Cow's milk in the state Increase in purchase price
Cow's milk in the state Increase in purchase price

राज्यात गायीच्या दुधाच्या  खरेदीदरात वाढ 

राज्यातील खासगी डेअरीचालकांना गायीच्या दुधाच्या खरेदीदरात दोन रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे दुधाला बहुतेक डेअरी प्रकल्पांकडून प्रति लिटर २६ रुपयांपर्यंत दर दिला जात आहे, अशी माहिती डेअरी उद्योग सूत्रांनी दिली.

पुणे ः राज्यातील खासगी डेअरीचालकांना गायीच्या दुधाच्या खरेदीदरात दोन रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे दुधाला बहुतेक डेअरी प्रकल्पांकडून प्रति लिटर २६ रुपयांपर्यंत दर दिला जात आहे, अशी माहिती डेअरी उद्योग सूत्रांनी दिली.  कोल्हापूर, सांगली भागांत या पूर्वीच दुधाच्या खरेदी दरात वाढ होऊन ती प्रति लिटर २७ रुपयांपर्यंत गेली होती. अलीकडेच दूध भुकटी व लोण्याचे भाव वधारल्यानंतर दुधाच्या दरात वाढ करण्यास वाव आहे, अशी चर्चा खासगी डेअरी चालकांमध्ये सुरू झाली. त्यामुळे एक बैठक घेत सर्व खासगी प्रकल्पांनी एकत्रितपणे दूधदर वाढीवर शिक्कामोर्तब केले. परिणामी, प्रति लिटर २३ ते २४ रुपये असलेला दुधाचा खरेदीदर २१ नोव्हेंबरपासून २६ रुपयांपर्यंत गेला आहे. 

अजून दरवाढीची शक्यता  राज्य शासनाच्या दुग्धविकास सल्लागार समितीचे सदस्य प्रकाश कुतवळ यांनी सांगितले, ‘‘शेतकऱ्यांच्या दुधाचे दर कमी होण्याची भीती दिवाळीपूर्वी वाटत होती. सुदैवाने तसे काही घडले नाही. भुकटी व लोण्याला चांगले दर मिळत असल्याने दूध खरेदीदरात २६ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. दुधाच्या वाढत्या दराला खासगी व्यावसायिकांमधील स्पर्धा कारणीभूत आहे.’’  दुधाचे दर आणखी वाढण्यास पूरक स्थिती असल्याचे डेअरी उद्योगाला वाटते. राज्यात खासगी दूध प्रकल्पांकडून ७० टक्के दुधाची खरेदी केली जाते. आमच्या मते अजून दोन रुपयांनी वाढ होण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. दुधाला दर चांगले मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून दुभत्या जनावरांना पशुखाद्य देण्याचे प्रमाण वाढेल. परिणामी, एकूण दूध उत्पादन देखील वाढू शकेल.  परराज्यांतून येणाऱ्या दुधामुळे स्थानिक प्रकल्पांना स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. ‘‘मदर डेअरी व नंदिनीमुळे परराज्यांतून दूध येते व परिणामी स्थानिक दूध उत्पादकांचे दूध खरेदी पूर्ण क्षमतेने करता येत नाही,’’ असा मुद्दा चितळे डेअरी उद्योग समूहाचे संचालक श्रीपाद चितळे यांनी मांडला आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या दुग्धविकास सल्लागार समितीची बैठक अलीकडे झालेली नाही. बैठक झाल्यास दुग्ध प्रकल्पांसमोरील अडचणींची चर्चा होऊ शकते. अर्थात, त्यासाठी ‘महानंदा’ने पुढाकार घ्यायला हवा, असे मत एका डेअरीचालकाने व्यक्त केले. 

मागणी पूर्ण क्षमतेने नाहीच  श्रीपाद चितळे म्हणाले, ‘‘परिस्थिती योग्य दिसताच शेतकऱ्यांच्या दुधाला जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न राज्यातील खासगी दुग्ध प्रकल्पांचा असतो. अर्थात, दुधाचे दर वाढलेले असले तर डेअरी उद्योगाला अद्यापही हवी तशी बाजारपेठ प्राप्त झालेली नाही. कोरोनाच्या कालावधीत मागणी कोसळून बाजार व्यवस्था विस्कळीत झाली आहे. काही महिन्यांपूर्वीपर्यंत दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीतील घट ३० टक्क्यांपर्यंत होती. ही घट अजूनही १५ टक्क्यांपर्यंत दिसते आहे.’’ 

प्रतिक्रिया

राज्यात दुधाच्या खरेदीपोटी दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर २६ रुपयांपर्यंत दर देण्याचा निर्णय सर्वच खासगी डेअरी प्रकल्पांनी घेतला आहे. दुध भुकटी आणि लोण्याचे बाजारभाव तेजीत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दुधाचे सुधारलेले दर स्थिरावण्यास उत्तम स्थिती आहे.  -श्रीपाद चितळे, संचालक, चितळे डेअरी उद्योग समूह

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com