परभणी कृषी विद्यापीठाकडून कुशल मनुष्यबळाची निर्मिती

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यंदा (२०२१) सुवर्ण महोत्सवी वर्षे साजरे करत आहे. यंदापर्यंत विद्यापीठाने विविध विद्याशाखांतील मिळून एकूण ४७ हजार ३४५ स्नातकांच्या कुशल मनुष्यबळाची निर्मिती केली आहे.
Creation of skilled manpower from Parbhani Agricultural University
Creation of skilled manpower from Parbhani Agricultural University

परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यंदा (२०२१) सुवर्ण महोत्सवी वर्षे साजरे करत आहे. यंदापर्यंत विद्यापीठाने विविध विद्याशाखांतील मिळून एकूण ४७ हजार ३४५ स्नातकांच्या कुशल मनुष्यबळाची निर्मिती केली आहे. शेती, उद्योग, प्रशासकीय सेवेत विद्यापीठाचे पदवीधर कार्यरत आहेत. ही माहिती कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी दिली.

सोमवारी (ता. २५) आयोजित विद्यापीठाच्या २३ व्या दीक्षान्त समारंभाच्या अनुषंगाने डॉ. ढवण बोलत होते. सन १९५६ मध्ये स्थापन झालेल्या कृषी महाविद्यालयाच्‍या माध्यमातून परभणी येथे कृषी शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. मराठवाड्यातील शेतकरी, कृषी क्षेत्राच्‍या विशेष गरजा तसेच लोकभावना लक्षात घेऊन परभणी येथे १८ मे १९७२ रोजी मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्‍थापना करण्‍यात आली. हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्‍या जन्‍मशताब्‍दी वर्षानिमित्त त्‍यांच्‍या राज्‍यातील कृषी क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल १ जुलै २०१३ रोजी विद्यापीठाचा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असा नामविस्‍तार करण्‍यात आला आहे. 

या विद्यापीठाचे कार्य शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण तीन शाखांद्वारे चालते. सद्यःस्थितीत या विद्यापीठांतर्गत १२ घटक आणि ४३ संलग्‍न महाविद्यालये आहेत. तसेच ९ घटक आणि २० कृषी तंत्र विद्यालये, २८ संलग्‍न कृषी तंत्र निकेतने आहेत. याद्वारे विद्यार्थ्‍यांना कृषिविषयक शिक्षण देण्‍यात येते. विद्यापीठांतर्गत कृषी, उद्यानविद्या,अन्न तंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, कृषी व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन, समुदाय विज्ञान (गृहविज्ञान) या विद्याशाखांतर्गत पदवी तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम चालविले जातात. जैवतंत्रज्ञान विषयात पदवी अभ्यासक्रम आहे. कृषी शाखेच्‍या नऊ विषयांत, अन्नतंत्रज्ञान शाखेत पाच विषय, कृषी अभियांत्रिकी शाखेतील चार, समुदाय विज्ञान (गृहविज्ञान) शाखेत एका विषयात आचार्य पदवी (पीएच.डी.) अभ्यासक्रम राबविण्‍यात येतो.

या वर्षीपर्यंत झालेल्या २२ दीक्षान्त समारंभाद्वारे पदवी, पदव्युत्तर, आचार्य पदवीचे मिळून एकूण ३६ हजार ३४८ स्नातकांनी विद्यापीठाच्या पदव्या प्राप्त केल्या आहेत. सोमवारी (ता. २५) आयोजित दीक्षान्त समारंभाद्वारे विविध विद्याशाखांच्या पदवी, पदव्युत्तर, आचार्य पदवी मिळून एकूण १० हजार ९९७ स्नातकांना प्रतिकुलपतीद्वारे अनुग्रहित करण्यात येणार आहे.

विविध क्षेत्रांत विद्यापीठाचे मनुष्यबळ... परभणी कृषी विद्यापीठाचे अनेक पदवीधर यशस्वी शेती करत आहेत. अनेक जण अन्न प्रक्रिया उद्योजक आहेत. कृषी विद्यापीठे, कृषी विभाग, महाबीज, ग्रामविकास, महसूल, पणन, सहकार विभागासह विविध प्रशासकीय सेवा, बॅंकांमधील विविध पदांवर कार्यरत आहेत. याशिवाय खासगी कृषी निविष्ठा उत्पादक कंपन्या, अन्नप्रक्रिया, शेतीमाल प्रक्रिया उद्योगांमध्ये विद्यापीठाद्वारे निर्मित कुशल मनुष्यबळ कार्यरत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com