२०१९ पशूगणना : गायींची संख्या १८ टक्क्यांनी वाढली

पशुधनात
पशुधनात

पुणे ः देशात २०१२ मध्ये ५१२ दशलक्ष पशुधन होते. त्यात ४.६ टक्क्यांनी वाढ होऊन २०१९ मध्ये ५३६ दशलक्ष झाली आहे. गोवंशामध्ये ०.८ टक्क्यांनी वाढ झाली असून, गायींची संख्या तब्बल १८ टक्क्यांनी वाढली आहे. यामध्ये देशी आणि वंशावळ माहिती नसलेल्या गायी १० टक्क्यांनी वाढल्या आहेत. देशातील एकूण पशुधनापैकी जवळपास २७ टक्के गायी आहेत, अशी माहिती विसाव्या पशुधन गणनेच्या अहवालातून मिळाली. केंद्रीय मस्त्य, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रालयाच्या अंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाने बुधवारी (ता. १६) २० व्या पशुगणनेचा अहवाल प्रसिध्द केला. या अहवालात २०१२ ते २०१९ या काळात देशात एकूण पशुधन ४.६ टक्क्यांनी वाढून ५३५.७८ दशलक्ष झाल्याचे नमूद केले आहे. त्यात दुधाळ जनावरांची संख्या एक टक्क्याने वाढून ३०२.७९ दशलक्ष झाली आहे, तर यात गोवंशाची संख्या १९२.४९ दशलक्ष आहे. गायींच्या संख्येत २०१२ ते २०१९ या काळात तब्बल १८ टक्क्यांनी वाढ झाली असून, १४५.१२ दशलक्ष झाली आहे. यात देशी आणि वंशावळ माहीत नसलेल्या गायींमध्ये १० टक्के वाढ झाली आहे. २०१२ च्या गणनेत देशी गोवंशाच्या संख्येत ६ टक्क्यांनी घट नोंदली होती, तर विदेशी आणि संकरित गायींच्या संख्येत २७ टक्के वाढ झाली होती. २०१९ मध्ये विदेशी गोवंश ५०.४२ दशलक्ष, तर संकरित गोवंश १४२.११ दशलक्ष आहे.  राज्यांचा विचार करता उत्तर प्रदेशात सर्वाधिक पशुधन आहे. त्यापाठोपाठ राजस्थान, मध्य प्रदेश, पश्‍चिम बंगाल, बिहार, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगण, कर्नाटक आणि गुजरात राज्यांचा नंबर लागतो. गोवंशाचा विचार करता पश्‍चिम बंगालमध्ये सर्वाधिक संख्या आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र असा क्रम आहे. मात्र, २०१९ मध्ये २०१२ च्या तुलनेत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि ओडिशा या राज्यांमध्ये गोवंशामध्ये घट झाली असून, झारखंड आणि बिहारमध्ये वाढ झाली आहे.   संकरित गायींमध्ये ३९ टक्के वाढ देशात विदेशी गायींची संख्या ३९ टक्क्यांनी वाढली आहे. देशी गायींपेक्षा संकरित गायी जास्त दूध देत असल्याने संकरित आणि विदेशी गायींची संख्या वाढली आहे.    देशी गायींमध्ये १० टक्क्यांनी वाढ २०१२ मध्ये देशी गायींची संख्या ८९.२२ दशलक्ष होती. २०१९ मध्ये देशी गायींच्या संख्येत १० टक्क्यांनी वाढ होऊन ९८.१७ दशलक्ष झाली आहे. ‘राष्ट्रीय गोकूळ मिशन’ आणि ‘राष्ट्रीय गोकूळ ग्राम’ या योजनांच्या माध्यमातून केंद्र सरकारने हवामान बदलाला अनुकूल अशा गोवंशाच्या देशी वाणांचे जतन आणि प्रोत्साहन दिले होते. त्यामुळे देशी गायींच्या संख्येत देशात वाढ झाली आहे. कुक्कुटपालनामध्ये वाढ देशात कृषिपूरक व्यवसाय म्हणून दुग्धोत्पादनानंतर शेतकऱ्यांनी कुक्कुटपालनाला पसंती दिल्याचे दिसत आहे. देशात २०१२ च्या तुलनेत २०१९ मध्ये एकूण कोंबड्यांच्या संख्येत १६.८ टक्के वाढ झाली आहे. सध्या देशात ८५१.८१ दशलक्ष कोंबड्या आहेत, असे अहवालातून स्पष्ट केले आहे. देशात परसबागेतील कुक्कुटपालनही मोठ्या प्रमाणात केले जाते. परसबागेतील कोंबड्यांची संख्या तब्बल ४५ टक्क्यांनी वाढून ३१७.०७ दशलक्ष झाली आहे. तर, व्यावसायिक कुक्कुटपालनात ४.५ टक्के वाढ झाली असून ,या कोंबड्यांची संख्या ५३५.७४ दशलक्ष आहे. गाढवांच्या संख्येत मोठी घट देशभरात अनेक ठिकाणी गाढवांचा वापर विविध कारणांसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, २०१२ च्या तुलनेत २०१९ मध्ये गाढवांची संख्या तब्बल ६१.२३ टक्क्यांनी घटली आहे. देशात २०१९ मध्ये १.२ लाख गाढव असल्याची नोंद अहवालात करण्यात आली आहे. तसेच, याकच्या संख्येत २४.६७ टक्के घट होऊन ३.४ लाख नोंद झाली. तर, तट्टूंच्या संख्येत ४५ टक्के घट नोंदली गेली असून, ३.४ लाख तट्टू आहेत. खेचरांच्या संख्येत देशात तब्बल ५७.१ टक्क्यांनी घटून ८४ हजार झाली आहे. उंटांमध्ये ३७ टक्के घट होऊन २.५ लाख उंट देशात असल्याची नोंद आहे.  २० पशुगणनेतील निष्कर्ष

  • दूधाळ पशुधन एक टक्क्याने वाढून ३०२.७९ दशलक्ष झाले
  • गोवंशात ०.८ टक्के वाढ होऊन १९२.४९ दशलक्षावर गेले
  • गायींची संख्या १८ टक्क्यांनी वाढून १४५.१२ दशलक्ष झाली 
  •  देशी आणि वंशावळ माहीत नसलेल्या गायींमध्ये १० टक्के वाढ होऊन ९८.१७ दशलक्ष संख्या झाली
  • म्हशींमध्ये एक टक्का वाढून संख्या १०९.८५ दशलक्ष झाली
  • दुधाळ गायी आणि म्हशींमध्ये सहा टक्क्यांनी वाढ होऊन १२५.३४ दशलक्ष झाली आहे. 
  • मेंढ्यांच्या संख्येत १४.१ टक्क्यांनी वाढ झाली असून, सध्या देशात ७४.२६ लाख मेंढ्या आहेत
  • शेळ्यांची संख्या १०.१ टक्क्यांनी वाढून १४८.८८ दशलक्ष झाली आहे. 
  • वराहसंख्या देशात १२.०३ टक्क्यांनी वाढून ९.०६ दशलक्ष झाली
  • मिथुनची ३.९ लाख आहे. त्यांच्या संख्येत ३० टक्के वाढ झाली
  • २०१२ आणि २०१९ मधील जातीनिहाय पशुधनाची संख्या (दशलक्षामध्ये)

    वर्ग  २०१२  २०१९    बदल (टक्के)
    गोवंश १९०.९०  १९२.४९   ०.८३
    म्हशी १०८.७०  १०९.८५    १.०६
    मेंढ्या  ६५.०७   ७४.२६ १४.२३
    बकऱ्या   १३५.१७ १४८.८८ १०.१४
    वराह  १०.२९   ९.०६   (-१२.०३)
    मिथून  ०.३० ०.३८ २६.६६
    याक   ०.०८  ०.०६     (-२५)
    घोडे आणि तट्टू ०.६३   ०.३४    (-४५.५८)
    खेचर  ०.२०  ०.०८ (-५७.०९)
    गाढव   ०.३२   ०.१२     (-६१.२३)
    उंट  ०.४०   ०.२५ (-३७.०५)

    राज्यनिहाय पशुधनाची संख्या  (दशलक्षामध्ये)

    राज्य   २०१२   २०१९ बदल (टक्के)
    उत्तर प्रदेश  ६८.७  ६७.८ (-१.३५)
    राजस्थान  ५७.७ ५६.८   (-१.६६)
    मध्य प्रदेश   ३६.३  ४०.६   ११.८१
    पश्‍चिम बंगाल ३०.३   ३७.४ २३.३२
    बिहार   ३२.९  ३६.५ १०.६७
    आंध्र प्रदेश २९.४  ३४  १५.७९
    महाराष्ट्र   ३२.५  ३३  १.६१
    तेलंगणा २६.७  ३२.६  २२.२१
    कर्नाटक   २७.१  २९  ४.७०
    गुजरात   २७.१  २६.९ (-०.९५)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com