जगभरातील बहुतांश कापूस लागवड आटोपली; आता भारताकडे लक्ष

यूएसए, चीन, पाकिस्तानात, ब्राझील, ऑस्ट्रेलियात कापूस लागवड आटोपली आहे. या देशांमध्ये क्षेत्र स्थिर आहे. काही ठिकाणी क्षेत्र किंचित वाढले आहे. भारतात उत्तर क्षेत्रात लागवड १० टक्‍क्‍यांनी वाढल्याने कापूस उत्पादन पुढे कमी होईल, अशी शक्‍यता वाटतनाही. - अरविंद जैन, माजी सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया
कापूस लागवड
कापूस लागवड

जळगाव : कापूस उत्पादनात आघाडी असलेल्या अमेरिका, चीन, मेक्‍सिको, ब्राझील, पाकिस्तान या देशांमधील लागवड आटोपली आहे. या देशात मागील हंगामाऐवढेच कापसाचे क्षेत्र राहणार असल्याची माहिती आहे. भारतात उत्तर क्षेत्रातील (नॉर्थ झोन) हरियाना, पंजाब व राजस्थानमध्ये मागील हंगामाच्या तुलनेत लागवड १० टक्‍क्‍यांनी वाढली आहे.  चीनमध्ये जिझियांग प्रांत, यंगत्से नदीच्या खोऱ्यातील भाग, भारतातील महाराष्ट्र, गुजरात व अमेरिकेतील टेक्‍सासमधील क्षेत्रासंबंधी जगभरातील कापूस उद्योगाचे लक्ष आहे. टेक्‍सासमध्ये एप्रिल महिन्यातच लागवड आटोपली असून, तेथेही क्षेत्र स्थिर आहे. तर चीनमध्येही क्षेत्र मागील हंगामाच्या तुलनेत दोन टक्‍क्‍यांनी वाढल्याचे जाणकारांनी सांगितले. देशात महाराष्ट्रात पूर्वहंगामी लागवड अजून सुरूच आहे. राज्यात यंदा कापसाची एकूण लागवड ४२ लाख हेक्‍टरपर्यंत अपेक्षित आहे. तर गुजरातमध्ये पूर्वहंगामी लागवड जवळपास आटोपली असून, सौराष्ट्रमध्ये क्षेत्र स्थिर आहे. गुजरातेत क्षेत्र २६ लाख हेक्‍टरपर्यंत कायम राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. गुजरातसह महाराष्ट्र, तेलंगण, कर्नाटकमध्ये कोरडवाहू कापूस लागवड अधिक असतो. पावसाचे संकेत अजून नेमके मिळत नसल्याने कोरडवाहू कापूस लागवडीसंबंधी ठोस माहिती कापूस बाजारात आलेली नसल्याची स्थिती आहे. परंतु देशात कापसाचे सर्वत्र मिळून १२२ लाख हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्र राहील, असा अंदाज आहे. यात हरियाणा, पंजाब व राजस्थानमधील लागवड या हंगामात अधिक आहे. या भागात मागील हंगामात मिळून सुमारे १४ लाख हेक्‍टवर कापूस लागवड झाली होती. तेथे क्षेत्र मागील हंगामाच्या तुलनेत १० टक्‍क्‍यांनी अधिक आहे.   भारतातील लागवड क्षेत्राचे चित्र अद्याप स्पष्ट नसल्याने जगभरातील कापूस लागवडीसंबंधीची नेमकी माहिती अजून समोर आलेली नाही. मोसमी पावसावर कमाल राज्यांमधील कापूस लागवड भारतात अवलंबून आहे. कापसाचे दर, साठा व पुढील मागणी लक्षात घेता लागवड मागील हंगामापेक्षा कमी नसल्याचे जाणकारांनी स्पष्ट केले. मेक्‍सिको, ब्राझील, अमेरिकेतून सप्टेंबरमध्ये नव्या हंगामातील कापसाचा पुरवठा सुरू होईल. चीनमधून ऑक्‍टोबरच्या मध्यात पुरवठा अपेक्षित आहे. तर पाकिस्तानमधून ऑगस्टअखेर कापसाचा पुरवठा होईल.  उत्पादन वाढीचा अंदाज आघाडीच्या देशांमध्ये कापूस लागवडीची स्थिती लक्षात घेता २०१९-२० मध्ये जगभरात सुमारे २७ दशलक्ष मेट्रिक टन कापूस उत्पादनाचा अंदाज आहे. त्यात भारतात सर्वाधिक सहा दशलक्ष मेट्रिक टन, चीनमध्ये ५.३२ दशलक्ष मेट्रिक टन, अमेरिकेत ४.४२ दशलक्ष मेट्रिक टन कापूस उत्पादनाचा अंदाज आहे.

देशनिहाय कापूस लागवडीचे अपेक्षित क्षेत्र

देश क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)
मेक्‍सिको २१ हजार
ब्राझील १२ लाख
चीन ३२ लाख
तुर्कस्तान ४ हजार
अमेरिका ४२ लाख
ऑस्ट्रेलिया ४० हजार
भारत १२२ लाख
पाकिस्तान २२ लाख

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com