राज्यात गाईच्या दूध खरेदी दरात कपात 

राज्यातील बहुतांश संघांनी एकत्र येऊन दुधाच्या दरात दोन दिवसांपासून पुन्हा कपात केली आहे. तशा सूचना दूध संकलन केंद्र चालकांना दिल्या आहेत.
milk collection
milk collection

नगर ः लॉकडाऊन उघडल्यानंतर दुधाची मागणी वाढल्यावर दरातही हळू हळू वाढ केली. मात्र काही दूध संघाचा अपवाद वगळता राज्यातील बहुतांश संघांनी एकत्र येऊन दुधाच्या दरात दोन दिवसांपासून पुन्हा कपात केली आहे. तशा सूचना दूध संकलन केंद्र चालकांना दिल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारा दर २५ ते २७ रुपयांवरून आता २२ ते २३ रुपये प्रती लिटरवर आला आहे. २१ आक्टोबरपासून ही कपात लागू करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र डेअरी वेलफेअर असोसिएशन यांचे नाव असलेले व त्यात राज्यातील सोळा दूध संघाच्या नावाचा उल्लेख असलेले पत्र दोन दिवसांपासून सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्या पत्रात ३.५ फॅट व ८.५ एफएनएस असलेले गाईंचे दूध वाहतूक व कमिशनसह २४ रुपयापर्यंत प्रतिलिटर दराने खरेदी करावे असे नमुद केले असून त्यात दूध दर खरेदीचा तक्ताच मांडलेला आहे. त्यामुळे मागणी असताना व दूध पावडरचे दर वाढलेले असतानाही दूध दरात कपात केल्याने पुन्हा एकदा हा व्यवसाय अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. 

दूध तपासणीचे काय झाले?  कल्याणकारी दूध संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरे म्हणाले, की राज्यातील विविध भागातून मुंबई, पुण्याला येणाऱ्या दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ होते. याबाबत सरकारला पत्र लिहिल्यानंतर दुधाची नियमित तपासणी केली जाईल, असे दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी सांगितले होते. मात्र अजून कोठेही तपासणी होत नाही. मागणी असतानाही दर कमी करणे म्हणजे शेतकऱ्यांची जाणीवपूर्वक पिळवणूक आहे.  प्रतिक्रिया गेल्या सहा महिन्यांपासून दुधाला दर नसल्याने मोठा आर्थिक फटका सोसावा लागला आणि तोट्यात व्यवसाय केला. आता कुठे महिनाभरापासून दुधाला दरवाढ मिळू लागली असताना पुन्हा दर कमी केले. दूध व्यवसाय मोडायचाच हा एक प्रकार दिसतोय. दूध शेतकऱ्यांची लुट थांबली पाहिजे.  - नंदू रोकडे, दूध उत्पादक शेतकरी, खडकी ता. नगर     अगोदरच लॉकडाऊनचा बाऊ करून या कंपन्यांनी शेतकऱ्यांना गेली चार सहा महिने प्रचंड लुटले आहे. आता दुधाची मागणी पूर्वपदावर आली आहे. दूध पावडरचे दरही पूर्ववत होत आहेत. दसरा, दिवाळी येऊ घातल्याने दुधाची मागणी आणखी वाढणार आहे. यामुळे दुधाचे खरेदी दर वाढणे अपेक्षित आहे. कंपन्या मात्र खरेदी दर कमी करणार असतील तर शेतकरीही त्याला जशास तसे उत्तर देतील.  - डॉ. अजित नवले, राज्य सरचिटणीस, किसान सभा, महाराष्ट्र 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com