नागपूर ः गेल्या हंगामात सोयाबीन उत्पादकांना संततधार पावसाचा फटका बसला. त्यामुळेच यंदाच्या हंगामात कापसाखालील क्षेत्रात वाढ होईल, अशी शक्यता कृषी क्षेत्रातील जाणकारांना वाटत आहे. सरासरीच्या ४२ लाख हेक्टरवरून कापूस लागवड क्षेत्रात वाढ होईल, असेही त्यांनी सांगितले.
अमेरिकेत कापूस उत्पादकांना विविध अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे अनेक देशांनी भारतातून कापसाची आयात केली. त्यामुळे जागतिक स्तरावर कापसाचे दर वधारले. त्याचा फायदा भारतीय कापूस उत्पादकांना बऱ्याच अंशी झाला, अशी माहिती केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडून देण्यात आली. कापूस दरातील तेजी, पोषक वातावरण आणि हवामान खात्याने सरासरी ९८ टक्के पाऊसमानाचा वर्तविलेला अंदाज, अशी तीन कारणे यंदा कापसाखालील क्षेत्रात वाढीमागे दिली जात आहे. देशात कापसाचे सरासरी क्षेत्र १३० लाख हेक्टरवर राहते. देशातील उर्वरित ११ कापूस उत्पादक राज्यांमध्ये देखील सरासरीपेक्षा जास्तच क्षेत्रावर कापूस लागवड होण्याचा विश्वास तज्ज्ञांना आहे. बोंड अळीवर हवे नियंत्रण बोंड अळीचा प्रादुर्भाव गेल्या हंगामात अधिक अनुभवण्यात आला. त्यामुळे या वर्षीच्या हंगामात लवकरच बोंड अळीचा प्रादुर्भाव होईल, अशी भीती आहे. याच्या नियंत्रणाकरिता जूनच्या तिसऱ्या आठवड्यात पेरणी करणे अपेक्षित आहे. पुढील हंगामात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी व्हावा याकरिता कमी कालावधीचे (१५०) दिवसांत परिपक्व होणारे वाण देण्याची गरज आहे. त्याकरिता बहुतांश खासगी कंपन्यांनी देखील सकारात्मकता दर्शविली आहे. अशी आहेत कापसाखालील क्षेत्रवाढीची कारणे
प्रतिक्रिया महाराष्ट्रात ५० टक्के सोयाबीन आणि ५० टक्के क्षेत्रावर कापूस असा पॅटर्न राहतो. कापसात अडचण आली तर सोयाबीन आणि सोयाबीनमध्ये अडचण आल्यास कापूस क्षेत्रात वाढ, हे दर एक-दोन वर्षांत घडत असते. या वर्षी मात्र कापसाखालील क्षेत्रात वाढीमागे अनेक कारणे देता येतील. दर आणि मॉन्सून या दोन मुख्य बाबी ठरतील आणि त्यामुळेच क्षेत्र वाढही अपेक्षित आहे. सोयाबीन दरात हंगामअखेर तेजी आली. परंतु त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला, असे ठोसपणे सांगता येणार नाही. - डॉ. वाय.जी. प्रसाद, संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर
कापसाला ५८२५ रुपये हमीभाव होता. हमीभावापेक्षा खुल्या बाजारात ६४०० रुपये दराने खरेदी झाली. सोयाबीनची स्थितीदेखील अशीच आहे. सोयाबीनला हमीभावापेक्षा दुप्पट दर मिळाला. सोयाबीनचे दर ६ ते ७ हजारांवर पोहोचले. त्यामुळे कापूस आणि सोयाबीनचा पेरा गेल्या वर्षी प्रमाणेच राहील. -गोविंद वैराळे, ज्येष्ठ कापूस तज्ज्ञ, नागपूर
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.