अवजार घोटाळ्यातील अधिकाऱ्यास मलईदार पद

अवजार घोटाळ्यातील अधिकाऱ्यास मलईदार पद
अवजार घोटाळ्यातील अधिकाऱ्यास मलईदार पद

पुणे : महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाला ओरबाडणाऱ्या मस्तवाल प्रशासनाने अवजार घोटाळ्याच्या तपासात मंत्रालयाच्या आदेशालाही हरताळ फासला आहे. ‘अधिकाऱ्याची चौकशी करा’ असे आदेश असताना मलईदार पद बहाल केल्याचे उघड झाले आहे . कृषिउद्योग महामंडळात ‘कृषी अभियांत्रिकी विभागा’चे ‘उपमहाव्यस्थापक’ हे मलईदार पद समजले जाते. राज्यातील अवजार घोटाळ्यांचे केंद्रस्थान असलेल्या या पदावर डी. के. सूर्यगण यांची नियुक्ती झाल्यानंतर अनेक वादग्रस्त निर्णय घेतले गेले. बीबीएफ प्लांटरचा कोट्यवधी रुपयांचा घोटाळाही याच काळात घडला होता.  महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अशोक करंजकर यांनी या घडामोडींची गंभीर दखल घेत उपमहाव्यवस्थापकाची बदली रत्नागिरीत विभागीय व्यवस्थापकपदी केली. विशेष म्हणजे डॉ. करंजकर यांनी २७ फेब्रुवारी २०१८ मध्ये गोपनीय आदेश काढून सूर्यगण यांचे तडकाफडकी निलंबनही केले. ‘महामंडळातील कृषी अभियांत्रिकी विभागात आढळून आलेल्या आर्थिक अनियमितपणामुळे महाराष्ट्र सेवा कायद्याच्या १९७९ मधील ४ (१) नुसार डी. के. सूर्यगण यांना निलंबित करण्यात येत आहे,’ असे करंजकर यांनी आदेशात नमूद केले होते. यामुळे हादरलेल्या सोनेरी टोळीवर कारवाईचा पुढचा टप्पा फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा होता. याच काळात दुसऱ्या बाजूने मंत्रालयातूनदेखील चौकशीचे आदेश दिले गेले. मात्र, कारवाईऐवजी पुढे भलत्याच घडामोडी झाल्याचे उघड होत आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मंत्रालयातून महामंडळाला १३ मे २०१९ रोजी स्वंतत्र पत्र (क्रमांक १६१७-२७२) देण्यात आले. ‘अवजार खरेदीच्या अनियमिततेबाबत पोलिस तपास हा लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (१), (ब) व (३) मधील तरतुदींप्रमाणे तपासणी करण्यासाठी ‘एफआयआर’ दाखल करण्यास कळविण्यात आले आहे. याबाबत महामंडळाने अभिप्राय पाठवलेला नाही, त्यामुळे अभिप्राय शासनाला तात्काळ पाठवा,’ असे या पत्रात नमूद करण्यात आले होते. ‘राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडूनदेखील या प्रकरणात पाठपुरावा होतो आहे. त्यामुळे विभागीय चौकशीचा अहवाल ठरावीक कालावधीत शासनाला सादर करण्यासाठी आपण स्वतः लक्ष द्यावे,’ असेही मंत्रालयातून महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना सूचित करण्यात आले होते.

महामंडळातील कंपूने मात्र मंत्रालयातील आदेशाचा ‘ध’ चा ‘मा’ केला असे उच्चपदस्थ सूत्रांचे म्हणणे आहे. ‘या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी सुरू आहे, त्यामुळे कोणताही अभिप्राय शासनाला पाठविता येणार नाही,’ असे महामंडळानेच मंत्रालयाला कळविले. दुसऱ्या बाजूने वादग्रस्त सूर्यगण यांना रत्नागिरीतून सन्मानाने पुन्हा महामंडळाच्या मुंबई मुख्यालयात ‘प्रशिक्षण व्यवस्थापक’ पदावर आणले गेले. या प्रकरणाची चौकशी करणे दूरच; पण पुढे या अधिकाऱ्याला चक्क ‘उपमहाव्यवस्थापक (समन्वय, व्यापारवृद्धी)’ या पदाची सूत्रे देण्यात आली.

गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण करण्याऐवजी महामंडळाने १० सप्टेंबर २०१९ रोजी एक आदेश काढून कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा अजून एक धक्का दिला. ‘सूर्यगण यांच्याकडे आता महामंडळाच्या कृषी अभियांत्रिकी उपमहाव्यवस्थापक पदाचा कार्यभार सोपविण्यात येत आहे,’ असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. म्हणजेच ज्या मलाईदार पदासाठी सर्व चौकशांचे नाटक सुरू केले गेले; तेच पद फिरून पुन्हा सूर्यगण यांच्याकडे सोपविले गेले. सूर्यगण यांच्यावर अन्याय होतो आहे काय? राज्याच्या कृषी उद्योग महामंडळाचे अध्यक्ष दस्तुरखुद्द कृषिमंत्रीच आहेत. कृषिराज्यमंत्री, कृषी सचिव आणि कृषी आयुक्त संचालक आहेत. संचालक मंडळाच्या मान्यतेशिवाय महामंडळात पानही हलत नाही. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या अवजार घोटाळ्यात वारंवार सूर्यगण यांना का गोवले जाते, त्यांना निलंबित करून पुन्हा पदावर बसविणे अशी खेळी कोण करतो आहे, असा प्रश्न आता कर्मचारी उपस्थित करीत आहेत. ‘सूर्यगण निर्दोष असल्यास तसे जाहीर करून सन्मानाने त्यांना अजून मोठे पद द्यावे, तसेच त्यांची चौकशीदेखील रद्द करावी,’ असाही युक्तिवाद प्रशासनातील अधिकारी करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com