स्थानिक बाजारात कापसाला उठाव

कापूस बाजार स्थिर आहे. चीनमधील मागणी ठप्प असली तरी बांगलादेश व इतर देशांमधून कापसाची मागणी चांगली आहे. देशातील बाजार एप्रिलमध्ये आणखी सुधारू शकतो. - अरविंद जैन, सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया
cotton procurement
cotton procurement

जळगाव ः कोरोना विषाणूमुळे चीनमधील कापूस निर्यात ठप्प असली तरी स्थानिक बाजारातील उचल आणि बांगलादेशसोबतचे वाढते सौदे यामुळे कापूस बाजार सावरला आहे. दुसरीकडे शासकीय कापूस खरेदी पुन्हा एकदा सुरू होत असून, बाजारात एप्रिलमध्ये काहीशी सुधारणादेखील अपेक्षित आहे.   भारताचा मोठा कापूस व सुताचा खरेदीदार म्हणून चीनची ओळख आहे. चीनमधील निर्यात ठप्प आहे. पण देशांतर्गत बाजारात कापसाचे दर स्थिर असल्याने व अमेरिकेतील कापूस निर्यातीलाही कोरोनामुळे अडचण आल्याने देशातील कापूस आयातही थांबल्यात जमा आहे. देशात उत्पादित न होणाऱ्या पीमा व गिझा प्रकारच्या सुमारे चार लाख गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) आयात इजिप्त व ऑस्ट्रेलिया, तुर्कीमधून झाली आहे. बांगलादेशातून कापसाचा उठाव तूर्त कायम आहे. तेथे यंदा सुमारे २२ ते २४ लाख गाठींची  निर्यात ऑगस्ट २०२० पर्यंत अपेक्षित आहे. तेथील निर्यात व्यवस्थित सुरू आहे. बांगलादेशातील कापड उद्योगात चीनसह काही भारतीय उद्योजकांनीदेखील गुंतवणूक केली आहे. तेथे भारतासह अमेरिकेतून कापसाची आयात केली जाते. परंतु अमेरिकेतही न्यूयॉर्क व इतर शहरांमध्ये कोरोना विषाणूच्या धोक्‍यामुळे कारभार ठप्प असल्याची स्थिती असून, अमेरिकेतून चीनसह व्हिएतनाम, बांगलादेश व पाकिस्तानात होणारी कापूस निर्यात ठप्प आहे.  यामुळे पुढे बांगलादेश व पाकिस्तानमधून भारताकडे कापसाची मागणी वाढू शकते. जगात चीननंतर भारत, बांगलादेश व पाकिस्तानमधील वस्त्रोद्योगातील उलाढाल मोठी आहे. अर्थातच चीनमधील कापड उद्योग ठप्प असला तरी पाकिस्तान, बांगलादेश व व्हिएतनाममधून भारताकडे कापसासंबंधी निर्यातदारांकडे चौकशी सुरू आहे. बांगलादेशसोबत सौदेही झाले आहेत. यामुळे कापूस बाजार सावरत आहे.  दुसरीकडे देशातील कापूस उद्योगातील उत्पादनही सुरू झाले आहे. उत्तरेकडील लघुउद्योगात गणवेश निर्मितीसह पॉलिस्टर कापडाचे उत्पादन सुरू झाले आहे. देशात यंदा ३६० लाख गाठींचे उत्पादन अपेक्षित आहे. मागील हंगामातील सुमारे २१ लाख गाठी शिल्लक होत्या. तर आयात सुमारे २० ते २२ लाख गाठींची अपेक्षित होती. परंतु यंदा आयात पाच लाख गाठींवर जाणार नाही. तसेच आफ्रीकन देशांसह बांगलादेश, पाकिस्तानात मिळून ३० ते ३२ लाख गाठींची निर्यात होऊ शकते. देशातील वस्त्रोद्योगाला किमान ३२५ लाख गाठींची गरज आहे.  धुळवडीच्या उत्सवानंतर उत्तरेकडील गिरण्या, कापड उद्योग आणखी गती घेणार आहे. यामुळे गाठींची उचल वाढण्याचे संकेत आहे. परिणामी निर्यातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि पुढे कापूस बाजारात चांगली सुधारणा दिसून येईल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.  सीसीआयच्या खरेदीला पुन्हा सुरवात गोदामांची अडचण व इतर कारणांमुळे भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापसाची खरेदी मध्यंतरी खानदेश, पश्‍चिम विदर्भासह मध्य प्रदेशातही थांबविली होती. ही खरेदी मंगळवारी अनेक भागात सुरू होणार आहे. सीसीआयने सुमारे ८२ लाख गाठींच्या कापसाची देशातील विविध खरेदी केंद्रांमध्ये खरेदी केली आहे. सीसीआयची खरेदी १०० लाख गाठींवर जाण्याचे संकेत आहेत. यामुळे कापूस बाजारातील दबाव दूर होत असल्याचे सांगण्यात आले.  कच्च्या तेलाच्या दरातील घटीने धसका जगातील कापड उत्पादनात ४८ टक्के कापड पॉलिस्टरचे असते. हे कापड उत्पादन कच्च्या तेलाच्या मदतीने केले जाते. कच्च्या तेलाच्या दरात मागील आठवडाभरात १० टक्के घसरण झाली आहे. पुढे हे दर आणखी कमी होतील, असा अंदाज आहे. यामुळे पॉलिस्टर कापड उद्योगाने या घडामोडींचा धसका घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.   

प्रतिक्रिया देशांतर्गत कापड उद्योगातील सुताची मागणी चांगली आहे. सीसीआयची खरेदी सुरू असल्याने बाजार स्थिर आहे. पुढे कोरोना विषाणूचा धोका कमी झाला तर चांगली सुधारणा बाजारात दिसून येईल.  - आर. डी. पाटील, कार्यकारी संचालक, लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी, उंटावद होळ (जि. नंदुरबार)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com