अल निनोच्या सावटाने कापूस बाजार तेजीत

कापूूस टंचाई देशातील मिलांसमोर कळीचा मुद्दा बनला आहे. पाऊस किंवा मोसमी पाऊस (मॉन्सून) हा मुद्दा महत्त्वाचा आहे. परंतु, त्याचा अंदाज खरा ठरेल, हे कुणीही सांगू शकत नाही. कापूस मागणी व पुरवठा यासंबंधीचे गणित या हंगामात कुठेतरी बिघडले आहे, यामुळे दरात तेजी आहे. पुढील हंगामही चांगला राहील, असे मला वाटते. - अरविंद जैन, कापूस व्यापाराचे जाणकार
कापूस
कापूस

जळगाव ः पुढील कापूस हंगामातही (२०१९-२०) प्रमुख कापूस निर्यातदार देशांमध्ये येणाऱ्या भारतासह ऑस्ट्रेलियाला अल निनोच्या प्रभावामुळे फटका बसण्याची वार्ता कापूस बाजारात वाऱ्यासारखी पसरली आहे. जगभरातील कापूस बाजार सावध झाला असून, दर तेजीत आहेत. सरकीचे दर मागील तीन वर्षांमधील उच्चांकी पातळीवर म्हणजेच २८५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत.  कापसाचा वायदा बाजार (न्यूयॉर्क वायदा) स्थिर आहे. सरकीच्या दरात मागील २५ दिवसांत क्विंटलमागे २०० रुपयांनी वाढ झाली आहे. कापसाचा मोठा तुटवडा देशांतर्गत मिलांना भासत आहे. भारतीय व परदेशातील कापूस खंडीचे (३५६ किलो रुई) दर एकसारखेच असून, ४६ हजार रुपये असे दर आहेत. काही मिला २९ मिलीमीटर लांब धाग्याचा कापूस अमेरिका व ऑस्ट्रेलियाकडून आयात करून घेत आहेत. मागील हंगामात कापसाची आयात २० लाख गाठी (एक गाठ १७० किलो रुई) एवढी झाली होती. ती या हंगामात आयातवाढीवर मिला भर देत असल्याने २५ लाख गाठींपर्यंत जाणार असल्याची स्थिती आहे. देशातील कापसाचे उत्पादन मागील हंगामाच्या तुलनेत ३४ लाख गाठींनी घटले आहे. अशीच किंवा यापेक्षा बिकट स्थिती पुढील हंगामातही अल निनोमुळे निर्माण होऊ शकते. सरासरीएवढा पाऊस नसेल, अशी वार्ता कापूस बाजारात पसरली असून, बाजारात तेजी आहे. पुढील ५० दिवस ही तेजी टिकून राहील, असा दावा जाणकार करीत आहेत.  मागील हंगामात (२०१७-१८) देशात सुमारे ११५ लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड झाली होती. उत्पादन ३६२ लाख गाठी आले. या हंगामात लागवड १२० लाख हेक्‍टर झाली, पण उत्पादन ३२८ लाख गाठींपर्यंत अखेरपर्यंत येईल, अशी शक्‍यता आहे. कमी पावसाचा फटका या हंगामात महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणातील कोरडवाहू कापूस पिकाला बसला. पुढील हंगामातही अशीच स्थिती राहिली तर लागवड १२० लाख हेक्‍टर गृहीत धरले तरी उत्पादन ३३० ते ३३२ लाख गाठींपर्यंतच जाऊ शकते. या उत्पादनात देशातील कापसाची गरज पूर्ण करता येत नाही. कारण, देशातील कापसाची गरज ४१० ते ४१२ लाख गाठींची आहे. यात मिलांना ३०० लाख गाठी, लघु उद्योगातील मागणी सुमारे ३० लाख गाठी व बिगर वस्त्रोद्योग क्षेत्राची १९ ते २० लाख गाठींची मागणी असते. निर्यात किमान ५५ ते ६० लाख गाठींची होईल. ही गरज या हंगामातून पूर्ण होताना दिसत नाही. पुढील हंगामासाठी अखेरचा साठा (एडिंग स्टॉक) मागील आठ वर्षांमधील नीचांकी पातळीवर पोचणार असून, फक्त २७ ते २८ लाख गाठींचा साठा राहील, अशी स्थिती आहे. देशात सरकार कापसाचा संरक्षित (बफर) साठा करीत नाही. आयातीवर अवलंबून राहण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. यातच भारत जगातील क्रमांक दोनचा कापूस निर्यातदार देश आहे.  अल निनोचा प्रभाव दक्षिण आशिया व ऑस्ट्रेलियात पुढे असेल, असे भाकित एका हवामानासंबंधी कार्यरत एका संस्थेने नुकतेच केले आहे. ही बाब लक्षात घेता ऑस्ट्रेलियातील कापूस बाजारातही धाकधूक आहे.  ऑस्ट्रेलियामध्ये फक्त पाच ते सात हजार हेक्‍टरवर कापसाची लागवड होते. परंतु, त्यांची उत्पादकता २०८८ किलो रुई प्रतिहेक्‍टरी असून, तेथे ५५ लाख गाठींपर्यंतचे उत्पादन अपेक्षित येते. कापूस निर्यात करणारा क्रमांक तीनचा देश म्हणून ऑस्ट्रेलियाची ओळख असून, तेथील ८५ टक्के कापसाची निर्यात होते. २९ मिलीमीटर व ३४ मिलीमीटर लांब धाग्याच्या कापूस ऑस्ट्रेलिया जगाला पुरवितो. तेथील हंगामावर अल निनोचा परिणाम झाला तर उत्पादन घटेल. ते किती घटेल, हा पुढचा मुद्दा असला तरी ऑस्ट्रेलियाचा जागतिक बाजारातील कापूस उत्पादनातील वाटा कमी होईल, असा मुद्दा बाजारात चर्चेत असल्यानेही कापूस दर टिकून आहेत.  अलीकडेच आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार परिषदेने जागतिक कापूस उत्पादन वाढेल, असे संकेत दिलेले असले तरी दक्षिण आशिया व ऑस्ट्रेलियात कमी पावसामुळे कापूस उत्पादनावर परिणाम होण्याची भीती वाढल्याची स्थिती आहे.  जागतिक स्तरावरचे गणित बिघडले या कापूस हंगामात (२०१८-१९) जागतिक कापूससाठा १० टक्‍क्‍यांनी कमी होऊन १६.९ दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत असेल. २०११-१२ नंतर कापूससाठ्यासंबंधी चिंताजनक स्थिती निर्माण होईल. चीनमधील कापूससाठा २०१७-१८ मध्ये ८.६ दशलक्ष मेट्रिक टन होता. तो २०१८-१९ मध्ये ६.६ दशलक्ष मेट्रिक टनांवर येईल, असे भाकित आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीने ४ सप्टेंबर, २०१८ रोजी केले होते. तर मार्चमध्ये २०१८-१९ चा कापूससाठा वाढेल व तो १७.६४ दशलक्ष मेट्रिक टनांवर जाईल, असा नवा अंदाज व्यक्त केला. कापूससाठा वाढत असला तरी जगात कापूस उत्पादन व पुरवठा याचे गणित बिघडले आहे. उत्पादन २६.०४ दशलक्ष मेट्रिक टन व गरज २६.८४ दशलक्ष मेट्रिक टन, अशी स्थिती आहे. या हंगामात ऑस्ट्रेलियासह अमेरिका, भारताची कापूस उत्पादकता घटल्याचेही चर्चिले जात असल्याची माहिती जाणकारांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com