खेडा खरेदीत कापूसदरात वाढ

कापूसदरात या आठवड्यात वाढ झाली असून, दर्जेदार कापसाला गेल्या पाच वर्षांमधील सर्वाधिक ६१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर खेडा खरेदीत मिळत आहे.
cotton
cotton

जळगाव ः कापूसदरात या आठवड्यात वाढ झाली असून, दर्जेदार कापसाला गेल्या पाच वर्षांमधील सर्वाधिक ६१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर खेडा खरेदीत मिळत आहे. देशात शेतकऱ्यांकडे आजघडीला सुमारे ९५ लाख गाठी कापूस शिल्लक आहेत. तर बाजारात २२५ लाख गाठी कापसाची खरेदी झाली आहे.

देशभरातील सर्वच कापूस उत्पादकांना या दरवाढीचा लाभ मिळत नसल्याचे दिसत आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी कापसाचा साठा घरात ठेवला आहे, त्या सुमारे ३० टक्के कापूस उत्पादकांना या दरवाढीचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. ‘सीसीआय’ला या दरवाढीचा चांगला लाभ होत आहे. कारण ‘सीसीआय’ने ऑक्टोबरमध्येच शासकीय कापूस खरेदी देशात ४३० केंद्रांमध्ये सुरू केली होती. गेल्या आठवड्यापर्यंत ‘सीसीआय’ने देशभरात ९० लाख गाठी एवढ्या कापसाची खरेदी शासकीय केंद्रांच्या माध्यमातून केली आहे. सीसीआय’च्या खंडीचे (३५६ किलोची एक खंडी) ई लिलाव सुरू असून, खंडीला उच्चांकी ४४ हजार रुपये दर मिळत आहे. 

यूएसडीएच्या अहवालानंतर दरवाढ अमेरिकन कृषी विभागाने अलीकडेच कापूस उत्पादनासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध केला. त्यात अमेरिकेचे कापूस उत्पादन २०१९-२० च्या तुलनेत १५ टक्क्यांनी कमी म्हणजेच २२५ लाख गाठींपर्यंत असू शकते, असे म्हटले आहे. शिवाय जगभरात कापूस उत्पादन कमी असल्याचे नमूद केले. 

सध्याचे शिवार खरेदीतील दर असे... कापसाला कमाल ६१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर खेडा खरेदीत मिळत आहे. ज्या शेतकऱ्याकडे ६० ते १५० क्विंटल कापूस आहे, त्या शेतकऱ्याला किमान ६१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर खेडा खरेदीत मिळत आहे. तसेच यापेक्षा कमी कापूस साठा असलेल्या शेतकऱ्याला ५६५०, ५७०० व ५८०० रुपये प्रतिक्विंटलचा दरही मिळत आहे. पहिल्या तीन-चार वेचण्यांच्या कापसाला चांगला दर आहे. 

जगभरात कापसाला मागणी अधिक जगात यंदा २५ दशलक्ष टन कापूस उत्पादन होणार आहे. जेवढे उत्पादन होईल, तेवढ्या कापसाची मागणी, खरेदी होणार आहे. शिवाय जगात कापूससाठा संपत आला आहे. यामुळे कापूस दरांत तेजी आहे. जगात यंदा हंगामअखेर सुमारे २० दशलक्ष टन कापूस साठा राहील, असे संकेत होते. परंतु हा साठा अनेक वर्षांमधील नीचांकी स्थितीत राहण्याची शक्यता कॉटन असोसिएशन ऑफ इंडियासह जाणकारांनी व्यक्त केली आहे. परिणामी कापूस बाजाराने उसळी घेतली आहे. 

सरकी दरात सुधारणा सरकीचे दर गेल्या महिन्यात २३५० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. सध्या सरकीचे दर २६५० ते २७०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. अर्थातच पंधरवड्यात सरकी दरात क्विंटलमागे ३०० रुपयांची वाढ झाली आहे. पशुखाद्यासह खाद्यतेलासाठी सरकीची मागणी देशात वाढली आहे. कारण सोयाबीनचा तुटवडा असून, सोयाबीन तेलही तेजीत आहे.  प्रतिक्रिया मी ‘अॅग्रोवन’च्या व्यासपीठाच्या माध्यमातून कापूस दरवाढ जानेवारीत होईल, यंदा चांगली निर्यात देशातून होईल, कापसाचे भवितव्य चांगले आहे, असे म्हटले होते. हे भाकीत खरे ठरले आहे. देशातून सुमारे २२ लाख गाठींची निर्यात बांगलादेशसह आशियाई देशांत झाली आहे. निर्यात सुरूच आहे. कोरोनाचे संकट कापूस उद्योगासमोरून दूर झाले आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाने कापूस उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे म्हटले आहे. चांगली मागणी रुई, सरकी, सुताला असल्याने ही दरवाढ झाली आहे.  - अरविंद जैन, सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया, पीक समिती  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com