नव्या वर्षात कापूस बाजार वधारणार

बांगलादेश व तुर्कीमधील खरेदीदारांनी भारतीय सुताच्या आयातीमध्ये रस दाखविला आहे. लवकरच मोठे सौदे होतील. सुताच्या दरांवरील दबाव काहीसा दूर झाला आहे. कारण अमेरिकेच्या नव्या कापूस हंगामाला पुढील महिन्यात सुरवात होत आहे. तसेच चीन व अमेरिकेत व्यापार युद्धासंबंधीची बैठक पुढील महिन्यात होणार आहे. जगात कापूस उत्पादन कमी झाले आहे. या सगळ्या स्थितीत पुढील महिन्याच्या अखेरिस कापूस दरात सुधारणा होईल, असे मला वाटते. - राजाराम दुल्लभ पाटील, कार्यकारी संचालक, लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी, शहादा, जि. नंदुरबार
कापूस खरेदी
कापूस खरेदी

जळगाव ः खरेदीदारांकडील सुताचा साठा कमी झाला आहे. यातच अमेरिकेचा नवा कापूस हंगाम १५ जानेवारी, २०१९ ला सुरू होत आहे. अर्थातच जानेवारीत कापूस बाजारात चांगली सुधारणा अपेक्षित असल्याने तुर्की, बांगलादेश, व्हीएतनाम येथील सूत खरेदीदारांनी पुढे महागडे सूत घेण्याची वेळ येऊ नये, यासाठी भारतीय सूत खरेदीसंबंधी अनुकूलता दाखवित भारतीय निर्यातदारांकडे सौदे करायला सुरवात केल्याची माहिती मिळाली. ऑक्‍टोबरमध्ये ८३ सेंटवर पोचलेला कापूस बाजारासंबंधीच्या न्यूयॉर्क वायदामध्ये डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कापसाचे दर ७३ सेंटवर आले. यानंतर अमेरिकन कापूस बाजारात फारशी पडझड झालेली नाही. न्यूयॉर्क वायदा मागील आठ दिवसांपासून ७३ सेंटवर स्थिर आहे.  अमेरिकेचा नवा कापूस हंगाम १५ जानेवारीपासून सुरू होत आहे. अमेरिकेत या हंगामात कापूस उत्पादन ३० लाख गाठींनी कमी होऊन ते २३८ लाख गाठी इतके राहील, असा अंदाज यापूर्वीच जाणकार, कापूस क्षेत्रातील आघाडीच्या संस्थांनी व्यक्त केला आहे.  नव्या हंगामात अमेरिका कापसासंबंधी काय धोरण जाहीर करतो, याकडे कापूस बाजार, उद्योगातील धुरिणांचे लक्ष लागून आहे. या सगळ्या स्थितीत आशियासह व्हीएतनाममधील सूत खरेदीदारांकडून भारतीय सुताच्या खरेदीसंबंधी अनुकूल कार्यवाही (इनक्वायरी) सुरू आहे. पुढील आठवड्यात भारतीय सुताच्या निर्यातीबाबत अनेक सकारात्मक घडामोडी घडतील, असे दिसत असतानाच सुताचे दरही स्थिरावले असून, दर्जेदार (ए ग्रेड) सुताचे दर प्रतिकिलो २२० रुपयांवर स्थिरावले आहेत. रुईच्या बाजारातही स्थिरता असून, भारतीय खंडीचे दर (३५६ किलो रुई) ४२५०० ते ४३००० रुपये असे आहेत. तर सरकीचे दर दीड महिन्यापासून २१०० ते २१५० रुपये प्रतिक्विंटल, असे टिकून आहेत.  देशातून सुताच्या निर्यातीला चालना मिळत असून, आशियाई देशांमध्ये पुढील आठवडाभरात दीड ते दोन कोटी किलोग्रॅम सुताची निर्यात अपेक्षित आहे. देशातून १ ऑक्‍टोबर, २०१८ पासून या महिन्याच्या मध्यापर्यंत सुमारे १८ लाख गाठींची निर्यात झाली आहे. बांगलादेश, चीन, व्हीएतनाम व पाकिस्तानात ही निर्यात झाल्याची माहिती मिळाली. 

व्यापार युद्धसंबंधी चर्चा शक्‍य अमेरिका व चीनमध्ये मागील ११ महिन्यांपासून व्यापार युद्ध सुरू आहे. यामुळे शेतमालासह इतर बाबींच्या आयात निर्यातीला फटका बसला असून, जागतिक बाजारात त्याचे पडसाद उमटले असून, चीनसारख्या देशाच्या अर्थव्यवस्थेलाही दणका बसला आहे. चीनचे चलन युआनचे १०ल टक्‍क्‍यांनी अवमूल्यन झाले आहे. तर वस्त्रोद्योगात कार्यरत पाकिस्तान, बांगलादेश, तुर्की या देशांनाही झळ बसली आहे. या सगळ्या स्थितीत मागील महिन्यात चीन व अमेरिकेच्या विदेश व्यापार विभागांसह इतर संबंधितांची एक बैठक अमेरिकेत झाली. आता पुन्हा चीन व अमेरिकेत व्यापार विषयाला केंद्रस्थानी ठेवून पुढील महिन्यात एक बैठक अमेरिकेत होणार आहे. या बैठकीत हे दोन्ही देश एकमेकांच्या शेतमाल व इतर बाबींवर लादलेले आयात-निर्यातीसंबंधीचे नियम, अटी शिथिल करण्याची शक्‍यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.  प्रतिक्रिया भारतातून सध्या कापूस गाठींची निर्यात रखडत सुरू असली तरी देशांतर्गत बाजारात हवी तशी कापूस आवक नाही. पुढे चीन व अमेरिकेतील व्यापार युद्ध थांबेल, असे कापूस उद्योग जगतात चर्चिले जात आहे. ही चर्चा खरी ठरली तर निर्यातीला मोठी चालना मिळेल.  - अनिल सोमाणी,  सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com