Crisis clouds over mango in Marathwada
Crisis clouds over mango in Marathwada

मराठवाड्यात आंब्यावर संकटाचे ढग

यंदा आंब्यावर संकटाचे ढग कायम आहेत. मराठवाड्यातील आंबा त्याला अपवाद नाही. प्रतिकूल हवामानामुळे यंदा आंबा एकाच टप्प्यात नव्हे तर दोन तीन टप्प्यांत मोहरणार हे स्पष्ट आहे.

औरंगाबाद : यंदा आंब्यावर संकटाचे ढग कायम आहेत. मराठवाड्यातील आंबा त्याला अपवाद नाही. प्रतिकूल हवामानामुळे यंदा आंबा एकाच टप्प्यात नव्हे तर दोन तीन टप्प्यांत मोहरणार हे स्पष्ट आहे. शिवाय हवामान प्रतिकूलतेमुळे आंब्यावर तुडतुडे व भुरीचा प्रादुर्भावही वाढवण्याची शक्‍यता वाढली आहे. 

मोहर फूटण्यासाठी अपेक्षित तापमान अजूनही मिळत नसल्याने त्याचा थेट मोहर येण्यावर परिणाम करीत असल्याचे चित्र आहे. मराठवाड्यात जवळपास २० हजार हेक्‍टरवर आंब्याचे क्षेत्र विस्तारले आहे. औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली अशा क्रमाने जिल्ह्यांमध्ये आंबा बागा विस्तारल्या आहेत. 

प्रत्येकवर्षी हंगाम चांगला राहील या आशेवर असलेल्या आंबा उत्पादकांच्या आशांवर यंदाही प्रतिकूल हवामानाने संकटाचे ढग गोळा केले आहेत. १४ डिग्री सेल्सिअस तापमान सतत २१ दिवस मिळाल्यास आंब्यांना चांगला मोहर फुटतो. साधारणतः: कल्टारचा वापर केलेल्या बागांमध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तर नैसर्गिकरीत्या डिसेंबर जानेवारीमध्ये आंब्याला मोहर येतो. यंदा ज्या ठिकाणी कल्टारचा वापर केला त्या बागांमध्ये जवळपास ७० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त बागांमध्ये मोहर बाहेर पडला व पडतो आहे. 

काही बागांमध्ये नैसर्गिकरीत्याही मोहर फुटला आहे. यंदा आंब्याची झाडे अतिपावसामुळे नोव्हेंबरपर्यंत सुप्तावस्थेत होते. जमिनीत वाफसाच नव्हता, मुळांना हवा मिळालीच नाही, त्यामुळे झाडांना अन्नद्रव्य घेता आली नाही. त्यामुळे झाडे नैसर्गिकरीत्या सुप्तावस्थेत गेल्याचे तज्ज्ञ सांगतात. शिवाय ज्या झाडांना गेल्यावर्षी कमी मोहर होता ती यंदा चांगली फुटण्याची शक्‍यता असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अर्थात हवामानाची प्रतिकूलता आणखी किती काळ राहणार यावरही आंब्याचे गणित अवलंबून असणार आहे. त्यामुळे सुरुवातच संकटात झालेल्या यंदाच्या हंगामात आणखी किती संकटाचा सामना आंबा बागांना करावा लागणार हे पाहणे महत्त्वाचे  ठरणार आहे.

यंदा माझ्या दोन एकर केसर आंबा बागेतील आंब्याला जवळपास ९० टक्‍के मोहर फुटला. परंतु लगडलेल्या मोहरापैकी ६० ते ७० टक्‍के मोहर गळून चाललाय. - मिठूभाऊ चव्हाण, भांडेगाव, ता. खुल्ताबाद, जि. औरंगाबाद

हवामानाच्या प्रतिकूलतेमुळे यंदा आंब्यांना मोहर दोन तीन टप्प्यांत फुटणार. मोहर फुटलेल्या बागांमध्ये तुडतुड्यांचा आणि भुरीचाही प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. मोहर फुटलेल्या ठिकाणी तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी निमार्क आणि गंधकाचा वापर करावा. मोहर चांगला आलेल्या ठिकाणी परपरागीकरणासाठी मधमाशांच्या पेट्या ठेवणे आवश्‍यक. - डॉ. एम. बी. पाटील, प्रमुख, फळ संशोधन केंद्र, औरंगाबाद

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com