कापसाच्या आवकेविना खरेदी केंद्रे ओस

कापसाच्या आवकेविना खरेदी केंद्रे ओस
कापसाच्या आवकेविना खरेदी केंद्रे ओस

जळगाव : खानदेशात पणन महासंघाच्या कापूस खरेदीला कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही. भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) नऊ पैकी केवळ शिरपूर (जि. धुळे), जळगाव येथील केंद्रात कापसाची आवक फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत झाली. ११ मार्चनंतर कुठलीही आवक सीसीआयच्या केंद्रात झाली नसल्याची माहिती आहे. बाजारात हमीभावापेक्षा अधिक दर असल्याने शासकीय खरेदी केंद्रांवर शुकशुकाट असल्याची स्थिती आहे. 

खानदेशात सीसीआयच्या सर्व केंद्रांमध्ये मिळून सुमारे ७० हजार क्विंटल कापसाची खरेदी झाल्याचा अंदाज आहे. पणन महासंघाने नऊ केंद्रांची घोषणा केली. परंतु, येवला व धुळे येथेच खरेदीची कार्यवाही झाली. या केंद्रातही कापसाची आवक झाली नसल्याची माहिती मिळाली. 

सीसीआयने डिसेंबरमध्ये कापूस खरेदी सुरू केली होती. खानदेशात शहादा (जि. नंदुरबार), नंदुरबार, शिरपूर (जि. धुळे) व जळगाव येथे सुरवातीलाच कापूस खरेदी केंद्रे सुरू केली होती. ५४५० रुपये प्रतिक्विंटल दर दिला जात असताना खरेदीला डिसेंबरच्या मध्यानंतर वेग आला. नंतर जळगाव जिल्ह्यात एरंडोल, पाचोरा व जामनेरात खरेदी सुरू केली. परंतु, बाजारात जानेवारीत मंदी आल्यानंतर सीसीआयने ५४५० रुपये दर देण्यास नकार दिला. 

कापूस संपला अन् दर सुधारला दुय्यम दर्जाचा कापूस सांगून सीसीआयने कापसाची ५३५० रुपये दरात खरेदी सुरू केली. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील बोदवड, भुसावळ, जामनेर येथील केंद्रात खरेदीच झाली नाही. एरंडोल येथेही १० हजार क्विंटलवर खरेदी झाली. नंतर खरेदी या केंद्रात टाळली. शहादा, नंदुरबार येथेही केंद्र बंदावस्थेतच आहेत. सध्या बाजारात कापसाचे दर ६४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. मात्र, शेतकऱ्यांकडे अपवाद वगळता कापूस नसल्याची स्थिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com