औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत कापूस उत्पादन ६० टक्क्यांपेक्षा जास्त घटणार

Cotton production will decline by more than 60 percent in Aurangabad, Jalna and Beed districts
Cotton production will decline by more than 60 percent in Aurangabad, Jalna and Beed districts

औरंगाबाद : आधी दुष्काळाचा ताण, त्यानंतर अतिपावसामुळे यंदा कापूस काळवंडला आहे. एक, दोन किंवा फारतर तीन वेचणीत कपाशीचे पीक संपत आहे. कपाशीच्या उत्पादनात ६० ते ७० टक्‍क्‍यांपर्यंत घटीच्या अंदाजाला आता कृषी विभागाच्या परिस्थिती अहवालामुळे दुजोरा मिळाला आहे. 

मराठवाड्यातील औरंगाबाद व लातूर या दोन कृषी विभागांतर्गतच्या आठ जिल्ह्यांत  १७ लाख ७६ हजार हेक्‍टरवर कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र आहे. त्या तुलनेत यंदा मराठवाड्यात १५ लाख ६५ हजार ९८८ हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली. औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र १० लाख ६७ हजार ९८५ हेक्‍टर आहे. त्या तुलनेत यंदा या तीनही जिल्ह्यांत १० लाख ६० हजार ५०३ हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली. 

सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९९.३० टक्‍के क्षेत्रावरील या कपाशी पिकाची औरंगाबाद व बीड जिल्ह्यात एक वेचणी पूर्ण झाली आहे.  बीड जिल्ह्यात काही ठिकाणी दुसऱ्या वेचणीची कामे सुरू आहेत. पीक कापणी प्रयोगानुसार जिरायती कापसाची ३७३ किलो हेक्‍टरी उत्पादकता येते आहे. ऑक्‍टोबरमधील पावसामुळे वेचणीला आलेल्या कापसाचे मोठे नुकसान झाले. यंदा कपाशीचे उत्पादन चांगले होईल आणि अर्थकारणाला हातभार लागेल, या शेतकऱ्यांच्या आशेला यंदा सुरुवातीपासूनच पावसाने सुरुंग लावण्याचे काम केले. 

कपाशीला ३३ टक्के फटका

ऑगस्ट व सप्टेंबरमधील पावसाने काही भागातील कपाशीच्या आशा पल्लवित करण्याचे काम केले. परंतु, ऑक्‍टोबरमध्ये जवळपास पंधरवड्यापेक्षा जास्त काळ लागून बसलेल्या पावसाने कपाशीवर सर्वांत मोठा आघात केला. जवळपास १४ लाख ६६ हजार हेक्‍टरवरील कपाशीचे ३३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे पंचनाम्यातून समोर आले. शिवाय सततच्या व जोरदार पावसामुळे जमिनीतील नत्र वाहून गेले किंवा पिकाच्या मुळाच्या कक्षेच्या खाली जाऊन बसले. मॅग्नेशिअमची कमतरता व दहिया रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे झाडावर पात, फुले, बोंडे असतानाच सततच्या पावसामुळे नेमक्‍या गरजेच्या वेळी अन्नद्रव्याची कमतरता निर्माण झाली. त्यामुळे विविध रोगांना पोषक वातावरण तयार झाले. कपाशीची पाते व पानगळ झाली.

कापूस उत्पादक हवालदिल 

अनेक भागात लालसर पडलेल्या कपाशीच्या पिकाला जेवढी बोंड आधी पोसली गेली, तेवढीच उत्पादन देऊन गेली. उर्वरित अन्नद्रव्य न मिळाल्याने पोसण्यापूर्वीच फुटली. त्यामुळे कापसाच्या उत्पादनात कवडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. उत्पादन घटले असले, तरी दर्जाच्या कारणावरून उत्पादित कापसाला दरही मिळत नसल्याने कापूस उत्पादक हवालदिल झाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com