली आहे. लागवडमागील हंगामापेक्षा अधिक व ऑक्‍टोबरपर्यंत पावसाबाबत स्थिती बऱ्यापैकी राहिली. परंतु ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यात व नंतर दिवाळीपर्यंत पाऊस सुरूच राहिला. महाराष्ट्रातील कापूस पट्ट्याला मागील आठवड्यातही पावसाने झोडपले. सुरुवातीला देशात कापसाचे ४०० ते ४१२ लाख गाठींचे उत्पादन येईल, असा अंदाज कापूस उद्योग, व्यापार जगतातील विविध संस्थांनी व्यक्त केला होता. पण कापूस उत्पादनात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्र, गुजरातमध्ये अतिपावसामुळे पूर्वहंगामी कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे. गुजरातेत कापसाखालील सुमारे २५ ते ३० टक्के क्षेत्र तर महाराष्ट्रातील सुमारे १७ टक्के क्षेत्र ओलिताखाली आहे. अर्थातच मे अखेरच्या किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड केलेल्या कापूस पिकात बोंडे काळवंडने, फांद्या तुटणे, पाते गळ असा प्रकार झाला आहे. अनेक पूर्वहंगामी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापूस पिकात ३५ ते ४० टक्के नुकसान झाले आहे. यामुळे उत्पादनात घट निश्‍चित मानली जात आहे. देशात ३५४ ते ३६० लाख गाठींचे उत्पादन होऊ शकते. दक्षिण, मध्य भारतात पूर्वहंगामी कापसाचे पीक जोमात आहे. परंतु, त्यात वेचणी अपवादानेच सुरू आहे. या क्षेत्रात किती उत्पादन हाती येईल? पुढे गुलाबी बोंड अळीचा प्रकोप वाढेल का? वातावरणाची स्थिती कशी असेल? असे प्रश्‍न कायम असल्याने कोरडवाहू कापसाच्या क्षेत्रातून उत्पादनासंबंधी ठोस अंदाज, माहिती मिळत नसल्याची स्थिती आहे.  सध्या पूर्वहंगामी कापूस पिकात वेचणी रखडत सुरू आहे. खानदेश, गुजरातेत अनेक जिनींग प्रेसिंग कारखाने सुरू देखील झाले. परंतु अतिपावसाने सरकीचा दर्जा घसरला आहे. सरकीमध्ये १२ ते १४ टक्के आर्द्रता अपेक्षित असते. पण प्रतिकूल हवामानामुळे ही आर्द्रता ३५ टक्‍क्‍यांपर्यंत आहे. यामुळे सरकीचा उठाव मागील पंधरवड्यात हळूहळू कमी होत गेला. यामुळे सरकीचे दर ३३०० रुपये क्विंटलवरून २५०० रुपये क्विंटलपर्यंत आले आहेत. सरकीचे दर खाली येताच खंडीचे दर (३५६ किलो रुई) ४१ हजार रुपयांवरून ३९ हजार रुपयांवर आले आहेत. सरकीच्या दरात घसरणीमुळे पूर्व गुजरात, खानदेशातील जिनींग प्रेसिंग कारखानदारांना सुमारे ४० ते ४५ कोटी रुपयांचा फटका बसल्याची माहिती मिळाली. यातच देशात या हंगामात साडेअकरा कोटी क्विंटल सरकीच्या उत्पादनाची शक्‍यता सूत्रांनी व्यक्त केली. कापूस उत्पादनाबाबत वेगवेगळे अंदाज देशात कापूस उत्पादनाबाबत कापूस व्यापार, उद्योग जगतातील विविध संस्थांचे वेगवेगळे अंदाज व्यक्त होत आहेत. आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीने भारतात कापूस उत्पादन कमी येईल, असे म्हटले आहे. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानेदेखील उत्पादन ३५४ लाख गाठींपर्यंत अपेक्षित असल्याचे सांगितले आहे. उत्तर भारतातील कापूस व्यापार संघटनेने (गुरुग्राम, हरियाणा) नुकत्याच गुरुग्राम येथे झालेल्या दोन दिवसीय परिषदेत भारतातील कापूस उत्पादन ४०० लाख गाठींवर जाईल, असा दावा केला आहे. गुजरातमधील संघटनेने भारतातील कापूस उत्पादन ४१२ लाख गाठींपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. खानदेश जिनींग प्रेसिंग कारखानदार असोसिएशनने देशात ३८० ते ३८२ लाख गाठींच्या उत्पादनाबाबत माहिती जारी केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com