गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली 

येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर. भारतीय गोवंशाचे संवर्धन करण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. नुकतीच त्यांच्या गोठ्यातील ११ वर्षांची गीर गाय व्यायली.
cow
cow

नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर. भारतीय गोवंशाचे संवर्धन करण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. नुकतीच त्यांच्या गोठ्यातील ११ वर्षांची गीर गाय व्यायली. विशेष म्हणजे या गाईने पहिल्यांदा गीर कालवड आणि चार दिवसानंतर लाल कंधारी गोऱ्ह्यास जन्म दिला. त्यामुळे पंचक्रोशीत हा चर्चेचा विषय ठरला आहे.   दहा वर्षांपूर्वी डॉ. खान यांनी सिन्नर(जि.नाशिक) येथून दीड वर्षाची गीर कालवड खरेदी केली होती. आत्तापर्यंत गायीचे तीन वेत झाले आहेत. मात्र २०१६ नंतर गर्भधारणा होत नसल्याने ती भाकड होती. आता चार वर्षांनंतर चौथ्यांदा व्यायली. २०१६ सालापासून गाय भाकड असल्याने माजावर येत नव्हती.  यावर पर्याय म्हणून डॉ.खान यांनी पशुवैद्यकांच्या सल्ल्याने हार्मोन थेरपीचा वापर केला. तसेच मूग,मठ हा खुराक सुरू केला,योग्य व्यवस्थापन देखील केले. गाय ३ डिसेंबर, २०१९ ला  माजावर आली.  गाय माजावर आल्यानंतर दुसऱ्या दिवशी डॉ. खान यांनी सकाळी ९ वाजता रेतन करताना गीर जातीची रेतमात्रा वापरली. सायंकाळी ७ वाजता पुन्हा लाल कंधारी जातीची रेतमात्रा वापरली. पुढे गर्भधारणा झाली.  त्यानंतर नियमित आहारात खनिज मिश्रण तसेच हिरवा, सुका चारा योग्य प्रमाणात देण्यात आला. गाय व्यायल्यानंतर पहिल्यांदा गीर जातीची कालवड आणि चार दिवसानंतर लाल कंधारी गोऱ्हा जन्माला आला. पहिले वासरु शारीरिक दृष्ट्या सुदृढ, सशक्त जन्माला आले तर दुसरे वासरू कमकुवत जन्माला आले. मात्र या वासराची योग्य काळजी घेण्यात आल्याने त्याची चांगली वाढ होत आहे.    पशुपालकांनो, शास्त्रीय पद्धतीनेच रेतमात्रांचा वापर करा... परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. नितीन मार्कंडेय म्हणाले, की माजावर आलेल्या गाईला पहिली रेतमात्रा भरवल्यानंतर खात्री नसेल तर दुसरे रेतन २४ तासानंतर करावे, हा शास्त्रीय नियम आहे. मात्र हे करताना पहिल्या रेतनाच्यावेळी निवडलेली वंशाची रेतमात्राच दुसऱ्यावेळी रेतन करताना वापरणे बंधनकारक आहे. परंतू डॉ.खान यांनी केलेल्या रेतनामध्ये ही सदोषता दिसते. तेव्हा पशुपालकांनी एकाच माजावेळी रेतन करताना दोन वेगवेगळ्या वंशाच्या रेतमात्रांचा वापर करू नये, ते शास्त्रीयदृष्या अत्यंत  चुकीचे आहे. ‘‘गर्भधारणा कालावधीत दोन गर्भ वाढत असतील, तर काही गर्भ वाढीला पूरक ठरत नाहीत, मात्र ते जिवंत स्वरूपात गर्भाशयात टिकवून ठेवले जातात. असे गर्भ पुन्हा उत्तेजित करून गर्भधारणा जरी सुरू झाली, तरी त्यांची वाढ अगदी कमी असते. यामुळेच अशा प्रकारे दोन वेगवेगळ्या उंचीच्या, वजनाच्या गर्भाची जन्मताना नोंद होते. यात गर्भाचा जन्म एकाचवेळी होणे अपेक्षित असते. मात्र प्रजननातील ठळक विकृतीमध्ये दोन प्रसूतीमधील अंतर क्वचित प्रसंगी असे वाढलेले दिसून येते,मात्र हा प्रकार सामान्य अजिबात नाही. डॉ.खान यांच्याकडील गाईमध्ये गर्भ चिकटण्याची प्रक्रिया वेगवेगळ्या तारखेला झालेली आहे. त्यामुळे  वासरे देखील वेगवेगळ्या तारखेला जन्मलेली आहेत, हे लक्षात घ्यावे,’’ असेही त्यांनी सांगितले.

असे आहेत गर्भधारणा ते विण्याचे टप्पे 

  • ३ डिसेंबर २०१९ : गीर गाय माजावर आली.
  • ४ डिसेंबर २०१९ : सकाळी ९ वाजता गीर जातीच्या रेतमात्रेचे रेतन. सायंकाळी ७ वाजता लाल कंधारी जातीच्या रेतमात्रेचे रेतन. 
  • ६ सप्टेंबर २०२० :सकाळी १०.३० वाजता गीर कालवडीचा जन्म
  • ११ सप्टेंबर २०२० :सकाळी ६.३० वाजता लाल कंधारी गोऱ्हाचा जन्म
  • यापूर्वी अशा घटनेची नोंद  यापूर्वी अहमदपूर(जि.लातूर) येथे २००५ साली लाल कंधारी गाय व्यायली असता,असा प्रकार घडल्याचे समोर आले होते. त्याची नोंद पशूतज्ज्ञ डॉ. नितीन मार्कंडेय यांनी घेतली होती. असाच प्रकार आता नाशिक जिल्ह्यातील गीर गाईच्या बाबतीत घडला आहे.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com