हंबरून वासराले, चाटती जवा गाय...!

हंबरून वासराले, चाटती जवा गाय...!
हंबरून वासराले, चाटती जवा गाय...!

कोल्हापूर ः ‘‘हंबरून वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्यामंदी दिसते माझी माय...’’ असा काळजाचा ठाव घेणारा अनुभव आज कोल्हापूरकरांनी घेतला. गाय आणि तिच्या वासराप्रतीचं प्रेम, त्याच्याही पलीकडे जाऊन एकमेकांपासून दूर जाण्याची भीती, त्या भीतीतून गायीचं पुन्हा हंबरणं आणि आलेल्या वाटेवरून पुन्हा परत जाणं...असा हा सारा सहा तासांचा थरार सम्राटनगर, प्रतिभानगर आणि पांजरपोळ परिसराने अनुभवला. अखेर या दोन्ही माय-लेकरांना एकाच टेम्पोतून पांजरपोळमध्ये नेऊन दाखल करण्याचा प्रयोग यशस्वी ठरला.  सम्राटनगर परिसरातील मालती अपार्टमेंट परिसरात रस्त्याच्या कडेला गायीने वासराला जन्म दिला; पण भटक्‍या कुत्र्यांनी उच्छाद मांडला. वासरावर झडप टाकण्याचा ते प्रयत्न करू लागले. वासराच्या पायात अजूनही बळ आले नव्हते. त्यातही ते जन्मतःच एका पायाने अपंग. हा सारा प्रकार परिसरातील नागरिक अनुभवत होते; मात्र नेमकं काय करायचं, हे कुणालाच समजेना. अखेर एकाने व्हाईट आर्मीला या घटनेची माहिती सकाळी सातच्या सुमारास दिली आणि व्हाईट आर्मीचे जवान घटनास्थळी दाखल झाले. महापालिकेला विनंती केल्यानंतर बैलगाडी आली आणि बैलगाडीतून वासराला पुढे नेऊन मागून गायीला नेण्याचे प्रयत्न सुरू झाले. गाय निम्म्या वाटेपर्यंत यायची आणि पुन्हा मागे फिरायची. नेमकं काय चाललं आहे, लेकराला ही मंडळी कुठं घेऊन निघाली आहेत, अशा प्रश्‍नांचं जणू काहूर तिच्या मनात दाटलेलं. नुकत्याच जन्माला आलेल्या आपल्या लेकरापासून तिला थोडासाही दुरावा नको होता आणि म्हणूनच ती सैरभैर झाली होती. चार-साडेचार तासांनंतरही गाय निम्म्यापर्यंत यायची आणि परत आलेल्या वाटेने मागे फिरायची, असाच प्रकार सुरू राहिला. अखेर व्हाईट आर्मीचे जवान आणि पांजरपोळच्या टीमने दुसरी युक्ती काढली. एक मोठा टेम्पो बोलावला आणि त्यात या दोन्ही मायलेकरांना एकत्र बसवून पांजरपोळ संस्थेत दाखल करण्याचा निर्णय झाला आणि हा प्रयत्न यशस्वी ठरला.  यांनी केले विशेष प्रयत्न... व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, प्रशांत शेंडे, विष्णू कुंभार, योगेश ढोबले, अरुण सांगावकर, संजय बागल, बैलगाडीवान भीमराव जांभळे यांनी गाय व वासराला पांजरपोळ संस्थेत दाखल करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. वासरू जन्मतः एका पायाने अपंग आहे. त्यामुळे त्याच्यावर आम्ही योग्य ते उपचार सुरू केले आहेत. गाय आणि वासरू दोघांचीही जबाबदारी आता संस्थेने घेतली आहे. - डॉ. राजकुमार बागल, पांजरपोळ संस्था

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com